आता सांगा सरकारची भूमिका काय आसावी..
कोल्हापूर / प्रतिनिधी : जुन्या पेन्शनसाठी राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. आज आंदोलनाचा चौथा दिवस असताना कोल्हापुरमध्ये मात्र वेगळेच चित्र दिसत आहे.आम्हाला पेन्शन नको पण आम्हाला काम द्या, या मागणीसाठी काही बेरोजगारांनी एकत्र येत एक मोर्चा काढला.त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात मोर्चा आणि प्रतिमोर्चाची मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे
सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शनसाठी गेल्या चार दिवसांपासून संपावर आहेत. त्यांच्या या संपाविरोघात आता कोल्हापुरातील बेरोजगार तरुणांनी आंदोलन छेडलं आहे. जुनी पेन्शन थांबवा आणि महाराष्ट्र वाचवा, अशी भूमिका घेत त्यांनी हा मोर्चा काढला आहे. कोल्हापुरच्या ऐतिहासिक दसरा चौकातून हा मोर्चा काढण्यात आला. आम्हाला पेन्शन नको आम्ही अर्ध्या पगारावर काम करायला तयार आहे, पण आम्हाला काम द्यावं, अशी मागणी या बेरोजगार तरुणांकडून करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील हेही या मोर्चात सहभागी झाले होते. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर भाष्य करत टीकाही केली. कोल्हापुरातील दसरा चौकात बेरोजगारांचे आंदोलन झाले. तर दुसरीकडे टाऊन हॉल परिसरात सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या ठिकाणी कर्मचाऱ्यांचे आंदोलन बेकायदेशीर म्हणणाऱ्या आंदोलक कर्मचाऱ्यांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पुतळ्याला चपलांचा प्रसाद दिला. तर थाळी नाद करत पेन्शन नाकारणाऱ्या राज्यकर्त्यांचा निषेध नोंदवण्यात आला.