6 मे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा स्मृतिदिन या लेखाच्या माध्यमातून अभिवादन.
छत्रपती शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या घराण्यातील रक्ताचे आणि विचारांचे खरे वारस आहेत.हे लक्षात असावे. त्यांचे मूळनाव यशवंतराव घाटगे होय.
त्यांचा जन्म 26 जून 1874 ला झाला.त्यांच्या आईचे नाव राधाबाई तर वडिलांचे आबासाहेब होते.त्यांचे घराणे हे कागलचे होते. कोल्हापूर संस्थान छत्रपतीच्या गादीवर रक्ताच्या नात्याने सर्वात जवळचे वारसदार म्हणून रीजंट आबासाहेब यांच्या ज्येष्ठ पुत्राची म्हणजेच यशवंतरावांची निवड ब्रिटिश संमतीने झाली .चौथ्या शिवाजी महाराजांच्या राणी आनंदीबाई यांनी त्यांना 17 मार्च 1884 रोजी विधिवत दत्तक घेतले.त्यांचे छत्रपती शाहू हे नामकरण झाले.
१.📝
*शिक्षण,संस्कार** :-
शाहू महाराज यांना शिक्षणासाठी राजकोट येथे राजकुमार कॉलेजला जानेवारी 1886 ला पाठविले. त्या ठिकाणी शिक्षण चालू असतानाच 20 मार्च 1886 वडील आबासाहेब महाराज यांचे निधन झाले. त्यामुळे शाहू महाराज कोल्हापूरला परत यावे लागले. त्यावेळी शाहू महाराज यांचे वय बारा वर्षे होते.वडिलांचे वय तीस वर्षे होते .शाहू महाराजांच्या आईसुद्धा महाराज तीन वर्षाचे असताना वारल्या होत्या.वडिलांचे निधन हे अतिमद्य सेवनाने झाले होते. संपूर्ण कारकिर्दीत शाहू महाराजांनी मद्याला स्पर्श ही केला नाही.पुन्हा शिक्षणासाठी राजकोटला गेले .त्या ठिकाणी अभ्यासा व्यतिरिक्त नेमबाजी, कुस्ती ,अश्वारोहण इत्यादी खेळ खेळत. राजकोट नंतर शिक्षणाची सोय धारवाड येथे आयसीएस अधिकारी स्टुअर्ट मिटफोर्ड फ्रेझर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाली. त्यांना सोबत देशी शिक्षक केशवराव गोखले तसेच पालक म्हणून बुवासाहेब इंगळे यांची नियुक्ती केली.1889 ते 1892 इंग्लिश, गणित ,इतिहास,भूगोल,अर्थशास्त्र या विषयात महाराज पारंगत झाले. प्रत्यक्ष प्रशिक्षण म्हणून फ्रेझर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर भारत व दक्षिण भारत अभ्यास दौरे आयोजन केले.यात नोव्हेंबर 1890 नाशिक, बनारस, अलाहाबाद कलकत्ता ,आग्रा, फत्तेपूरशिक्री ,दार्जिलिंग दिल्ली ,जयपूर ,अजमेर मुंबई व कोल्हापूर परत हा 5000 मैलाचा प्रवास झाला. यानंतर वर्षभराने नोव्हेंबर 1891ला दक्षिण भारतदौरा यात विजापूर हैदराबाद तंजावर मैसूर तसेच पुढे सिलोन पर्यंत गेले.तर ऑक्टोबर 1892 ला तिसरा अभ्यास दौरा झाला. यात बडोदा जयपुर जोधपुर अलवार भरतपुर मथुरा अलाहाबाद हरिद्वार अमृतसर लाहोर पेशावर सक्कर मुलतान कराची आणि शेवटी मुंबई असा प्रवास केला. या अभ्यास दौऱ्यात महाराजांना खूप गोष्टी प्रत्यक्ष पाहायला आणि शिकायला मिळाल्या. ज्या आपल्या संस्थानात एक राजा म्हणून अंमल करण्यास मार्गदर्शक ठरल्या.ते स्वतः उच्च विद्याविभूषित बनले.
1एप्रिल 1891ला बडोदा सरदार गुणाजीराव खानविलकर यांच्या लक्ष्मीबाई या कन्येशी छत्रपती शाहू महाराज यांचा विवाह झाला.
गुरुवर्य फ्रेझर यांच्याबाबतीत छत्रपती शाहू महाराज त्यांना फ्रेंड फिलॉसॉफर अँड गाईड असा गौरव करतात.कारण शिक्षणानंतरही या दोघांमध्ये पत्रव्यवहाराच्या माध्यमातून सतत संवाद होत असे .प्रसंगी महाराजांना ते मार्गदर्शनही करत असत.
२🚩राज्यारोहण समारंभ:-
शाहू महाराजांचे शिक्षण व प्रशिक्षण संपल्यानंतर 2 एप्रिल 1894 ला त्यांच्याकडे राज्याचे सर्वाधिकार सोपविण्यात आले. त्यावेळी शाहू महाराजांनी प्रसिद्ध केलेला जाहीरनामा अतिशय क्रांतिकारक होता.तो असा “आमची सर्व प्रजा सतत तृप्त राहून सुखी असावी,तिचे कल्याणाची सतत वृद्धी व्हावी व आमचे संस्थांनचे हर एक प्रकारे सदोदित भरभराट होत जावी अशी आमची उत्कट इच्छा आहे…..”
👍प्रशासन यंत्रणा :-
राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर प्रशासन व राज्याचे खाजगी खात्यात असणारे अधिकारी व कर्मचारी यांचे विश्लेषण करण्यात आले .त्यावेळी 71 सरकारी अधिकाऱ्यांपैकी 60 ब्राह्मण तर 11 इतरजण होते.खाजगी खात्यात 52 अधिकाऱ्यांपैकी 45 ब्राह्मण 7 इतरजण होते.या इतर मध्ये ब्रिटिश हिंदी ख्रिश्चन पारशी व प्रभू होते.म्हणजे ज्यांचे राज्य समजले जात होते त्या मराठा बहुजनालाच स्थान नव्हते. शिकलेल्या लोकात सुमारे 80 टक्के ब्राह्मण राहिलेल्या 20% यात मराठा जैन लिंगायत मुसलमान लोक होते. भरीसभर म्हणून बहुजन समाज खेड्यात राहत होता. त्या खेड्यात कुलकर्णी, ग्रामजोशी व सावकार आपले प्रभुत्व गाजवीत होते. तालुक्याला मामलेदार हा ब्राह्मण,त्याच्या हाताखालचे कारकून ब्राह्मण,कोर्टातील न्यायाधीश ब्राह्मण आणि वकीलही ब्राह्मण अशी ब्राह्मणशाही असल्याने गरीब कर्जबाजारी कुणब्यांना ,मागासवर्गीय माणसांना न्याय मिळणे कठीण होते.शाहू महाराजांना सर्वांना न्याय द्यायचा होता. त्यासाठी नियोजनबद्ध कार्य याची सुरुवात केली.एप्रिल 1894 रघुनाथ सबनीस या प्रभू जातीतील कर्तबगार व्यक्तीला दिवाण म्हणून तर 1895 ला मराठा जातीतील उच्चविद्याविभूषित भास्करराव जाधव यांना असिस्टंट सरसुभे , फर्स्टक्लास मॅजिस्ट्रेट म्हणून तर दाजीराव अमृत विचारे यांना एक्झी.इंजिनियर म्हणून नेमले.
3.🏠
वसतिगृह चळवळ सुरुवात :-🏠
विश्लेषण केल्यानंतर लक्षात आले की ब्राह्मणेतर मुले मुली हे शिक्षणच घेत नाहीत,घेऊ शकत नाहीत.त्यांच्या शिक्षण घेण्यासाठी,शहरात राहण्याची जेवणाची सोय नाही.त्यासाठी जवळ पैसा नाही.यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण राहणे खाणे यासाठीची सोय केली.
राजाराम कॉलेज ला जोडून 1896 लाच कोल्हापुरात येणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वस्तीगृह सर्व जाती-धर्माच्या मुलांसाठी उघडले होते.परंतु त्याचे व्यवस्थापक व स्वयंपाकी हे भोजनाच्या वेळीे ब्राह्मण व ब्राह्मणेतर असा भेद करीत.अगोदरच ब्राह्मणेतर विद्यार्थी कमी होते.ब्राह्मणेतर विद्यार्थ्यांची संख्या हळूहळू कमी होऊन शून्यावर आली.
अशातच पी.सी.पाटील वडगाव हा मराठा बहुजन मुलगा 1899 ला कोल्हापुरात मॅट्रिक पास झाला.त्याचा छ शाहूंनी सत्कार केला .त्याप्रसंगी त्याने कोल्हापुरात राहणे आणि जेवण अभ्यास याबाबत झालेली गैरसोय, कष्ट सर्व हकीकत महाराजांना सांगितली. त्यानंतर 18 एप्रिल 1901 ला व्हीक्टोरिया मराठा बोर्डिंगची सुरुवात केली.पी सी पाटील हे त्यातील पहिले विद्यार्थी होत.या बोर्डिंगमध्ये मुसलमान शिंपी कोळी माळी गवळी इत्यादी बहुजन समाजातील मुले ही राहत.याच साली जैन बोर्डिंग स्थापन केले .त्यानंतर लिंगायत मुस्लिम वैश्य प्रभू ढोर -चांभार सुतार नाभिक सोमवंशीय आर्य क्षत्रिय कुस्ती इत्यादी विविध जाती धर्माची वीस वस्तीगृहे स्थापन केली.याचबरोबर मिस क्लार्क होस्टेल ,प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डींग अशी वस्तीगृह चालू झाली.या वस्तीगृह आणि शिक्षणाच्या चळवळीमुळे पुढे कोल्हापूर संस्थानची भरभराट झाली . हा वसा पुढे महाराजांचे शिष्य कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गावागावात शाळा आणि वस्तीगृहे कमवा व शिका या योजनेखाली स्थापन केली. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले सांगितलेला मार्ग, शिक्षणामुळे निती मती गती वित्त स्वाभिमान प्राप्त होतो. त्यामुळे शिक्षण हे सर्व महिला आणि बहुजन समाजाला गरजेचे आहे. राजश्री शाहू महाराजांनी शाळांबरोबरच वस्तीगृहे यांचीही सोय केली.
करवीर इलाख्यात प्राथमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करन्यात आले. 21 सप्टेंबर 1917 ला काढलेल्या आदेशात**
“शिक्षणास योग्य वयाची मुले शाळेत पाठविण्याची आईबापावर सक्ती करण्यात आली.त्यांनी तशी पाठविली नाहीत तर त्यांना प्रत्येकी एक रुपया दर महिना दंड करण्याची तरतूद करण्यात आली.*
४.💪💪
वेदोक्त प्रकरण एक संघर्षपूर्ण लढा:-* कार्तिक महिन्यात दररोज पहाटे पंचगंगा नदीच्या तीरावर महाराज आणि राजघराण्यातील मंडळी नियमितपणे स्नानास जात. सोबत मंत्र म्हणनारा नारायण भट असे.एके दिवशी महाराजांचे मित्र राजारामशास्त्री भागवत हे सोबत होते. त्यांनी नारायण भटजी म्हणत असलेले मंत्र हे त्याने स्नान न करताच वेदोक्त ऐवजी पुराणोक्त मंत्र म्हणत होता .ही बाब शास्त्रींनी महाराजांच्या नजरेस आणून दिल्यावर नारायण भटास जाब विचारला .त्यावर त्याने दिलेले उत्तर महाराजांच्या फार जिव्हारी लागणारे होते. *”शूद्राला हेच मंत्र असतात
आपल्या सेवेत असणाऱ्या सामान्य सेवकाने आपणाला शूद्र म्हणावे, ही घटना महाराजांना जिव्हारी लागली. *एप्रिल 1674 ला छ.शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी क्षत्रीयत्व सिद्ध झाले होते.* ब्राह्मण मंडळीशी चर्चा केली परंतु ऐकायला तयार होईना .त्यावेळी नारायण भटाला दरबाराच्या सेवेतून कमी केले .तसेच मुख्यपुरोहित अप्पासाहेब राजोपाध्ये दरबारातील धर्मकृत्ये वेदोक्त पद्धतीने करण्यास नकार दिला म्हणून त्यांचे 30 हजाराचे राजसेवेसाठीचे दिलेले इनाम जप्त केले. शंकराचार्य ब्रह्मणाळकर यांनी ही तोच पवित्रा घेतला म्हणून मठाचे 50हजार रुपयाचे उत्पन्न सरकार जमा केले.
वेदोक्त प्रकरण वाढविणे यासाठी विष्णु गोविंद विजापूरकर यांनी समर्थ पत्राच्या माध्यमातून ब्राह्मण व मराठा असा वाद वाढविण्यासाठी खतपाणी घातले .यामुळे महाराजांनी ग्रंथमाला मासिकास कोल्हापूर दरबाराकडून दरवर्षी मोठे अनुदान मिळत होते .ते अनुदान बंद केले. या प्रकरणबाबत बाळ टिळक यांनी ऑगस्ट 1901 कोल्हापुरात येऊन ब्राह्मण मंडळीशी मसलत केली. तसेच ऑक्टोबर 1981मध्ये “वेदोक्ताचे खुळ” असा केसरीत अग्रलेख लिहून छत्रपती घराण्यावर शुद्रच आहेत,असे लेखन केले. सध्या फक्त दोनच वर्ण आहेत एक ब्राह्मण आणि दुसरा शूद्र .क्षत्रिय ,वैश्य हे वर्ण शूद्रातच समाविष्ट आहेत.त्यामुळे नारायण भट याचे कृत्य बरोबर आहे अशी बाजू घेतली.
नारायण शास्त्री सेवेकरी यांनी मराठ्यांची श्रावणी वेदोक्त पद्धतीने केली म्हणून ब्राह्मणांनी त्यांच्यावर बहिष्कार घातला. यापुढे जाऊन शाहू महाराजांच्या दत्तकआई आनंदीबाई राणीसाहेबांच्या निधन झाले.त्यांच्या अंत्यसंस्कारवेळी **
“या शुद्र बाईचे संस्कार वेदोक्तरित्या कोण करील ?”*
असे म्हणून नकार दिला. त्याचरात्री जुन्या राजवाड्याला आग लावण्याचा कटही पूर्ण केला. कोल्हापुर दरबारातील राजपुरोहित अप्पासाहेब राजोपाध्ये यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या विरोधात ब्रिटिश न्यायालयात दावा दाखल केला.या प्रकरणाचा निकाल मे 1905 ला राजोपाध्ये यांची केस फेटाळून लावली .यामुळे सर्व भटमंडळी पराभूत झाली. करवीर पीठाचे शंकराचार्य ब्राह्मनाळकर स्वामी शरणागती पत्करून महाराजांची माफी मागितली .त्यानंतर ब्राह्मण मंडळीने माफी मागितली. एका जाहीर सभेत क्षत्रियत्व ठरावाने मान्य केले.
परंतु भटांनी राजर्षी शाहू महाराजांच्या विरोधात अनेक कट केले.यात
- 3 एप्रिल1894 च्या केसरीच्या अंकात* बाळ टिळक लिहतात,”छ.शाहूंनी ब्राह्मणेतराना स्वतःचे हक्क आणि दर्जा वाढावा असे प्रोत्साहन देवून ब्राह्मण ब्राह्मणेतर यामध्ये शत्रुत्वाची भावना निर्माण करण्याचे धोरण बदलले नाही तर त्यांनी लक्षात ठेवावे की जॅक्सन आणि रँड यांचे भवितव्य त्यांच्या वाट्यास येईल..(राजर्षी शाहू महाराज जीवन व कार्ये :-ले.डॉ जयसिंगराव पवार .)
2)चारित्र्यहनन बाबत ब्रिटिश सरकारकडे 1906ला खोट्या नावानी अर्ज करून तीन तरुण स्त्रियांना भ्रष्ट केल्याचा आरोप केला. चौकशीतून सत्य बाहेर आले आणि खोटे बाहेर पडले.
3) 21मार्च1908 ला महाराजांच्या कन्या आक्कासाहेब यांच्या विवाह प्रसंगी जमलेल्या पाहुणे , संस्थानिक,अधिकारी ठिकाणी बॉम्ब टाकण्याचा कट दामू जोशी, गणपतराव मोडक या दहशतवाद्यानी रचला होता,पण बॉम्ब वेळेत पोहोचला नाही म्हणून तो टळला.
4) फेरीस या इंग्रज अधिकारी याने वेदोक्त प्रकरणात छ.शाहू महाराजांसोबत होते. म्हणून निवृत्त होवून मायदेशी परत जातांना दामू जोशीने रेल्वेच्या डब्यात त्यावर गोळ्या घातल्या. त्यात सुदैवाने फेरीस वाचले.
5)यानंतर तीन महिन्यांनी रस्त्यात बॉम्बने उडवून देण्याचा प्रयत्न ही फसला.
५📘📝 राजर्षी शाहू महाराजांचे लोकांच्या राज्यासाठीचे जाहीरनामे :-
26 जुलै 1902 ला प्रतिनिधित्व (आरक्षण)
हुकूम पोहोचल्या तारखेपासून रिकाम्या झालेल्या जागापैकी शेकडा पन्नास जागा मागासलेल्या लोकांमधून भराव्या. मागासलेल्या वर्गाच्या अंमलदाराचाचे प्रमाण सध्या शेकडा पन्नास पेक्षा कमी असेल तर पुढची नेमणूक या वर्णातील व्यक्तींची करावी. हुकूमाच्या प्रसिद्धीनंतर केलेल्या सर्व नेमणुकांचे तिमाही पत्रक प्रत्येक खात्याच्या मुख्याने सरकारकडे पाठवावे.
सूचना:-मागासलेल्या वर्गाचा अर्थ ब्राह्मण प्रभू शेणवी पारशी दुसरे पुढे गेलेले वर्णखेरीज करून सर्व वर्ण असा समजावा.”
तसेच उच्चवर्णीय अधिकाऱ्यांनी बहुजन जातीतील अधीकारी यांच्या सोबत कसे वागावे याबाबत खास आज्ञा आहे.
यावर अनेक ब्राह्मण मंडळी यांनी तिखट प्रतिक्रिया दिल्या.
प्रो.विष्णू गोविंद विजापूरकर यांनी ‘समर्थ’ या पत्रात अभद्र भाषेत लिहिले.तसेच त्यास मृत्यूलेख ही म्हटले.
2.ऍड गणपतराव अभ्यंकर सांगली हुन कोल्हापूर येवून आदेश मागे घेण्यासाठी खटपट केली.त्यावेळी त्यांना घोडे ,चणे उदाहरण दाखवून दिले.
3.बाळ टिळक यांनी केसरीच्या अंकात “महाराजांची बुद्धीभ्रम झाला आहे.हे भ्रामक आणि घातक कृत्य आहे,”असे म्हटले.
**अशातच 12जून 1918ला धाकटे पुत्र प्रिन्स शिवाजी ** यांचा शिकार करीत असताना वयाच्या 20व्या वर्षी अपघाती मृत्यू झाला.
📝६
अस्पृश्यता निवारणाचा कृतीआदेश:- राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्यांसाठी शाळांची सुरुवात करून वस्तीगृह निर्माण केली.विविध शिष्यवृत्त्या जाहीर केल्या. अस्पृश्य मुलास वेदाची संथा शिकण्याची सोय केली .
27 जुलै 1918 ला अस्पृश्यतामुक्तीचा आदेश मंजूर केला.यातून हजेरीपद्धत बंद झाली. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सल्ल्यानुसार 1921 ला महार वतने खालसा केली. अस्पृश्यता निवारणाच्या संदर्भाने चार जाहीरनामे प्रसिद्ध केले. तलाठी म्हणून अस्पृश्यांच्या नेमणुका करणे, मुन्शिपाल्टीच्या चेअरमनपदी दत्तोबा पोवार यांची निवड करणे.महाराजांचे माहूत कोचमन ड्रायव्हर कुत्तेवान अस्पृश्य होते .माणगावच्या अस्पृश्य परिषदेत छत्रपती शाहू महाराजांनी सहभोजन करून अस्पृश्यांच्या हातचे अन्न ग्रहण केले .याच बरोबर गंगाराम कांबळे यांचं “सत्यसुधारक हॉटेल “* मध्ये दरबारातील निवडक सहकाऱ्यासह गंगाराम कांबळे च्या हातचा चहा स्वतः पीत आणि इतरांनाही ही तो देत.पहिल्यांदा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या भेटीसाठी मुंबईत त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.याच बरोबर मूकनायक या पत्रास शाहू महाराजांनी आर्थिक सहकार्य केले.तसेच डॉ आंबेडकर विलायतेस जातेवेळी रमाई या माझ्या बहिणी आहेत त्यांची काळजी मी घेतो.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी माणगांव परिषदेत 22 मार्च 1920 राज शाहू छत्रपती सरकार इलाखा करवीर यांनी आपल्या राज्यात बहिष्कृताना समानतेचे हक्क देवून त्यांचा उद्धार करण्याचे सत्कृत्य आरंभिले आहे,त्याबद्दल *त्यांचा वाढदिवस प्रत्येक बहिष्कृत व्यक्तीने सणाप्रमाणे साजरा करावा असे या परिषदेचे मत आहे.“
७.भटक्या विमुक्त जमातींच्या उद्धार👍
बंजारा छप्परबंद कैकाडी टकारी, राजपूत भामटा, कंजारभाट, रामोशी, मांगगारूडी, फासेपारधी, कटबु, वड्ड इत्यादी तेरा जमाती गुन्हेगार घोषित होत्या .त्यांना महाराजांनी मुक्त केले.त्यांना घरे दिली .नोकरीमध्ये समाविष्ट करून घेतले. कुस्तीपटू बनवले. अनेकांना दरबारामध्ये संरक्षक म्हणून जबाबदारी दिली. भटक्या-विमुक्तांचे पुढारी लक्ष्मण माने –छत्रपती शाहू महाराजांना खरा देव मानतात।
८.👨👩👧👦
**महिलांसाठी छत्रपती शाहू महाराजांचे मौलिक कार्य **:-
जुलै 1917 मध्ये विधवापुनर्विवाह कायदा महाराजांनी आदेशित केला .याचबरोबर
12 जुलै 1919 ला आंतरजातीय विवाह कायदा संमत केला . शाहू छत्रपती यांनी आपली बहीण *चंद्रप्रभाबाई यांचा विवाह इंदूरच्या तुकोजीराव होळकरांचे पुत्र यशवंतराव यांच्या सोबत करून धनगर- मराठा यांची एकता सिद्ध केली.* याच विवाहात 25 विवाह सोबत लावण्यात आले.
यापुढची दूरदृष्टी महिलांना कौटुंबिक अत्याचार निवारण कायदा2 ऑगस्ट 1919 ला संमत केला. ज्यामध्ये ते 6 महिन्यांचा कारावास व 200 रुपये दंडापर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली. ही बाब आमच्या अनेक स्त्रियांना आजही माहित नाही.ती माहीत करून घेण्याचा त्या प्रयत्नही करत नाहीत. त्यांना आज मिळालेले हक्क अधिकार यासाठी या महापुरुषांचा संघर्ष त्यांनी ध्यानात घेणे. त्यांचा इतिहास समजून घेऊन त्याप्रमाणे वर्तन करणे.समस्त महिला म्हणून जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी असे वाटते.
९.📘
सत्यशोधक समाज आणि शाहू महाराज :-
महात्मा जोतिराव फुले यांचे त्यांच्या नंतर कार्य जोमाने पुढे नेण्यात राजश्री शाहू महाराज यांचा वारसा मोठा आहे.1910 ला मुंबईत वि रा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची परिषद झाली . त्यानुसार सार्वजनिक सत्यधर्मप्रमाणे ध्येयधोरणे ठरली.पुढची परिषद नाशिक येथे डॉ संतू लाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली .
11 जानेवारी 1911 ला कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाखा स्थापना झाली.यात अध्यक्षपदी भास्करराव जाधव उपाध्यक्ष अण्णासाहेब लठ्ठे ,मुख्याधिकारी महादेव डोंगरे तर कार्यवाह हरिभाऊ चव्हाण यांनी जबाबदारी घेतली.बाबुराव जाधव नानासाहेब मुळीक अशी कार्यकर्ते मंडळी यांनी यांनी 1912 ला ब्राह्मण पुरोहिताशिवाय मराठा पुरोहिताकडून श्रावणी घडवून आणली. त्यानंतर 150 लोकांनी एकत्र येऊन सामूहिक पूजा केली. सत्यशोधक पद्धतीने विवाह लावले.1912 साली 200, 1913 साली 266 ,तर 1914 साली 299 सत्यशोधकविवाह विधी पार पडले.पुढे गरजेनुसार सत्यशोधक शाळा 1913 ला काढण्यात आली.याच बरोबर 6जुलै 1920 ला शिवाजी क्षत्रिय वैदिक पाठशाळा तर 11 नोव्हेंबर 1920 ला क्षात्रजगदगुरू पिठाची स्थापना केली .जगदगुरू म्हणून संस्कृत , तत्त्वज्ञान चे पंडित सदाशिवराव पाटील बेनाडीकर या मराठा तरुणाची निवड करण्यात आली.
🖋15 एप्रिल 1920 चे नाशिक येथील भाषणात ब्राह्मणी धर्मापासून सावधान राहण्याचे सांगितले आहे,जे आजही आम्हांला समजले नाही,समजून9420705653 घेण्याची पात्रता नाही.(लायकी ना ही.)
१०.
राधानगरी धरण आणि बाजारपेठ:- राधानगरी धरण हे त्या काळातील भारतातील सर्वात मोठे धरण होय. त्यामुळे कोल्हापूर संस्थानाची आर्थिक प्रगती झाली. शेतकऱ्यांच्या शेतमालाला बाजारपेठ मिळावी म्हणून शाहूपुरी , जयसिंगपूर या बाजारपेठा निर्माण केल्या .याचबरोबर 1906 ला शाहू छत्रपती मिल्स स्थापना केली.छत्रपती शाहू महाराजांनी कला क्रीडा मल्लविद्या नाट्य, संगीत, चित्रपट यासाठीही जाणीवपूर्वक प्रयत्न केले म्हणून कोल्हापुरात अनेक कर्तबगार कलाकार मल्ल उदयास आले.कामगार वर्गाच्या चळवळींना संघटीतपणे सहकार्य करण्यासाठी महाराज मदत करत असत.
📘राजर्षी शाहूचरित्रातून
घडुया घडवूया 🖋
आधुनिक भारताच्या इतिहासातील राजर्षी शाहू महाराज यांचे स्थान सुवर्ण अक्षरात लिहिले गेले आहे. कारण एक मांडलिक राज्य असूनही त्यांनी राज्यातील सर्व लोकांना स्वतंत्रता,समता, बंधुता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी जाणीवपूर्वक आपल्या अधिकाराचा वापर केला. छत्रपती शाहू महाराजांनी सतत कार्यमग्न राहून जीवितकार्य करत राहिले. शरीर आजारी असताना ही त्यांनी महत्वाच्या बैठकी, कामानिमित्त सतत प्रवास केला.5 मे 1922 खेतवाडी मुंबईत आजारी असतांना ही प्रबोधनकार ठाकरे यांना बोलावून घेतात,चर्चा करतात. राजर्षी शाहू महाराज 6 मे 1922 ला पन्हाळा लॉज, खेतवाडी मुंबई येथे अंतिम श्वास घेतात.
राजश्री शाहू महाराज यांनी 1894 ते 1922 हा 28 वर्षांचा कार्यकाळ हा भारताच्या इतिहासातील लोकराजा चा काळ म्हणून नोंदला जाईल.जो आजही आधुनिक भारताचे शिल्पकार क्रांतिकारक महात्मा जोतीराव फुले आणि विश्वभूषण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या साखळीचा मध्य ,दुवा आहे.व्यवस्था परिवर्तन चळवळीचा विषय निघतो त्यावेळी अभिमानाने
*फुले *शाहूआंबेडकर*
यांच्या विचारांचा पाईक आहे असे सांगितले जाते.
.