देशद्रोही कृत्याचे समर्थन कशासाठी ? संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) चे संचालक व शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर यांना नुकतीच अटक झालेली आहे. भारत सरकारची अतिशय महत्त्वाची गुप्त माहिती पाकिस्तानला पुरविण्याचा त्यांच्यावर गंभीर आरोप आहे आणि तशा प्रकारचे पुरावे सुद्धा सरकारला सापडलेले आहे. त्यामुळे पंधरा मे पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. परंतु इतका महाभयंकर गुन्हा करूनही सोशल मीडियावर त्यांचे समर्थन करणारी व त्यांची बाजू घेणारी मंडळी मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह आहे. कुरुलकरांच्या ३ पिढ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत संबंधित होत्या असे अनेक वृत्तपत्रांमध्ये छापून आलेले आहे व त्यामधे काही गैर नाही. प्रत्येकाला कोणत्या संघटनेत काम करायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक अधिकार आहे. परंतु आपल्या संघटनेच्या किंवा विचारधारेच्या एखाद्या व्यक्तीने जर देशविरोधी कृत्य केले असेल तर तो आपल्या संघटनेशी संबंधित होता म्हणून त्याचे जाहीर समर्थन करणे हे कितपत योग्य आहे ? असे करणे म्हणजे देशद्रोही कृत्याचे समर्थन करणे नाही काय ? प्रदीप कुरुलकरांनी भारताचा कट्टर शत्रू असलेल्या पाकिस्तानला आपल्या देशाची सैन्यदल व संरक्षण विषयक अत्यंत महत्त्वाची माहिती पुरविली आहे. हा स्पष्टपणे देशद्रोह आहे. यामध्ये जाती-धर्माचा काहीही संबंध नाही. भारताच्या विरुद्ध काम करणारा माणूस तो कोणत्याही जाती-धर्माचा असो, तो देशाचा शत्रू मानलाच गेला पाहिजे. परंतु तो आपल्या संघटनेचा, आपल्या जातीचा, आपल्या धर्माचा आहे म्हणून जर त्याचे समर्थन आम्ही करत असू तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने हे फार भयानक आहे. म्हणून प्रदीप कुरुलकरांचे समर्थन करणारी जी टोळी सोशल मीडियावर जोरदार काम करीत आहे आणि कुरुलकरांवर टीका करणाऱ्यांना धर्माचा आधार घेऊन विरोध करत आहे हे अजिबात योग्य नाही. असेच जर होत राहिले तर प्रत्येक गोष्ट आपल्या देशात धर्मावरून, जातीवरून ठरविल्या जाईल आणि भारताची जी धर्मनिरपेक्ष लोकशाही आहे त्याला फार मोठा धोका निर्माण होईल. म्हणून गुन्हेगार तो कोणत्याही जाती-धर्माचा असो तो जर देशापेक्षा वैयक्तिक स्वार्थ मोठा मानत असेल व शत्रू राष्ट्राला मदत करीत असेर तर त्याला देशद्रोही ठरविल्याच गेले पाहिजे. त्यानंतर देशात आणखी एका महत्वाच्या घटनेवरुन वादळ उठलेले आहे. दिल्लीतील जंतर मंतर येथे आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके प्राप्त करणाऱ्या भारतीय महिला कुस्तीपटू अनेक दिवसापासून आंदोलन करीत आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि सध्या भाजपाचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध त्यांनी लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले आहेत. अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असतानाही सरकारने दखल न घेतल्यामुळे या महिला खेळाडूंना शेवटी सर्वोच्च न्यायालयाच्या दारात जावे लागले. सर्वोच्च न्यायालयाने पोलिसांना बृजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. तेव्हा कुठे पोलिसांनी एफ आय आर दाखल करून घेतला. परंतु अजूनपर्यंत मात्र बृजभूषण सिंह यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या बाबतीत जर सरकार इतके असंवेदनशीलपणे वागत असेल तर खरोखर हे सरकार महिलांचा सन्मान करणारे आहे काय? असा प्रश्न निर्माण होतो. तसेच बुजभूषणसिंह यांचे समर्थन करणारे व महिला खेळाडूंच्या बाबतीत वाईट साईट लिहिणारे अनेक जण सोशल मीडियावर ऍक्टिव्ह झाले आहेत. इथेही पुन्हा तेच की, हा आपल्या पक्षाचा आहे म्हणून त्याच्या घाणेरड्या गैरकृत्याचे समर्थन सुरू आहे. एकीकडे आपल्या खेळाडूंनी पदके मिळविल्यानंतर आमचे प्रधानमंत्री त्यांच्यासोबत अभिमानाने फोटो काढतात आणि आता दुसरीकडे त्याच खेळाडूंवर त्यांच्याच पक्षाचा एक खासदार अत्याचार करत असताना व ते खेळाडू प्रधानमंत्र्यांकडे दाद मागत असताना प्रधानमंत्री मात्र त्यांचा एक शब्द सुद्धा ऐकून घ्यायला तयार नाही. हा विरोधाभास का ? आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या बाबतीत जर सरकार इतकी निष्ठूरता आणि असंवेदनशीलता दाखवित असेल तर भारतीय क्रिडापटू मोकळ्या वातावरणात खरोखर खेळू शकतील का आणि देशासाठी पदके मिळवू शकतील का ? त्यामुळे लैंगिक अत्याचाराचे समर्थन करणारी, देशद्रोही कृत्याचे समर्थन करणारी टोळी जर आपल्या देशात कार्यरत असेल आणि मोठ्या अभिमानाने ते अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे जाहीर समर्थन करत असतील तर गुन्हेगारांना आणखी बळ प्राप्त होणार आहे व ते खुलेआम असे गैरकृत्य करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. त्यामुळे सध्या देशासमोर अत्यंत गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्या देशात सामान्य माणसाने एखादा लहानसा गुन्हा जरी केला तरी ताबडतोब पोलीस यंत्रणा त्याच्यावर कारवाई करते. परंतु इथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू जाहीरपणे आपल्या बयानामध्ये बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करतात, त्यामधे एक मुलगी १४ वर्षाच्या आतील आहे. तरीसुद्धा गुन्हेगार हाय प्रोफाईल असल्यामुळे त्याच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. याचा अर्थ या देशात कायदा सुद्धा गरीब आणि श्रीमंत पाहून न्याय करतो हे पुन्हा सिध्द झाले आहे. ही अतिशय भीषण बाब असून अशा प्रकारामुळे भविष्यात कोणालाच न्याय मिळण्याची सुतराम अपेक्षा ठेवता येणार नाही. कारण देशद्रोह्यांचे, बलात्काऱ्यांचे, खुन्यांचे समर्थन करणारी पिढी जर देशात निर्माण होत असेल आणि एखादा बलात्कारी तुरुंगातून सुटल्यानंतर त्याचे भव्य सत्कार होत असतील तर देश अराजकतेकडे वाटचाल करीत आहे हे समजून घ्यावे. देशाच्या लोकशाहीसाठी ही धोक्याची घंटा आहे.
– प्रेमकुमार बोके
अंजनगाव सुर्जी