
फिरत्या एंडोस्कोपी रुग्णालयाचा महापराक्रम – ११ तासांत ५३ रुग्णांची एंडोस्कोपी . न भूतो न भविष्यती.
भारत देशाच्या इतिहासात अनेक रेकॉर्ड ब्रेक वैद्यकीय शिबिरे झाली आहेत. परंतु एंडोस्कोपीच्या क्षेत्रात आजवरच्या इतिहासातील सर्वांत मोठे शिबिर काल दि २६ ऑक्टोबर २०२४ रोजी लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात असलेल्या एक छोटयाश्या ४००० लोकसंख्येच्या तळेगाव भोगेश्वर या गावात पार पडला.
हे शिबिर सकाळी ८:३० पासून सुरु झाले आणि रात्री ८ वाजता त्याचे काम संपवावे लागले तरीही रुग्णांची रीघ सुरूच होती.
गॅलक्सी हेल्थकेअर फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट नांदेड द्वारा संचालित महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पहिल्या फिरत्या एंडोस्कोपी रुग्णालयाच्या टीमने हा विक्रम मांडला अहे.
मोठमोठ्या रुग्णालयात अशक्यप्राय असणारे हे शिबीर संपन्न करण्यासाठी टीम गॅलॅक्सीला सहकार्य करणारे तज्ज्ञ डॉक्टर्स उदगीरच्या उदयगिरी हॉस्पिटलचे सर्जन डॉ. माधव चंबुले, नांदेडच्या फिनिक्स हॉस्पिटलचे संचालक आणि जेष्ठ फिजिशियन डॉ अनंत सूर्यवंशी, डॉ कृष्णा घोडजकर, गॅलक्सी हॉस्पिटल नांदेडचे सहकारी डॉक्टर्स, डॉ संदीप दरबास्तवर, डॉ जवाद यांचे ऋण आम्ही शब्दांत व्यक्त करू शकत नाही. या डॉक्टरांच्या सहकार्याशिवाय हे काम कल्पनेच्या बाहेरच राहिले असते. गॅलक्सी हॉस्पिटलचे जेष्ठ एंडोस्कोपी तंत्रज्ञ श्री गोविंद वाघमारे, श्री संग्राम सोलपुरे, श्री विजय कोतुरवार, फार्मसिस्ट श्री शिवानंद शिरगिरे, पॅथॅालॅाजी लॅब तंत्रज्ञ श्री अमर आणि श्री सिराज यांनी घेतलेले अपार परिश्रम हे या शिबिराच्या यशस्वीतेचे अष्टरत्न आहेत हे मला नमूद करावेच लागेल.
या शिबिराची सुरुवात ही सरस्वती पूजन करून माझ्या प्राथमिक शाळेचे शिक्षक श्री हल्लाळे गुरुजी, श्री भोळे गुरुजी आणि श्री तुरेवाले गुरुजी यांच्या स्वागत आणि उपस्थित डॉक्टरांच्या सत्काराने झाली. उद्घाटन श्री नरसिंग काळे आणि डॉ माधव चंबुले यांच्या हस्ते करण्यात आले.
सकाळी ८:३० वाजता रुग्ण तपासणी सुरू झाली. यात प्रत्येक रुग्णाची हिस्ट्री, शारीरिक तपासणी, वजन, उंची आणि बीएमआय घेऊन नंतर रक्त तपासणी करण्यात आली ( CBC, HIV, HBsAg anti HCV), त्यानंतर तोंडाद्वारे दुर्बिणीने तोंड, अन्ननलिका, जठर आणि लहान आतड्याचा सुरुवातीचा भाग याची तपासणी करण्यात आली. यावेळी प्रत्येक रुग्णाला जरुरी औषधे मोफत देण्यात आली.
शेवटचा रुग्ण रात्री ८ वाजता तपासण्यात आला.
एकूण ५३ रुग्णांची या शिबिरात एंडोस्कोपी करण्यात.
हे शिबिर यशस्वी करण्यासाठी माझे प्राथमिक शाळेचे वर्गमित्र श्री नागनाथ जोगी, श्री सोपान धनेगावे, श्री मालबा घोणसे, श्री सुधाकरपाटील, श्री शिवाजी नवाडे, श्री नामदेव माचे, श्री हसन सय्यद यांनी मागील २ आठवडे प्रचंड मेहनत घेतली नसती तर हा कँप अशक्य होता.