
(बार्टी आणि भारतीय बौद्ध महासभेच्या संयुक्त विद्यमाने माणगांव परिषद संपन्न )
(माणगांव — दिनांक 22 मार्च2024)
सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीची नव्याने उभारणी करून नव नेतृत्वास पुढे आणणे या हेतूने लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या पुढाकाराने कोल्हापूर संस्थानातील माणगांव येथे दिनांक 21व 22मार्च 1920रोजी दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत वर्ग परिषदेचे आयोजन कारण्यात आले होते.डॉ. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेचे प्रमुख अतिथी
राजर्षी शाहू महाराज होते तर कळंबीचे दादासाहेब इनामदार हे स्वागताध्यक्ष होते. या परिषदेची संपूर्ण जबाबदारी शाहू महाराजांनी ज्यांच्यावर सोपविली होती ते माणगावचे सुपुत्र अप्पासाहेब दादगोंडा पाटील यांनी या नियोजनात कोणतीही कमी ठेवली नाही.
या परिषदेत शाहू महाराजांनी बहिष्कृत वर्गाला उद्देशून ऐतिहासिक भाषण केले. त्यामध्ये ते “म्हणाले की तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढला आहे.डॉ. आंबेडकर हे केवळ अस्पृश्यांचाच नाही तर संपूर्ण हिंदुस्थानचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत!”
देशात सामाजिक समतेची पायाभरणी करणाऱ्या या ऐतिहासिक माणगाव परिषदेचा 104वा वर्धापन दिन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टीचे महासंचालक सुनीलजी वारे यांच्या मार्गदर्शनात बार्टी आणि भारतीय बौद्ध महासभा जिल्हा कोल्हापूर यांच्या संयुक्त विदयमाने 22मार्च 2024रोजी महात्मा फुले सभागृह माणगाव येथे आयोजीत करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उदघाट्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू तथा भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव आंबेडकर यांचे हस्ते आणि बार्टीचे विस्तार व सेवा आयबीपीएस विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.
यावेळी डॉ. भीमराव आंबेडकर म्हणाले की,
” शाहू महाराजांचे भाकीत बाबासाहेबांनी पूर्णत्वास नेले.एकादा महापुरुष दुसऱ्या महापुरुषाला ओळखत असून महापुरुषांचे कार्य व विचार पुढे नेण्याचे कार्य या देशातील आंबेडकरवाद्यांनी केले आहे. डॉ. आंबेडकर यांनी जी सामाजिक क्रांती केली तिला पुन्हा गतिमान करण्याची गरज आहे. यासाठी संपूर्ण देशातील आंबेडकरवादयानी पुढे आले पाहिजे.!”
ऐतिहासिक माणगांव परिषदेच्या या वर्धापन दिन सोहळ्यात आंबेडकरपूर्व कालखंडातील अस्पृश्यांचे पहिले पुढारी, पहिले पत्रकार, विद्रोही साहित्यिक आणि सामाजिक समतेसाठी शंकराचार्यांना जबाब विचारणारे आद्य समाजसुधारक गोपाळबाबा वलंगकर यांच्या जन्मगावी महाड जवळील रावढळ येथे जाऊन 19मार्च 2024रोजी शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या संस्थेने अभिवादन करण्यासाठी पुढाकार घेतला. रावढळ येथे शासकीय पातळीवरून अभिवादन कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण यांचा सन्मान डॉ भीमराव आंबेडकर यांनी केला तसेच भीमराव ते बाबासाहेब या वेब सिरीजसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. सत्येंद्रनाथ चव्हाण यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील अनेक पैलूवर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीवर प्रभाव टाकणाऱ्या तत्कालीन विषमतावादी समाजव्यवस्थेबरोबर त्यांच्या कार्याला मानवीय भावनेतून सहकार्य करणारे महाराज सयाजीराव गायकवाड, शाहू महाराज यासह विविध जातीधर्मातील समाजसुधारक, विचारवंत आणि प्रामाणिक कार्यकर्ते यांचा ही महत्वाचा सहभाग आहे. या सर्व व्यक्ती आणि घटनांचा सूक्ष्मपणे अभ्यासआणि संशोधन करून डॉ. आंबेडकर यांचे जीवन कार्य नव्याने जगासमोर आणण्याची गरज आहे. यासाठी ‘भीमराव ते बाबासाहेब ‘ हा महत्वाकांक्षी वेब सिरीज प्रकल्प बार्टीने हाती घेतला आहे.”
अध्यक्षिय भाषणातून राजेंद्र भोसले यांनी यावेळी खालीलप्रमाणे ठराव मांडले.
ऐतिहासिक माणगाव परिषदेत डॉ आंबेडकर यांनी मांडलेल्या तिसऱ्या क्रमांकाच्या ठरावाची अंमलबजावणी सर्व जनतेने करावी, आद्य समाज सुधारक गोपाळ बाबा वलंगकर अभिवादन सोहळा सुरु केल्याबद्दल बार्टी संस्थेचे अभिनंदन आणि दरवर्षी 19मार्च रोजी वलंगकर अभिवादनासाठी सर्व बहुजन समाजाने रावढळ येथे उपस्थित राहावे. टाळयांच्या गजरात वरील सर्व ठरावास संमती देण्यात आली.
बार्टीच्या वतीने लंडन हाऊस प्रतिकृती स्मारकासमोर डॉ बाबासाहेब आंबेडकर व इतर महापुरुषांच्या जीवनावरील मौल्यवान पुस्तके अल्पदरात उपलब्ध करून देण्यात आली होती. या पुस्तक स्टॉलचे उद्घाटन डॉ सत्येंद्रनाथ चव्हाण आणि मान्यवरांच्या यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी याप्रसंगी एस के भंडारे(राष्ट्रीय उपाध्यक्ष),भिकाजी कांबळे(प्रदेशाध्यक्ष), बार्टीतील संशोधक
डॉ. प्रेम हनवते, डॉ संभाजी बिराजे, विकास गायकवाड सचिन नांदेडकर, गणेश सव्वाखंडे, रामदास लोखंडे, राहुल कवडे तसेच बार्टीतील कर्मचारी, समतादूत, तसेच आंबेडकर अनुयायी,
ग्रामस्थ, समता सैनिक दल व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
डॉ प्रेम हनवते यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.