जग आणि जगणं सुंदर बनवणारे राबणारे हात
    — अनंत चंपाई माधव कदम.


पुस्तक परीक्षण


       जग आणि जगणं या दोन्हीच्या मधला दुवा आहेत ते कष्टकरी हात. जगणं सुंदर होण्यासाठी जग सुंदर असाव भासाव लागतो. जग सुंदर तेंव्हाच होतं जेंव्हा इथं राबणारे, कष्ट करणारे हात स्वतःला मळून,जाळून, पोळून घेतात. ऊन, वारा, पाऊस आणि घाव, जखमा सहन करत निर्माल्याला ,घाणीला अलगद बाजूला सारत स्वच्छतेसह सुंदरतेला आकार देतात आणि मग सत्य, शिव, सुंदराची जाणीव होते. तेव्हा कुठे जग सुंदर वाटू लागतं अन्  सारं जगणच सुंदर बनतं. अशा या जग आणि जगण्याला सुंदर बनवणाऱ्या हाताचा जेंव्हा सन्मान होतो तेव्हा या जगाला घडवण्याचे कार्य आपसुकच या हातून घडते व स्वर्ग जमिनीवर उतरतो. परंतु जेंव्हा या कष्टकरी हातावर अन्याय होतात तेंव्हा ते हात पेटून उठतात आणि घडते ती क्रांती.
       हात कारखान्यात राबणारे, रानावनात कष्टणारे, घरादारात झिजणारे आणि संघर्षात लढणारे हात. त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. पण लक्षात कोण घेतो ?. पोटाची खळगी भरणारे हात उपेक्षितच राहतात.अशा परिस्थितीतही कुणीतरी एखादा वाली असतोच जो उपेक्षितांच गार्‍हाण मांडण्याचं धाडस करतो. जे न देखे रवि ते देखे कवी असं म्हटलं जातं आणि हे एकदम खरंच आहे. आमचा कविमनाचा हरहुन्नरी कलावंत, सामाजिक भान असलेला चित्रकार मित्र मिलिंद यादव. या अवलियाने मनातल्या कल्पना आणि विचारांना मूर्त रूप देत त्यांना प्रत्यक्षात उतरवत या राबणाऱ्या हातांना उजागर करण्याचा वसा घेऊन ‘राबणारे हात’ हा विषय डोक्यात आणि त्यांना चित्रबद्ध करणारा कॅमेरा गळ्यात अडकवून वेड्यासारखा बेभानपणे दिसेल तेथे दिसेल तशा अवस्थेत राबणाऱ्या हातांना कॅमेऱ्यात तीन हजारावर क्लिक मारून त्याच्या प्रतिमा घेतल्या. त्यातील निवडक 30 प्रतिमांना आपल्यापर्यंत पोहोचविण्यासाठी ‘राबणारे हात’ या एका वेगळ्या पण अत्यंत गरजेच्या विषयाला पुस्तक रूपात आणले त्याबद्दल या मित्राला माझ्या दोन्ही हातांनी कृतज्ञतापूर्वक नमस्कार .
        कष्टाच्या घामाने मळलेले, सुरकुतलेले अनेक प्रकारच्या खस्ता खाल्लेले, लोखंडाच्या गंजाने रंगलेले, तप्त लाव्ह्याच्या उष्णतेने भाजले-होरपळलेले, मातीच्या चिखलात मळलेले, थंडगार पाण्यात आखडून सुरकुतलेले, गवत पात्यांनी जागोजागी कापलेले हात. बारा बलुतेदार, 64 कलाकार , नवरंग, नवरस, सप्तस्वर, त्रिताल या साऱ्यांमध्ये ऊर्जा भरणारे व सुंदरतेची हमी आणि जगण्याची ऊर्मी देणारे हात या साऱ्यांचा परामर्श घेणाऱ्या पुस्तक रुपी ‘राबणारे हात’ या साहित्यकृतीत मिलिंद यादव यांनी टिपलेल्या प्रकाश चित्रांना सुहास एकसंबेकर यांनी दिलेला शब्दरुपी साज ,चित्रांमागचा अर्थ स्पष्ट करून देत असल्यामुळे ही साहित्यकृती केवळ शब्दवाचनापुरतीच मर्यादित नसून खऱ्या अर्थाने चित्र वाचन करण्याची उत्कृष्ट साहित्यकृती बनलेली आहे. ही आगळीवेगळी वाचणाऱ्यांशी प्रत्यक्षात बोलणारी बोलकी साहित्यकृती असल्यामुळे सर्व वाचकांच्या मनाला भुरळ घातल्याशिवाय राहणार नाही असे मला वाटते.
           राबणारे हात या पुस्तकाचे फक्त मुखपृष्ठच बोलके आहे असे नाही तर यातील प्रत्येक पान ना पान बोलके आहे. या पुस्तकासाठी वापरलेले कागद,त्याची बांधणी आणि पुस्तकाचा साज नवरंगी असून यातल्या प्रत्येक पानावरील प्रत्येक चित्र रंगीत आहेत. यामुळे कदाचित याची आर्थिक किंमत जास्त वाटत असावी. तरीपण या साहित्यकृतीतील प्रत्येक चित्र, यासाठी लेखक चित्रकाराला घ्यावे लागलेले कष्ट, द्यावा लागलेला वेळ आणि हा सारा करावा लागलेला उठाठेव त्यामागची भावना मात्र अमूल्य आहे. आयुष्यभर राबणारे बारा बलुतेदारांचे हात, कलाकार आणि कष्टकऱ्यांचे हात सर्वसामान्यांना दिसतात तसेच कलाकाराला ही दिसतात.  परंतु कलाकारांना दिसणारी त्यामागची भावना आणि त्याच्या वेदना यामुळेच त्याला कलाकार वेगळ्या पद्धतीने प्रस्तुत करतो. हेच वेगळेपण जपत नेल्सन मंडेला यांच्या इट इज इन युवर हॅन्ड टू क्रिएट अ बेटर वर्ल्ड या विचाराला जागत मिलिंद यादव यांनी चित्रबद्ध केलेली अनमोल साहित्यिकृती बनलेली आहे.
        या पुस्तकातलं पहिलं चित्र आहे ते सार्‍या राबणाऱ्या हातांच प्रतिनिधित्व करणार. एका छोट्याश्या कीटकाच. आपल्या इवल्या इवल्या हातांनी भलामोठा आपल्या खाद्याचा गोळा कसा ओढीत नेतो याचे कसब दाखवणारं. यानंतर मनोगत मांडताना दिलेल चित्र आयुष्यभर राबणाऱ्या आजीबाईचं असून आजीच्या हातात एक जुनाट असलेला दात पडलेला बोथट झालेला कोयता आहे. हा कोयता मळलेल्या हातात घेऊन आपल आयुष्य उजाळण्याचे स्वप्न पाहणार्‍या आजीबाईचं. यातून लेखकाला कदाचित हेच सांगायचं असावं की मी थकलो भागलो, माझ्या हातातली शस्त्र जुनाट, बोथट झालेली असली, भलेही माझ्या हातातलं अवसान संपलेल असेल तरी मी हिंमत मात्र हरलेली नाही. माझ्यातली उर्मी अजून जागी आहे आणि मी परिस्थितीवर मात करणारच.अशाच आशयाची अनेकानेक चित्र असून यातले प्रत्येक चित्र अत्यंत बोलके असून त्यांच्या जोडीला दिलेली टिप्पणी त्याची उकल करणार्‍या आहेत.या पुस्तकाच्या शेवटी केलेले ‘रस्त्यावर उभा राहून शोषितांच्या बाजूने बेंबीच्या देठापासून खचुन बोंब मारायला शिकवणाऱ्या’ कार्ल मार्क्स या प्रतिमेचे समर्पण मनाला भावणारे आहे.
          या पुस्तकासाठी डॉक्टर अनिलकुमार लवटे यांनी दिलेली पाठराखण मिलिंद यादव यांच्या प्रकाश चित्रांमधील भाव भावनांचा आदर राखून त्यांचा समाजाप्रती असलेला कळवळा त्याला साद घालीत कला आणि कल्पना शक्तीला निश्चितच प्रेरणा देणारी आहे. एकंदरीत संपूर्ण सचित्र आणि रंगीत असलेली राबणारे हात हि साहित्यकृती एक नवा प्रयोगच म्हणावा लागेल. वाचक रसिकांना हि साहित्यकृती साद घालणारी असून प्रत्येकाला भावणारी आहे.या पुस्तक निर्मिती आणि पुढील वाटचालीस मिलिंद यादव यांस अनंत शुभेच्छा!
    आज राबणारे हात या साहित्यकृतीचा प्रकाशन सोहळा संपन्न होत आहे.वाचक कलारसिक निश्चितच याचे कौतुक करतील. त्यासाठी अनंत शुभेच्छा!
                 
राबणारे हात-मिलिंद यादव.
          पृष्ठे- 60.     किंमत-.  350/-
            — अनंत चंपाई माधव कदम
           संयोजक- चला कवितेच्या बनात, उदगीर.
                    मो.नं. 9423351277, 9309184020.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp