चर्मकारांनी फक्त चर्मोद्योगच करावा काय ?
समता परिषदेचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल !
नांदेड (प्रतिनिधी) : भारतीय संविधानाने सर्वांना व्यवसाय स्वातंत्र्य दिले असले तरी संत रविदास चर्मोद्योग महामंडळ म्हणते फक्त चर्मोद्यागाच्याच फाईली दाखल करा. याबाबत थेट मुख्यमंत्र्यांनाच अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेने सवाल विचारला आहे की, “आम्ही चर्मकारांनी फक्त चर्मोद्योगच करावा काय ?”
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या शिष्टमंडळाने नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आपल्या मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. सर्व व्यवसायांसाठी कर्ज द्या आणि त्यासाठी असलेल्या जाचक अटी रद्द करा अशी मागणी प्रामुख्याने या निवेदनातून करण्यात आली आहे.
शुक्रवार दि.१९ जुलै २०२४ रोजी दुपारी अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक नेते इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले. या शिष्टमंडळात जिल्हा प्रमुख नारायण अन्नपुरे, महानगर अध्यक्ष श्रीनिवास कांबळे, नागोराव गंगासागरे, सुरेश वाघमारे, विपुल देगलूरकर, सुधाकर खैराव, परमेश्वर गंगासागरे यांचा समावेश होता.
चर्मोद्योगाबरोबरच ऑटोरिक्शा, लोडिंग ऑटो व टेम्पोसाठीही कर्ज देण्यात यावे, कर्जासाठी दोन जामिन देण्याची जाचक अट रद्द करण्यात यावी, सन २०२३ पर्यंतचे सर्व कर्ज माफ करण्यात यावे, जिल्हा कार्यालयातील जिल्हा व्यवस्थापक यांचा प्रभारीराज रद्द करुन कायमस्वरुपी पदांची नेमणूक करण्यात यावी, प्रत्येक जिल्हा कार्यालयात कर्ज फाॅर्मसह भरपूर स्टेशनरी तसेच एक झेराॅक्स मशिन उपलब्ध करुन देण्यात यावी तसेच सर्व प्रलंबित कर्ज प्रकरणे मंजूर करुन त्वरीत कर्ज वितरण करावे आदी मागण्यांचा या निवेदनात समावेश करण्यात आला आहे.
या मागण्यांची गंभीर दखल घेतली नाही तर येत्या एक ऑगस्ट रोजी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर हे स्वतः आमरण उपोषणास बसतील असा ईशारा या निवेदनातून देण्यात आला आहे. या निवेदनाची प्रत संत रविदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, मुंबई यांना पाठविण्यात आली आहे.
या निवेदनावर भीमराव गोविंदराव वाघमारे, शिवराज संभाजी कांबळे, संतोष भगवान सुर्यवंशी, संभाजी भागाराम कांबळे, नारायण तुकाराम वाघमारे, विठ्ठल धोंडीबा उकंडे, नामदेव भागाराम कांबळे, साहेबराव मारोती गंगासागरे, दादाराव नारायण वाघमारे, राजू नामदेव बनसोडे, बाळासाहेब हरिभाऊ जगताप आदींच्या सह्या आहेत.
