++ जय जिजाऊ मित्रांनो ,

  • गेले अनेक वर्षे बहुजन हिंदू समाज आपल्या विनंतीनुसार दरवर्षी परंपरागत गुढी न उभारता छत्रपती संभाजी महाराज स्मृतीदिन लक्षात घेऊन घरा घरावर व गावोगावी ऊंच भगवा ध्वज उभारून गुढीपाडवा सण साजरा करत आहे . जगातील कालबाह्य धार्मिक परंपरा नाकारून वर्तमानातील नवे पर्याय दिले तर त्या सणांचे व दिवसांचे महत्त्व टिकून राहते. शिवधर्म संसदेने प्राचिन मानलेल्या गुढी पाडवा सणाचे स्वरुप बदलून अतुलनीय अशी सांस्कृतिक धार्मिक क्रांती सहज घडवून आणलेली आहे . दुर्दैवाने धार्मिक क्षेत्रातील क्रांतीचा इतिहास अत्यंत रक्तरंजित आहे. या पृष्ठभूमीवर बहुजन हिंदू समाजाने सहजपणे, स्वेच्छेने व आनंदाने गुढी पाडवा सणाचे महत्त्व समजून सकारात्मक बदल घडवून आणला आहे. यासाठी सुमारे दहा वर्षे जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड , सम विचारी चळवळीतील हजारो वक्ते, शाहीर , प्रबोधनकार व कार्यकर्ते यांनी समाजातील सर्व स्तरातील लोकांना समजेल अशा भाषेत संवाद साधला आहे. अशा सर्वच ज्ञात व अज्ञात व्यक्तींचे खूप खूप अभिनंदन व पुढील काळात सदिच्छा. वास्तविक ब्राह्मण पुरोहितांनी या बदलाचे आनंदाने स्वागत करायला हवे. परंतु ते समाजात विष पसरविण्याचे काम करत आहेत असे जाणवले.

+++ मित्रांनो , आपण सर्व मंडळींनी एक ईतिहास निर्माण केला आहे. परंतु आम्ही अशा जागतिक स्तरावर नावलौकिक प्राप्त ऐतिहासिक घटनाकडेही अगदी सहजपणे पाहत आहोत . केवळ साधारण विस वर्षांपूर्वी मराठा सेवा संघाच्या माध्यमातून आपण याबाबत विश्लेषण सुरु केले असावे. गुढीपाडवा सण म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा दिवस. याच दिवशी छत्रपती संभाजी महाराज यांची निघृण हत्या करण्यात आली होती. त्यांचे शिर धडावेगळे करुन तुळापुर वढू परिसरात उंच बांबूवर लटकावून फिरवले होते. आजही आमच्या घरातील सणाच्याच दिवशी दुर्दैवाने कोणी व्यक्ती अगदी नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू पावले तर आपण पुढे तो सण साजरा करणे बंद करतो अथवा अगदी साधेपणाने साजरा करतो. या पृष्ठभूमीवर छत्रपती संभाजी महाराज यांचा घोर अपमान जनक मृत्यू झाला तो गुढीपाडवा स्वरुप बदलून बहुजन हिंदू समाज साजरा करत आहे . कारण छत्रपती संभाजी महाराज आमच्यासाठी सर्व काही होते. केवळ पंधरा वर्षांत एवढे मोठे सांस्कृतिक धार्मिक परिवर्तन घडवून आणले. या परिवर्तनाच्या क्रांतीकारकांना आपल्या क्रांतीचा इतिहास लिहिण्याची व अनुभवण्यासाठी संधी मिळाली आहे. हा सुद्धा एक इतिहास आहे . एवढ्या मोठ्या क्रांतीचे श्रेय रयतेलाच देण्याचा सुज्ञपणा प्रदर्शित करून आम्ही छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचा गौरव केला आहे असे वाटते …
++ मित्रांनो , असे असले तरी सध्या गुढीपाडवा निमित्ताने नववर्ष सदिच्छा व्यक्त करण्यासाठी आम्ही परंपरागत गुढीचेच चित्र एकमेकांना फॉरवर्ड करत आहोत असे लक्षात आले. माझी चित्रकला वा अॅनिमेशन क्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी मंडळीस विनंती आहे की कृपया आपण केवळ भगवा ध्वज व सोबत छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा असलेले सदिच्छा संदेश देणारे चित्र तयार करून प्रसारित करावे . २०२० मधिल गुढीपाडवा प्रसंगी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा अशा चित्रांनीच व्हाव्यात.
++ मित्रांनो , गुढीपाडवा सण व त्याबाबतची माहिती वा मिथके आजही अनैतिहासिक व गुंतागुंतीचे आहेत. ई.स. ७८ मध्ये शालीवाहन शकाची सुरुवात मराठा राज्यकर्त्यांनी केल्याचा इतिहास नाही. परंतु शक राजा चेष्टन याने ई.स.७८ मध्ये शक सुरू केला होता असे नमूद आहे. पुढे सातवाहनांनी शकांना हरविले होते. तोच शक मराठा शालीवाहन संवत्सर झाला . शक हा शब्द संवत्सर पर्यायी झाला आहे. सृष्टी निर्माण , श्रीराम विजय , कृषी जीवन, शालीवाहन विजय, बहुजन हिंदू वर्ष प्रारंभ असे विविध सांस्कृतिक धार्मिक व ऐतिहासिक प्रसंग या शकाशी जोडले गेले असावेत असे वाटते. महाराष्ट्र व भारतीय विविध राज्यांतील पंचांगे वा नववर्ष सुरुवात एक नाही . तसेच उत्तर वा दक्षिण महिने सुरुवात सारखी नाही. बहुजन हिंदू वर्ष व ब्राह्मण हिंदू वर्ष एक नाही. सर्व ब्राह्मण पोटजातीतील पंचांगे एक नाहीत .. आता सर्रास सर्व कॅलेंडर व पंचांग बाजारात विकत मिळतात. यामुळे ब्राह्मणांचे नुकसान होते असे ते म्हणतात..
++ मित्रांनो , या निमित्ताने आपण मराठी महिने व तिथी बाबत धावती माहिती समजून घेणे गरजेचे आहे. गुढीपाडवा पहिला दिवस असणारे भारतीय मराठी वर्ष बारा महिन्यांचे असते. ते चंद्र कलाशी जोडले आहे. दर पंधरा दिवसांनी अमावस्या व पौर्णिमा आलटून पालटून येत असतात. चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ फाल्गुन असे बारा महिने आहेत. एकूण दिवस ३५४ दिवस. याला चांद्रवर्ष म्हणतात . १५-१५ दिवसांचे कृष्ण व शुक्ल पक्ष. १ ते १५ व १ ते १५ तिथी किंवा तारखा . जगातील सर्व क्षेत्रात व धर्मात सूर्य कॅलेंडर येण्यापूर्वी चांद्रवर्ष वापरात होते. आजही ईस्लामचे लोक चंद्र कॅलेंडर वापरतात. तर सर्व हिंदू सण साजरा करणे यासाठी हिंदू तिथी व कॅलेंडर वापरतात . परंतु सन १९५७ पासून भारत सरकारने दैनंदिन वापरासाठी सूर्य कॅलेंडर स्विकारले . सूर्य कॅलेंडर बारा महिन्यांचे असते तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते या गतीशी जोडले आहे. पृथ्वी सूर्याभोवती एक राऊंड पूर्ण करण्यासाठी जो वेळ घेते तो वेळ म्हणजे एक सौर वर्ष होय . यासाठी एकूण ३६५ दिवस व सुमारे सहा तास लागतात . पुढे युनोने जागतिक पातळीवर सरसकट सूर्य कॅलेंडर स्विकारले. परिणामी सर्व देशांत सूर्य कॅलेंडर वापरतात. भारतीय सरकारने वर सांगितलेले हिंदू कॅलेंडर व सूर्य कॅलेंडर वापरात ठेवले आहेत .
++ मित्रांनो , छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक शक १६७४ मध्ये सुरू केला होता. पुढे छत्रपती कमजोर होताच पेशव्यांनी सन १७७७ मध्ये शिवराज्याभिषेक शक बंद केला व फसली म्हणजे मुस्लिम शक सुरू केला होता. राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक झाल्यावर पुन्हा २ एप्रिल १८९४ पासून मूळ शिवराज्याभिषेक शक सुरू करण्यात आला . आज भारतात भारतीय राष्ट्रवाद निर्माण करुन नवपिढीचे सामाजीकीकरण करण्यासाठी शिवराज्याभिषेक शक सुरू करण्यात राष्ट्रीय हित आहे असे वाटते .
++ मित्रांनो , सूर्य कॅलेंडर येशू ख्रिस्त जन्माशी जोडले आहे. गेल्या दोन हजार वर्षांत त्यात बरेच मोठे बदल झाले आहेत. भारतीय चंद्र कॅलेंडर किती जूने आहे ? याबाबत निश्चित माहिती नाही. सृष्टी निर्माण म्हणजे पृथ्वी निर्माण की इतर काही ?? असो. आम्ही जे सूर्य कॅलेंडर मानतो , त्यानुसार ई.स. ७८ मध्ये आपले भारतीय शालीवाहन शक- चंद्र कॅलेंडर सुरू झाले होते. ई.स. पूर्व ५८ मध्ये विक्रम संवत्सर चंद्र कॅलेंडर सुरू झाले. भारतीय हिंदू वर्ष ३५४ दिवसांचे चांद्र वर्ष आहे. चंद्रवर्ष व सूर्य वर्ष यांचा मेळ घालण्यासाठी ( ३६५ – ३५४ = ११ ) दिवस दरवर्षी अॅडजेस्ट करणे आवश्यक होते. यासाठी साधारण ११×३=३३ असे दर चौथ्या वर्षी भारतीय हिंदू कॅलेंडर मध्ये अधिक महिना धरण्यात आला आहे. संक्रांत १४ जानेवारी , मृग नक्षत्र ७ जून फिक्स आहे . याप्रमाणेच सूर्य कॅलेंडर मध्ये दरवर्षी सहा तास शिल्लक राहतात. त्याचा मेळ ६×४=२४ तास . असा घालतात . म्हणून दर चार वर्षांनी सूर्य कॅलेंडर वा इंग्रजी वर्षात एक दिवस जास्त येतो. फेब्रुवारी महिना २८ ऐवजी २९ दिवसांचा होतो . याला लिप यिअर असे म्हणतात. मराठी वर्षांत अधिक महिना असतो तर इंग्रजी वर्षात अधिक दिवस असतो. ही वेळेची अॅडजेस्टमेंट आहे. यात पाप पुण्य वा पुजा पाठ व शुभ अशुभ उपवास मुहूर्त भटजी अंधश्रद्धा दक्षिणा देऊन मुक्त होण्यासाठी काही कारण नाही. असे करणे अवैज्ञानिक अविवेकी अविचारी आहे. ब्राह्मणी धर्म पालन आहे. भारतीय चंद्र कॅलेंडर व भारतीय सण पूर्ण कृषी संस्कृती संबंधित आहेत . यात शुभ अशुभ उपवास मुहूर्त या अवैज्ञानिक बाबींचा समावेश नाही . वर स्पष्ट केले आहे यावरून आपल्या लक्षात आले असेल की भारतासह सर्व जगभर शेकडो कॅलेंडर वापरतात. परंतु जागतिक व्यवहार सूर्य कॅलेंडर नुसार चालतात. हिंदू मुस्लिम ख्रिश्चन जैन पारसी शिख ज्यू अशा सर्वच धर्मांचे वेगवेगळे कॅलेंडर आहेत. त्या त्या धर्मांचे लोक आपापले सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आपल्या धर्मांचे कॅलेंडर वापरतात . असे असले तरी सर्व जगभर दैनंदिन व्यवहारात सूर्य कॅलेंडर म्हणजे इंग्रजी वर्षच वापरतात .
++ मित्रांनो , पृथ्वी व चंद्र सतत स्वताभोवती व सूर्या भोवती फिरत असतात. पण त्यांची गती व त्रिज्या एक नाहीत. म्हणून ते फिरताना कधी एका रेषेत येतात. परिणामी त्यांची सावली एकमेकांवर पडते . यामुळे चंद्र वा सूर्य तेवढे झाकले जातात. तो भाग अंधारात जातो. याला ग्रहण लागले असे म्हणतात. सूर्य अमावस्या व चंद्र पौर्णिमा या नुसार ग्रहण लागते. ही एक नैसर्गिक बाब आहे. यात पाप पुण्य शुभ अशुभ काही नाही. तरी ब्राह्मण दान करु नये. उलट तसे करणे महापाप आहे असे संत मानतात . कृपया शाळेत जाणाऱ्या तुमच्या मुलांकडून ग्रहमाला समजून घेणे .
++ समारोप – जगातील सर्व देशांत पूर्वी चंद्र कॅलेंडर वापरात होते. भारतीय वैदिक साहित्य व ब्राह्मण समुहाने अज्ञानी बहुजन हिंदू समाजाला लुटण्यासाठी पाप पुण्य शुभ अशुभ मुहूर्त आणले. तिथी म्हणजे चंद्र कॅलेंडर मधिल तारिख व दिनांक म्हणजे सूर्य कॅलेंडर मधिल तारिख . तिथी समजण्यासाठी पंचांग लागते . जसे आज चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे चैत्र महिन्यातील एक तारीख . तर एप्रिल महिन्याची सहा तारीख. कृपया सर्वांनी समजून घेणे ही विनंती . तुम्हाला फसवणारे व दिशाभूल करणारे लोक भेटतील. त्यांच्या नादी लागू नका. मराठी महिने , तिथी , अमावस्या, पौर्णिमा , चंद्र कॅलेंडर , अधिक महिना व लिप यिअर, ग्रहण असे महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊन पाठ करा . शहाणे होण्यासाठी मुहूर्त शुभ अशुभ भविष्य हात दाखवणे यापासून दूर रहावे ही विनंती..
मराठा नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व पुढील काळात तंतोतंत पालन केले जाईल असे नियोजन करावे ही सुचना..
जय जिजाऊ…

  • आपला शिवांकित ,
    पुरुषोत्तम खेडेकर चिखली.
    मोबा. -९४२२०४६९९७ .
    Email – pkhedekar.mss@gmail.com
    दिनांक -६ एप्रिल २०१९ .
    चैत्र शुद्ध प्रतिपदा १९४१ .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp