– डॉ. आ. ह. साळुंखे
शिक्षणाला अग्रक्रम हवा
सप्रेम नमस्कार,
मी गेली ५० वर्षे गंभीर स्वरूपाचं लेखन करीत आलो आहे. त्यापेक्षाही जास्त काळ मी शाळा, महाविद्यालयांतून अध्यापन करण्यात अथवा अन्य मार्गांनी प्रबोधन करण्यात व्यतीत केलेला आहे. स्वाभाविकच, माझ्या दृष्टीनं शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा आणि एकूण समाजाचाही अग्रक्रमाचा विषय असायला हवा असं मला वाटतं. शिक्षणाचं हे महत्त्व ध्यानात घेऊनच आधुनिक काळात महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगे महाराज, डॉ. पंजाबराव देशमुख, कर्मवीर भाऊराव पाटील आणि शिक्षणमहर्षीं बापूजी साळुंखे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्याचा एक महत्त्वाचा घटक म्हणून शिक्षणाकडं पाहिलं आहे. यांच्यापैकी काही व्यक्तींनी तर शिक्षण हेच आपल्या आयुष्याचं एकमेव व्रत मानले. त्याचा लाभ कोट्यवधी व्यक्तींना आणि कुटुंबांना झाला आहे. आपली मुलं आणि मुलीही उत्तम शिक्षण घेऊन जगाच्या कानाकोपऱ्यांत आपलं कर्तृत्व गाजवू लागली आहेत.
एका बाजूनं ही अतिशय स्वागतार्ह आणि अभिनंदनीय बाब असली, तरी आपल्याला दुसऱ्या एका बाजूचा विचार केला पाहिजे. कोणत्याही क्षेत्रात मोजक्या व्यक्तींनी अत्युच्च शिखरं पादाक्रांत केली, तर ती गोष्ट कौतुकाचीच आहे; पण बाकीचा बहुसंख्य समाज हा जर उत्तम दर्जाच्या शिक्षणाला मुकत असेल, तर ती कोणत्याही समाजाच्या दृष्टीने अभिमानाची बाब नव्हे.
सर्वसामान्य, अगदी गोरगरीब, कष्ट करणाऱ्या, हातावरचे पोट असणाऱ्या, रोज कमावलं तर खाता येईल, अशी स्थिती असलेल्या कुटुंबांतील मुला-मुलींमध्येही उच्च कोटीची प्रतिभा, बुद्धिमत्ता आणि गुणवत्ता असते; पण
केवळ प्रतिकूल परिस्थितीमुळं जर त्यांना शिक्षण आणि त्यातही दर्जेदार शिक्षण मिळाले नाही, तर लहान वयातच त्यांच्या प्रतिभेचे अंकुर खुडले जातात. त्यांचा विकास कुंठित होतो. दारिद्र्य त्यांच्या गुणवत्तेला फुलूच देत नाही. ही केवळ त्या व्यक्तीची आणि त्या कुटुंबाची हानी नसते, तर ती आपल्या संपूर्ण समाजाची, राष्ट्राची आणि एकूण मानवजातीची ही फार मोठी हानी असते. त्यांची बौद्धिक क्षमता पूर्णपणे फुलून येणारे शिक्षण त्यांना मिळालं, तर त्यांच्या कर्तृत्वात जमीन अस्मानाचा फरक पडू शकतो. संपूर्ण समाजाला समृद्ध होण्यासाठी या घटनेचा लाभ होऊ शकतो.
आपल्याला हवे असलेले वेगवेगळ्या क्षेत्रांतील उत्तम दर्जाचे तज्ज्ञ त्यामुळं आपल्याला मिळू शकतात. गेल्या दीड-पावणेदोनशे वर्षांत आपण हे परिवर्तन मोठ्या प्रमाणात पाहिलं आहे. ज्यांच्या आधीच्या कित्येक पिढ्या निरक्षर होत्या, त्यांची मुलं आणि नातवंडं आता आकाशाला भिडण्याइतकी उत्तुंग झेप घेऊ लागली आहेत. म्हणूनच आपल्याला शिक्षणाच्या बाबतीत अतिशय गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे. उत्तम दर्जाच्या शिक्षणामुळंच आपल्या पुढच्या सर्व समस्या सहजतेनं सोडविण्याचं सामर्थ्य आपल्या समाजात निर्माण होईल, असं मला वाटतं.
उच्च दर्जाचे शिक्षण मिळाले. त्यामुळे उत्तम संधी मिळाल्या. महत्त्वाच्या पदांवर जाता आले. संपत्ती, प्रतिष्ठा मिळाली, ही गोष्ट चांगलीच आहे; पण त्याबरोबरच किमान दोन पथ्ये पाळणे अत्यावश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला मिळालेले शिक्षण केवळ आपल्या गुणवत्तेमुळे आणि कर्तृत्वामुळे मिळाले आहे, त्याचे श्रेय दुसऱ्या कुणाला नाही, अशा समजुतीत राहता कामा नये. आपल्या कर्तृत्वाचे काही श्रेय आपण जरूर घ्यावे; पण त्याबरोबरच आधीच्या काही महामानवांनी आपले आयुष्य खर्ची घालून आपल्याला शिक्षणाच्या संधी प्राप्त करून दिल्या आहेत, हे विसरता कामा नये.
आपल्या शिक्षणाचा लाभ योग्य त्या स्वरूपात स्वतःला जरूर घ्यावा; पण निदान थोडं तरी मागं वळून पाहणं हे आवश्यक आहे. आपली जी भावंडं या संधींना मुकलेली आहेत. वंचित राहिलेली आहेत. त्यांना चांगल्या संधी प्राप्त करून देण्यासाठी आपण कोणत्या ना कोणत्या मार्गानं त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. मी या भावंडांची संकल्पना केवळ कौटुंबिक दृष्टीने पाहत नाही, तर सामाजिक दृष्टीनं पाहतोय. समाजातील जे लोक अडीअडचणीत असतील तर त्यांच्या मुला-मुलींपर्यंत विविध प्रकारच्या संधी पोचवण्यासाठी आपण आपल्या ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. मग तो उच्च दर्जाचे संशोधन करण्याच्या मार्गाने असो, शिक्षण पद्धतीमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने असो अथवा समाजापुढच्या कठीण समस्या सोडवण्याच्या दृष्टीने असो.
एका बाजूनं शिक्षणाचा असा विधायक उपयोग करत असताना दुसऱ्या बाजूनं आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजातील कोणत्याही घटकाला विघातक वा विध्वंसक होता कामा नये. याचीही काळजी घेतली पाहिजे. आपण प्राप्त केलेल्या ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान यांचा आपल्याकडून दुरुपयोग होता कामा नये. यासंदर्भात मला अतिशय क्लेशकारक वाटत आलेले एक उदाहरण आवर्जून सांगतो. १९८९ मध्ये माझे ‘हिंदू संस्कृती आणि स्त्री’ हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यांच्या मनोगतात मी मला वाटणारी एक काळजी मांडली होती. एक हजार पुरुषांच्या मागं ९३० स्त्रिया असं प्रमाण त्या काळात सातत्यानं समोर येत होते. हा स्त्री-पुरुष संख्येच्या प्रमाणातील ढळलेला समतोल तेव्हा अतिशय चिंतेचा वाटला होता; पण अतिशय खेदाची गोष्ट अशी, की त्यानंतर परिस्थिती ढासळतच गेली आणि अलीकडे तर काही ठिकाणी एक हजार पुरुषांच्या मागे आठशेपेक्षाही कमी स्त्रिया अशी स्थिती झाली असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. याचे किती दुष्परिणाम होतील, त्याची कल्पना केली, तरी छातीत धडकी भरते. जे गोरगरीब, निरक्षर, विज्ञान, तंत्रज्ञान प्राप्त करण्याची संधी न मिळालेले लोक हे करतात, त्यांना मी फारसा दोष देणार नाही. याबाबतीत मला जे सर्वांत मोठे गुन्हेगार वाटतात, ते व्यक्तिगत लोभापायी आपल्याला प्राप्त विज्ञान, तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून सर्वसामान्य लोकांना स्त्रीभ्रूणहत्या करण्यास प्रवृत्त करतात. प्राप्त झालेल्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या दुरुपयोगाचं फक्त एक उदाहरण सांगितलं. अशी अनेक उदाहरणे सांगता येतील.
आपल्याला प्राप्त झालेलं शिक्षण, यातून मिळालेलं ज्ञान आणि उपलब्ध झालेल्या विविध संधी या विनाश घडविण्यासाठी नसून नवनिर्मिती घडविण्यासाठी आहेत, हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. विनाश घडवण्यात क्षणिक परंतु क्रुर आनंद असेल; परंतु निर्मिती करण्याचा आनंद हा स्वतःलाही आणि इतरांनाही फुलविणारा असतो. शिक्षणानं हेच घडायला हवं.
( शब्दांकन : संजय शिंदे )
( लेखक हे ‘ज्येष्ठ विचारवंत असून, संस्कृतचे निवृत्त प्राध्यापक’ तसेच राज्याच्या सांस्कृतिक धोरण समितीचे माजी अध्यक्ष आहेत. )
साभार : दैनिक सकाळच्या ‘सप्तरंग’ पुरवणी मधून