मागील २ – ३ वर्षांपासून इयत्ता ५ वी ते १२ वी या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना पहिले असता प्रत्येकाला आयआयटी किंवा मेडिकललाच जायचे आहे असे दिसून येत आहे. यामध्ये मुलांपेक्षा त्यांच्या पालकांचीच इच्छा अधिक असलेली आढळून येते. आपल्या मुलांची इच्छा, क्षमता आहे की नाही ? यांचा अजिबात विचार करायचा नाही असे प्रत्येक पालकाने ठरवलेले आहे. आयआयटी किंवा मेडिकललाच का जायचे आहे ? असे विचारले तर एकच उत्तर येते ते म्हणजे – मुलांनी त्यांच्या आयुष्यात रग्गड पैसा कमावला पाहिजे. त्यासाठी मुलांनी त्यांचे बालपण, शारीरिक आणि मानसिक आरोग्य, मित्रमैत्रिणी, नातेसंबंध, छंद आणि खेळ अशा क्षुल्लक गोष्टींचा बळी दिला पाहिजे. म्हणजेच पहिल्या इयत्तेपासून फक्त आणि फक्त अभ्यासच केला पाहिजे. इतर कोणत्याही गोष्टीसाठी वेळ घालवायला नको. काही पालक तर मुलांचा वेळ जायला नको म्हणून त्यांच्याशी बोलत देखील नाहीत असे निदर्शनास येते.

एवढे सगळे करून देखील वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेतल्यास JEE आणि NEET परीक्षा देणाऱ्या एकूण विद्यार्थी संख्येच्या फक्त ६ % विद्यार्थ्यांना अॅडमिशन मिळते. कारण आयआयटी किंवा मेडिकलच्या जागाच तेवढ्या आहेत. राहिलेल्या ९४ % विद्यार्थ्यांचं काय होत असेल ? त्यांचं बालपण, शारीरिक आणि मानसिक आरोग्य, मित्रमैत्रिणी, नातेसंबंध, छंद आणि खेळ या गोष्टीसाठी वेळ न दिल्यामुळे खुरटलेली ही मुलं मुली आणि प्रचंड नैराश्य आलेले त्यांचे पालक यांचं काय होत असेल ? पालकांच्या अवास्तव अपेक्षा पूर्ण न करू शकलेली मुलं आणि एवढी वर्ष सर्व प्रयत्न करून देखील अपेक्षित यश न मिळाल्यामुळे खचलेले पालक यांचं नातं सुदृढ राहतं का ? आपल्या मुलामुलींना करिअरच्या इतर पर्यायात उभे होण्यासाठी पालक मदत करतात का ? या प्रश्नांचा शोध कुणी घ्यायचा ?

आपल्याला आयुष्यात जेवढ्या परीक्षा दिल्या त्यामध्ये ७० – ८० टक्क्यांच्या पलीकडे जाता आले नाही हे वास्तव जाणणाऱ्या आणि आपल्याला जे जमले नाही ते मुलांनी मिळवलेच पाहिजे अशी फाजील अपेक्षा बाळगणाऱ्या हजारो पालकांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी कमीच आहे. आपल्या अवास्तव अपेक्षांचे ओझे मुलांवर टाकणाऱ्या हजारो पालकांना आपल्या मुलामुलींना जबाबदार आणि उत्तम माणूस बनवण्यापेक्षा रग्गड पैसा कमवण्याचे ATM मशीन बनवायचे असते. शालेय जीवनात मनमुराद खेळण्यावाचून, मित्रमैत्रिणींमध्ये दंगामस्ती करण्यावाचून, स्वत:चे छंद जोपासण्यावाचून आणि आवडीचे खेळ खेळण्यावाचून दूर राहिलेली मुलेमुली निस्तेज दिसतात. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सशक्त होण्याच्या या वयात मुले वारंवार आजारी पडताना आणि छोट्या छोट्या कारणामुळे निराश व चिडचिडे होताना दिसतात. प्रत्येक आठवड्यात होणाऱ्या प्रत्येक परीक्षेत आपल्या मुलाने / मुलीने पहिलाच नंबर मिळवला पाहिजे असा दुराग्रह असलेले प्रत्येक पालक आपल्या मुलांना मानसिकदृष्ट्या देखील अपंग बनवतात, त्यांना छोटेसे अपयशदेखील पचवायला शिकवत नाहीत. याचा परिणाम नंतर पेपरमध्ये येणाऱ्या बातम्यांमध्ये आपण वाचतोच.

आपल्या मुलांनी अधिकाधिक अभ्यास करावा असे प्रयत्न करण्यासोबतच मुलांनी दररोज किमान एक तास खेळावे, अवांतर वाचन करावे, कुटुंबियांसोबत गप्पा माराव्या, विविध विषयांवर वादविवाद करावेत, अधून मधून चांगले नाटक – सिनेमा पहावा, कविता कादंबऱ्या वाचाव्या, दररोजचे वर्तमानपत्र वाचावे, मित्रमैत्रिणींच्या घरी जाणे येणे करावे, आपल्या छंदासाठी आवर्जून वेळ द्यावा, नवनवीन स्किल्स शिकावीत, किमान अर्धा तास नियमितपणे योग – व्यायाम करावा असे प्रयत्न करणारे मोजके पालक आपल्या मुलामुलींना अधिक प्रगल्भ आणि सक्षम माणूस बनवतात. त्याउलट आपण पूर्ण न करू शकलेल्या आणि इतर नातेवाईक – मित्रपरिवाराच्या कुटुंबातील मुलामुलींपैकी फक्त उत्तम मार्क्स पडणाऱ्या मुलामुलींप्रमाणे आपल्या मुलांकडून अवास्तव मार्कांच्या अपेक्षा ठेवणाऱ्या पालकांची मुले खुरटलेली आणि पुढील आयुष्यात अकार्यक्षम झालेलीच पाहायला मिळतील. शालेय शिक्षणापासून सुरू झालेल्या या अपेक्षांचा ताण वर्षानुवर्ष सहन केल्यामुळे मुलांमध्ये शारीरिक आणि मानसिक व्याधी जडायला वेळ लागत नाही. मात्र नंतर समजून उपयोग नाही याचे भान पालकांनी ठेवायला हवे.

आपल्या मुलांना रग्गड पैसा कमवण्याचे ATM बनवायचे आहे की उत्तम माणूस बनवायचे आहे ? हे प्रत्येक पालकांनी विचारपूर्वक ठरवून आपल्या मुलामुलींची जडणघडण करावी. पालकांनी घेतलेल्या निर्णयानुसार उद्याचे सक्षम नागरिक किंवा फक्त रग्गड पैसा कमवण्याचे ATM मुले तयार होणार आहेत. मुलांना ATM बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ९४ % पालकांची मुले ना सक्षम नागरिक होतील ना फक्त रग्गड पैसा कमवण्याचे ATM. त्यांची अवस्था तर ना घर का न घाट का अशीच असणार आहे. बघा.. विचार करून निर्णय घ्या.

  • महेश पत्रिके, विभागीय समन्वयक, मराठवाडा पूर्व आणि सोलापूर विभाग, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित, पुणे. फोन – 9960998555

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp