जीवन तत्वज्ञान उजागर करणारा संत तुकारामांचा जीवन विचार – डॉ.अनिल मुंढे.
( सहज सुंदर काव्यात्मक शैलीतून अत्यंत दूरदृष्टीने अभंगाच्या माध्यमातून घेतला गेलेला वेध प्रत्येक जीवाला प्रसन्न तर करतोच शिवाय अंतर्मुख देखील करतो. कारण मानवतेशी खरा संवाद साधणारा संत तुकारामांचाच जीवन विचार आहे.)
उदगीर / विशेष प्रतिनिधी (एम.बि.टाळीकोटे) :
आई वडील हेच खरे दैवत, रंजल्या गांजल्याची सेवा हीच खरी ईश्वर सेवा असल्याचे सांगत कर्मभक्तीला महत्त्व देऊन श्रम, सेवा व समर्पण भाव आपल्या अभंगातून जागे करत जीवन तत्वज्ञान उजागर करणारा संत तुकारामांचा जीवन विचार प्रतेकासाठी मोलाचा मार्गदर्शक आहे असे विचार डॉ.अनिल मुंढे यांनी व्यक्त केले.
वाचक संवादाचे २६२ वे पुष्प महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय अहमदपूर येथील मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.अनिल मुंढे यांनी निर्मलकुमार फडकुले लिखित संत तुकारामांचा जीवन विचार या पुस्तकावर अत्यंत प्रभावी संवाद साधून गुंफले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधिज्ञ तथा पत्रकार प्रमोद बिरादार हे उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ मुंढे म्हणाले की, संत तुकाराम हे सामाजिक बांधिलकी आणि प्रबोधनाचा वसा घेऊन जगतानाच पर्यावरण संवर्धनाचा निजध्यास देखील घेतलेला होता. शेवटपर्यंत कृतिशील जीवन जगणारे संत तुकाराम महाराज यांच्या गाथेतील अनेक अभंगांचे विश्लेषण करत या ग्रंथातील अनेक संदर्भ अगदी ओघवत्या भाषेत सांगून श्रोत्यांना अंतर्मुख केले. शेवटी श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नाला समर्पक उत्तरेही दिली.
शेवटी अध्यक्षीय समारोपात कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. प्रमोद बिरादार म्हणाले की, संत तुकाराम हे समाजाचे एक विद्यापीठच होते , त्यांनी माणसात देव पाहिला. त्यामुळेच तर आपण त्यांच्या विचार व कार्यासमोर नतमस्तक होतो. यावेळी व्यापारी शिवाजीराव जाधव, पत्रकार बिभीषण मद्देवाड, स्वातंत्र्य सैनिक हणमंत बुळळा, रजनी पाटील व सुचेता कदम यांना जन्मदिनाची ग्रंथभेट देऊन गौरविण्यात आले. यावेळी शहरातील वाचक रसिक बंधू-भगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वजनम सुरेश, हणमंत म्हेत्रे, बालाजी सुवर्णकार, मुरलिधर जाधव, प्रा.राजपाल पाटील, डॉ.कांत जाधव यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजक अनंत कदम यांनी केले तर आभार रामभाऊ जाधव यांनी मानले.