10 जुलैपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करणे आवश्यक
लातूर, (जिमाका) : कोरोना संसर्गामुळे आई-वडील, दोन्ही पालक गमाविलेल्या बालकांच्या शिक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बाल निधी प्राप्त झाला आहे. या निधीचा पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात येणार असून यासाठी 10 जुलै 2023 पर्यंत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लातूर जिल्ह्यातील कोविड-19 मुळे एक व दोन्ही पालक गमावलेल्या 3 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांच्या शैक्षणिक खर्चासाठी बाल निधीतून मदत केली जाणार आहे. यासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाकडे अर्ज करणे आवश्यक आहे. या अर्जासोबत बालकाचे शाळेचे बोनाफाइड, आई-वडील यांचा कोविड पॉझिटिव्हचा पुरावा, आई-वडील मृत्यू दाखला झेरॉक्स प्रत, पालक संयुक्त राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असलेल्या बँकेच्या पासबुकची झेरॉक्सप्रत, बालकाचे आधारकार्डची झेरॉक्स प्रत अशी कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील पहिला मजल्यावर असलेल्या जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात 10 जुलै 2023 पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी कळविले आहे.