( राजकारण्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख.)
आश्वासनाची खोटी खैरात लाभलेला लोकशाही युगातला सामान्य मतदार….!!
_ पत्रकार/लेखक: विकास कांबळे, धाराशिव.
( M.A.B.ed., B. Journalism)
………………………………
आश्वासनांची खैरात जनतेला दाखवून जेव्हा एखादा पक्ष निवडून येऊन सरकार बनतो. तेव्हा त्या पक्षाला सरकार म्हणून निवडून देण्यापूर्वी जनतेला दिलेली आश्वासने त्या सरकारला पूर्ण करण्यासाठी जनता जेव्हा विविध लोकशाही मार्गाने विचारणा करते.
तेव्हा त्या जनतेस वेळ प्रसंगी ते सत्तेतील सरकार हे सरकारी बळाचा , हुकूमशाही पद्धतीच्या आसुरी निर्णयांचा अवलंब करून दिलेली वचने बऱ्यापैकी विसरून जाण्यास भाग पाडते. हे मी बेरोजगार तरुणांचे जगणे ऐकून पाहून अनुभवले आहे.
खरंच किती आश्चर्याची बाब म्हणावी लागेल ना ही..!!
निवडून येण्या पूर्वी तेच लोकप्रतिनिधी जनतेसमोर कितीतरी लाखो करोडो आश्वासनांची खैरात मांडतात. वेळ प्रसंगी सामान्य जनतेच्या पाया पडतात. विकासाच्या सुधारणा वादी आशा दाखवतात. विकासाच्या असंख्य गप्पा मारतात. आता विकास दूर नाही. या वेळेस आम्हाला निवडून द्या.मग बघा कसा विकास काय असतो ते आम्ही दाखवून देऊ . सर्व प्रथम तर निवडून आल्यावर आम्ही तुमच्या गावात तुमच्या जिल्ह्यात पक्के रस्ते तयार करू , रस्ते बनवू. दारू बंदी करू , व्यसन मुक्त गाव करू, बेरोजगार युवकांना , नोकरीच्या असंख्य संधी उपलब्ध करून देऊ, शैक्षणिक सुविधा निर्माण करू, वृध्द माणसांच्या निवाऱ्याची सोय करू , सोयींनी युक्त स्मशान भूमी बांधू , 24 तास विजेची पाण्याची सोय करू , चोरीचे प्रकार होऊ नयेत म्हणून हाय मस्ट लाईट मुख्य चौकात बसवू, स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांची अभ्यासाची सोय व्हावी म्हणून गावात सुसज्ज ग्रंथालय उभारू , पाणंद रस्ते तयार करू अशी कैक लाखो आश्वासने दिली जातात. यातील निवडून आल्यावर काही प्रमाणात ते पूर्ण करतात ही. पण त्या केलेल्या कामात बऱ्या पैकी कामाच्या उत्कृष्टतेचा दर्जा हा घसरलेला असतो. सार्वजनिक सुविधा मध्ये सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय हा डांबरी रस्ता आहे. निवडून आल्यावर मग ते लोक प्रतिनिधी खेडो पाडी मुख्य रस्त्यावर डांबरी रस्ते बनवतात. पण बऱ्याचदा ते बनवलेले रोड पाहिल्यावर रस्त्यात खड्डा , खड्डयात रस्ता हेच समजत नाही. महिन्या भरात च तो बनवलेला रस्ता आपोआप च खोलवर उखणला जातो. नंतर समजते त्यात जास्त डांबर व्यवस्थित मिसळले गेले नाही. केवळ जखमेवर मलमपट्टी केल्या सारखे डांबर आणि खडी टाकली.अशा वेळी त्याच रोड वरून जाताना मतदाराला आलेला राग त्याने कुणाला सांगावा. व त्याच्या भावना त्याने कुणाजवळ मांडायच्या. किती दुर्दैवी बाब म्हणावी लागेल. बेरोजगाराना नोकरीची आश्वासने देऊन त्यांना धीर देतात. बेरोजगार युवकांना कामे नाहीत. आज त्यांच्या सरकारी नोकऱ्या या कंत्राटी होत आहेत.आयुष्यातील दहा दहा वर्ष त्यांनी स्पर्धा परीक्षेसाठी खर्ची घातली आहेत. आणि अचानकच जर तहसीलदार पद हे निवृत्त अधिकाऱ्यांना दिले जात असेल, त्यांनी दिलेल्या परीक्षेत जर घोटाळे होत असतील तर तर ते आत्महत्या का करणार नाहीत. त्यांचे आशेचे किरण जर हातातून निसटून जात असतील तर आज तेच युवक आपण यांना मतदान यासाठी च केलं का ? हा प्रश्न स्वतःच्याच माथी मारून पश्र्चातापाचे केवळ आणि केवळ अश्रू ढाळीत बसतात. यामुळे त्यांचे भविष्य अक्षरशः बरबाद होते. अभ्यास करत करत वेळ वय निघून जाते. नोकर भरतीचे घोटाळे झाले की जाहिराती परीक्षेचा निकाल लांबतो. नोकरी अभावी लग्न जुळत नाही. आणि शेवटी आत्महत्या करण्या सारखे टोकाचे पाऊल आजचे तरुण उचलताना दिसतात.
अशा वेळी त्यांच्या पालकांनी नेमके करायचे काय . आणि कुणाला दोषी ठरवायचे ?
सांगा मायबाप सरकार ….सांगा..!!
खरच किती दुर्दैवी आणि लाजिरवाणी बाब आहे ना…!!
विशेष म्हणजे जनतेने यांच्यावर भरोसा ठेवून सरकारची सत्ता स्थापन होणेपूर्वी जनतेने च सरकारला निवडून दिलेले असते. हे ते सत्ताधारी खुशाल विसरून जातात. खरचं खुशाल विसरून जातात राव..!! समाज आणि जनतेपुढे सरकार कधी च मोठे नसते. हे त्यांना कधी कळणार आहे कुणास ठाऊक. यांच्या मागे सतरंजी उचलणारे काही मोजके कार्यकर्ते हे त्यांच्या मदतीने श्रीमंत होतात ही. पण काहींची अवस्था केवळ सांग काम्या कार्यकर्ता म्हणून तशीच राहते. ते प्रसंगी पोट भरण्याला मजबूर होतात. अशा वेळी त्यांच्या कडे बघून सामान्य मतदारास त्यांची कीव येते. जेव्हा जेव्हा जनतेच्या मतदाराच्या रोषास हे सत्ताधारी सामोरे जातात. तेव्हा निर्भिड पने जनतेच्या रोशास सामोरे जाण्याची त्यांच्यात हिम्मत नसते. कारण निवडून येण्याआधी दिलेली आश्वासनांची खैरात ही त्यांनी पूर्ण केलेली नसते. सामान्य जनतेचा विश्वासघात करून ते लोकशाही चा अप्रत्यक्षपणे ते जाणून बुजून गळा आवळत असतात. असं एक मतदार म्हणून माझे स्पष्ट मत आहे.
एखादे सरकार जर त्याच्या कार्य काळात जनतेची हिताची, बेरोजगार युवक युवतीची , सामान्य नागरिकांची , वृद्धांची , देशाला पोसणाऱ्या माझ्या बळीराजा ची हिताची कामे पूर्ण करत नसेल. त्यांच्या समस्या विचारात घेऊन गंभीर होऊन त्यावर तोडगा काढत नसेल , युवकांशी हितगुज करत नसेल तर तर त्याच सरकारला पुढची 15 -15 वर्ष निवडून देऊन त्यांच्या हातात सत्ता देणे हे जनतेला कितपत आवडत. किंवा का आवडत असेल ? हा अजूनही मला पडलेला जटिल प्रश्न आहे. केवळ स्वतःचा स्वार्थ साधलेल्या लोक प्रतिनिधी च्या दबावाला बळी पडून अथवा त्याचे एवढे वेळेस निवडून द्या..!! या शब्दाचा सन्मान राखून आपण आपली पुढची पाच वर्ष मातीत घालतो .पुढच्या पाच पिढ्या केवळ तेच एक मत देऊन बरबाद करतो. आणि नंतर त्यांच्या हातून विकास नाही झाला की आपण च त्यांना आणि स्वतःच्या कपाळावर हात मारून दोषी ठरवतो.
या साठी एक आणि शेवटचा पर्याय म्हणजे कुठल्याही अमिषाला बळी न पडता सामान्य जनतेने त्या सरकारला परत परत अजिबात निवडून न देणे . व तसेच नवीन चेहऱ्याचा हुशार कुशाग्र , समाजाची जाण असणारा , युवकांचे प्रश्न समजणाऱ्या लोक प्रतिनिधी स निवडून देऊन त्यांचे स्वतंत्र सरकार बसवणे. परंतु बऱ्याचदा कधी कधी नव उमेदवारास जुने उमेदवार विविध समस्या निर्माण करून त्रास देण्याचा प्रयत्न करतात . कुणालाही न डगमगता उच्च शिक्षित तरुणांना राजकारणात येऊ देणे. हे सामान्य जनतेचे कर्तव्य आहे. आणि जनतेनेही विश्वास ठेवून नवीन चेहरा आहे म्हणून त्या चेहऱ्याला सुरुवातीला च नावे ठेवू नये. खरच त्याला निवडून येण्या आधी नावे ठेवू नका. त्याने दिलेली आश्वासने तो पाळेल याची हमी त्याच्या कडून सर्वजण मिळून जरूर वदवून घ्या. माझा शेतकरी राजा हा मनाने भोळा व दिलदार आहे. तो जग पोसताना कधीच स्वतःच्या हिताचा विचार करत नाही. या शेतकऱ्या प्रति त्याचा जिव्हाळा आहे का हे जरूर तपासा.
त्याच्या कडून वदवून घ्या की बाबा रे…!!
आम्ही मतदार तुला तू नवीन चेहरा आहे म्हणून संधी देत आहोत. मग तू आमचं पण ऐकून बळीराजाचा सामान्य मतदाराचा आशीर्वाद घेऊन आमच्या हिताचा विचार कर.
आमच्या मागण्या खालील प्रमाणे स्पष्ट राहतील .आणि तुला त्या पूर्ण करणे चे वचन देणे होत असेल तर आमच्या कडून मतदान घे.
मागणी क्र.1) आमचा नोकरदारांना विरोध नाही. पण लक्षात ठेव. आजवर केवळ या सर्व आजी माजी सत्ता धाऱ्यानी केवळ आमच्या विषयी केवळ माझा बळीराजा …माझा बळीराजा म्हणून आम्हाला आमच्या गालावरून खोटा मायेचा हात ठेवून आम्हाला न कळू देता आमच्या पाठीत खोट्या आश्वासना नी झुलवत दूर लोटले. पण आता आम्ही हुशार झालोत जागरूक झालोत. आता आमची हक्काची मागणी आम्ही तू तरी सरकार पर्यंत मांडशिल म्हणून आम्हाला तुझ्या विषयी अपेक्षा आहे. आम्हा शेतकऱ्यांना जास्त काही नको पण किमान महिना 10 हजार पगार सुरू करा. ही मागणी तू तुझ्या मार्फत सरकार पर्यंत पोचवलीच पाहिजे. यासाठी तू या मागणीचा जोर सरकारकडे धरला पाहिजे. या साठी शेतकरी म्हणून आम्ही प्रत्येक आंदोलनात सहभागी होऊ.
तर ऐक
मागणी क्र.1) आम्हा सर्व शेतकऱ्यांना आमची शेती ही सुद्धा एक नोकरीच आहे हे समजून घेऊन आम्हा सर्व मतदार शेतकरी बंधू भगिनींना कायमस्वरूपी महिना 10 हजार मानधन हे सुरू करावे.
ही मागणी सरकार कडे पोचवावी.
मागणी क्र. 2) व्यसन मुक्ती साठी जितकं काही करता येईल तेवढं कर.
दारू च्या पायात उध्वस्त होणारे संसार वाचव.आणि शेकडो आया बहिणीचे कपाळावरचे कुंकाचे भाऊ होऊन रक्षण कर.
आणि जिल्ह्यात व्यसन मुक्ती मार्गदर्शन केंद्रे उभारावी.
मागणी क्र.3) दर 6 महिन्याला बेरोजगार युवक युवती साठी रोजगार मेळावे भरव.
मागणी क्र.4) जिल्ह्या मध्ये विविध उद्योगांची स्थानिकांच्या हाताला काम देणारी उद्योगांची निर्मिती कर.
मागणी क्र.5) खेडी पाडी शहरात वृक्ष लागवड करून पर्यावरणाचे रक्षण कर.
मागणी क्र.6) जिल्ह्यात खेडो पाडी चांगल्या सोयी सुविधा दर्जाच्या प्राथमिक शाळा निर्माण कराव्यात.
मागणी क्र.7) गावामध्ये सतत लोक प्रबोधन , व शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रत्येक नागरिक पर्यंत पोचविण्याची सुविधा निर्माण कर.
गावामध्ये आजच्या निर्व्यसनी व आदर्श मुलामधून भावी आदर्श अधिकारी निर्माण व्हावेत म्हणून गावामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे उभार व सार्वजनिक वाचनालय निर्माण कर.
व भारत देशाचे नाव रोशन कर…रोशन कर…रोशन कर..!!
बास्स…!! इतकीच अपेक्षा बाकी काही नको.
मी आज हे बोलायचे कारण हेच की जेव्हा लोक प्रतिनिधी निवडणूक जवळ आली की जनतेच्या पायावर मतांसाठी नाक घासतात. आणि निवडणूक झाली की नंतर सामान्य नागरिक विसरून जातात.
म्हणून एक सामान्य मतदार म्हणून माझा संताप होतो.
मग हे सामान्य जनते प्रति असणारे त्यांचे वागणे बरोबर आहे का?
नाही ना…मग मला ही हेच म्हणायचं आहे.
जनते च्या विश्वासाला जिंकायचं असेल तर विकास कामे करावीच लागतात हे कोणत्याही सरकारला ध्यानात घेणे प्रथम गरजेचे आहे. जनतेच्या प्रश्नांना सोडवायचे असेल तर कायद्याच्या मार्गाने सरकार ने पर्यायी मार्ग काढणे हेच सरकारच्या सरकार शाहीचे खरे कर्तव्य लक्षण होय.आणि एखादे सरकार सत्तेत आल्यानंतर त्या सरकार विरोधात जनतेने सतत संतप्त होण्याची वेळ येत असेल तर हे त्या सरकारचे अत्यंत लाजिरवाणे अपयश होय.
*_ विकास कांबळे, सोनेगावकर.(पत्रकार: ग्रामपंचायत आणि सरपंच, धाराशिव जिल्हा.)*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp