
ही विसंगती कशी समजून घ्यायची ? चतुर्थीला चंद्राला ओवाळणारे हात आणि आज चंद्रयान उतरल्यावर टाळ्या वाजवणारे हात एकच असणार आहेत..
ईदचा चांद बघणारे डोळे आणि चांद्रयान उतरताना बघणारे डोळे एकच असणार आहेत आज…
ही विसंगती कशी समजून
घ्यायची ?
पावसाचे चक्र समजून घेत पेपर लिहून पास झालेले हात आणि पावसासाठी महादेव कोंडणारे, प्रार्थना करणारे हात एकच असतात…
ही विसंगती कशी समजून घ्यायची ?
ती विसंगती मानव जातीच्या प्रवासातून आली आहे.
जेव्हा माणसाकडे निसर्गाचा प्रवास समजून घेणारी कोणतीच यंत्रणा नव्हती. तेव्हा आकाशातून कोणीतरी हे घडवते असे सोपे अर्थ लोकांनी लावले. साधा खोकला बरा होण्यासाठी खोकलाई नावाची देवी आहे अशी
मूर्ती अनेक ठिकाणी दिसते.इतकी अगतिकता होती. त्यातून इंद्र हा पाऊस पाडतो. गणपती आणि चंद्र यांचे नाते. सुर्य
आणि चंद्र यांचे व्यक्ती किंवा देवता म्हणून समजूत असे घडत असते.
पण ते त्या काळातील मानवाला माफ होते पण आज विज्ञानाने आपल्याला कारणमीमांसा सांगितल्यावर आपण परंपरा सोडायला हवी. नव्या मनाने या सर्व पौराणिक कथांकडे बघायला हवे. हे फक्त हिंदू धर्माला लागू नाही तर सर्वच धर्मांना लागू आहे. सर्वच धर्मात अशा कहाणी आहेत.
तेव्हा हा स्वतःशी संघर्ष असतो.हळूहळू या जुन्या परंपरेकडून आपण वास्तवाकडे जायला हवे.
पण आपण ते सोडत नाही. उदाहरणार्थ जेव्हा विजेचा शोध लागला नव्हता तेव्हा मंदिरात तेलाचे दिवे आले. पण आज विजेचा शोध लागल्यावर मंदिरात विजेचे दिवे ही आहेत, चर्च मध्ये रोषणाई आहे. पण तरीही तेलाचे दिवे आणि चर्च मध्ये मात्र मेणबत्ती आहे. त्याची काहीही गरज नसताना ते सोडवत नाही इतकाच त्याचा अर्थ आहे. कहर म्हणजे दक्षिणेकडील मंदिरात बाहेर रोषणाई पण गाभाऱ्यात मात्र फक्त तेल तुपाचे दिवे आहेत. ते सोडवत नाही म्हणून मग तेलाच्या दिव्याने कसे शांत वाटते आणि waves निर्माण होतात या विज्ञानाचा आधार आम्ही शोधत राहिलो.प्रत्येक परंपरा सोडवत नाही मग अशीच नवी वैज्ञानिक कारणमिंमासा जोडत राहिलो.
उपवास आम्ही देवासाठी नाही तर पोटाला आराम म्हणून करतो असे युक्तिवाद आले. पण मग तो उपवास अमावस्या किंवा कधीही का करत नाही ? याचे उत्तर नसते. अशी खूप उदाहरणे दिसतील आणि सर्व धर्मात दिसतील.
एक उदाहरण बघू या..माणूस मृत्यू झाल्यावर स्मशानात नेण्याची पद्धत म्हणून बघू. लाकडाची ताटी बांधून त्यावर प्रेत बांधले जाते. गाडग्यात विस्तव नेला जातो व अंतर जिथे कमी तिथे खांद्यावर नेले जाते. जेव्हा गाडीचा शोध लागला नव्हता तेव्हा खांद्यावर प्रेत नेले जात होते. काडेपेटी नव्हती तेव्हा घरात असलेला विस्तव सोबत घेतला जात होता.वीज नसल्याने लाकडावर प्रेत जाळले जात होते. आज गाडीचा शोध लागला तरीही ती मानसिकता व्हायला वेळ लागतोय. तरीही लाकडावर बांधून काही अंतर चालले जाते व खिशात काडेपेटी असताना अग्नी घरातला नेला जातो. अजूनही अनेकजण विद्युतवाहिनीत तयार होत नाहीत. राजकीय नेते तर हा आदर्श घालून देण्यापेक्षा चंदनाची लाकडात जाळून घेणे पसंत करतात..ही आपली समाज म्हणून मानसिकता आहे..
विज्ञानाने वेग धारण केल्यावर अनेकांच्या परंपरा सुटत आहेत.पण तो वेग कमी आहे. आपण करतो ते निरर्थक आहे हे कळते पण मनात अनामिक भीती असते. काही झाले तर …? पुन्हा समाजाचा दबाव असतो. सर्व धर्मातील रक्षक हे या निरर्थक परंपरा म्हणजे धर्म समजतात. त्यातून त्या निरर्थक परंपरा मोडण्याला विरोध करणे म्हणजे धर्माला विरोध असा अर्थ घेतला जातो. एक एक परंपरा संपली तर धर्म संपेल असे ते गृहितक असते पण खरा धर्म यापलीकडे असतो. न लगती सायास असा तो धर्म असतो,भक्ती योगमार्ग असतो. संतांनी तोच सांगितला. यावर भर द्यायला हवा. त्यामुळे जुनाट परंपरा म्हंजे धर्म नव्हे ही भूमिका सुशिक्षित समूहाने घ्यायला हवी. पण अडचण ही आहे की सुशिक्षित असणारे च आज प्रत्येक परंपरा कशी वैज्ञानिक आहे हे सांगण्यात धन्यता मानतात. त्यांच्यावर काम करणे हेच आज सर्वात मोठे आव्हान आहे. यातून आपल्या समाजात दांभिकता आली आहे. आम्ही एकाचवेळी चांद्रयान आणि चतुर्थी ला टाळ्या वाजवत राहतो.
तेव्हा आजचे यश नक्कीच साजरे करू पण वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्प ही करू या.