अतनूर / प्रतिनिधी : चार-पाच दिवसांपासून लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील अतनूर परिसरात ढगाळ वातावरण होते. परंतु १३ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात ते साडेआठ च्या दरम्यान ढगांच्या गडगडाटासह तब्बल एक तास गारांचा वर्षाव झाला. त्यामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, चार ते पाच दिवसांपासून सर्वत्र ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस झाला अतनूर परिसरात १३ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आकाशात ढगांचा गडगडाट सुरु झाला होता. सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले होते. त्यातच साडेसहा वाजता वार्‍यासह अवकाळी पावसाने झोडपण्यास सुरुवात केली. काही मिनिटातच प्रचंड गारा पडल्या. सर्वत्र गारांचा खच पडला होता. गाराचा पाउस तब्बल एक तास सुरू होता. त्यातच महावितरणची वीज गुल झाली. यामध्ये शेतातील गुरेढोरे, पशुपक्षी यासह शेतातील रब्बी पिकांचे हरभरा, तुर मोठे नुकसान झाले आहे. रानातील झाडांसह फळझाडांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण पसरले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या तुरीच्या ढिगात पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. गारांच्या पावसाने मोठे नुकसान झाले असून शासनाने तात्काळ रब्बी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी अखिल भारतीय महाराष्ट्र प्रदेश असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसचे लातूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष संजय शिंदे अतनूरकर, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य लातूर जिल्हासंघटक बालासाहेब शिंदे, शिवसेनेचे जळकोट तालुका उपप्रमुख विकास सोमुसे-पाटील, रयत शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रकाश केंद्रे, शेतकरी किशन मुगदळे, बी.जी.शिंदे, छगनसिंग चव्हाण, कुमार गौशेठवार सह शेतकऱ्यांनी केली आहे. तसेच रब्बी चा पिक विमा ही मंजूर करावा अशी मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp