आजचा सुविचार

उत्थानाचे सर्व मार्ग पृथ्वीच्या पाठीवरून जातात आणि आकाशात झेपावतात. मग इतिहासाच्या खोल गर्तेत हे कुणाचे पुनरुत्थान चालले आहे? कुणाची प्राणप्रतिष्ठा चालली आहे ही?

समुद्रावर पडणाऱ्या पावसाचे मोती बनतही असतील; पण त्यांनी कुणाची भूक भागणार आहे?
मेल्यानंतर दिसणाऱ्या स्वर्गाचे मजल्यावर मजले कोणी रचले? त्याचे प्रवेशव्दार उघडण्याचे आणि बंद करण्याचे अधिकार कोणी आपल्या हातात घेतले?
दफनाच्या वेळी पार्थिवासोबत पास (आधार) पुसण्याची सक्ती कोणी केली?
निरर्थक संकल्पनांना शरण जायला कोणी भाग पाडले?
त्या जबरदस्तीचे श्रद्धेत रूपांतर कसे झाले?
गंमत आहे, परमेश्वर नाही; पण त्याचे पुजारी आहेत.
नरक नाही; पण त्याची भीती दाखवून धन उकळणारे माफीया आहेत.
स्वर्ग नाही; पण त्यात प्रवेश मिळवून देणारे दलाल आहेत.
ही कसली बाजारपेठ आहे? जिच्यातल्या ग्राहकांच्या मनात आपल्या फसवणुकीचा विचारही येत नाही.
जे अस्तित्वातच नाही, ते मिळवण्यासाठी चाललेली अजब धडपड आहे. स्वर्ग हवा, मग तो जीवंतपणी का नको?

स्वर्गात राहणाऱ्यांना विचारलं, तर ते कधीही सांगणार नाहीत की, नरकात राहणाऱ्यांचं शोषण करून त्यांनी ते मिळवलंय. आणि मृत्यूनंतरचा स्वर्ग पण त्यांनाच हवा आहे.

संकल्पनांना सत्य मानून तुमच्यामध्ये रुजविण्यात जे कमालीचे यशस्वी झाले आहेत; पण प्रत्यक्षात जे कोणीच नाहीत, त्यांच्याकडे तुम्ही मुक्तीची भीक मागत आहात.

लोकहो, आत्मा नाही, परमात्मा नाही, पुनर्जन्म नाही, पूर्वजन्म नाही, स्वर्ग नाही, नरक नाही या सगळ्या भ्रामक कल्पना आहेत.
कल्पनेपेक्षा, शाश्वत (वर्तमानात) जगायला शिका.🌷🍀 *आपले मंगल होवो* 🍀🌷

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp