
7949933735459868333.jpg)
संस्थापक सचिव विनायक बेंबडे यांची मेहनत फळाला..!!
उदगीर –(बातमीदार) कल्लूर येथील पांडूरंग विद्यालयाचा २५ वर्षे पूर्ण होत असल्याने संस्थापक सचिव विनायक बेंबडे यांच्या संकल्पनेतून रौप्यमहोत्सवी वर्ष विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरे केले जात आहे.त्याचाच भाग म्हणून कथाकथन व कविसंमेलन पार पडले. या कार्यक्रमास विद्यार्थी पालकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. कवी अरुण पवार यांनी जखम कविता सादर केली. कविसंमेलनाचे अध्यक्ष योगीराज माने तर कथाकथनचे अध्यक्ष दिगंबर कदम होते. योगीराज माने यांनी बाप ही कविता सादर केली.
किती पुरविले लेकरांचे लाड
सावलीचे झाड बाप माझा
भजनात दंग मुखी हरिनाम
ज्ञानी तुकाराम बाप माझा
कष्टकरी बापाचे वास्तविक चित्र कवीने उभे केले आहे. माणसांनीच माणसाला खाऊन टाकण्याची भाषा करतो आहे. पण यावर कोणता ईलाज करावा हेच आजोबांनी सांगायचं विसरुन गेलं आहे. या आशयाची कविता विरभद्र मिरेवाड यांनी सादर केली.
माणसांनीच धरलं तर
त्याचा उतारा कशाने करायचा?
हेच शिकवायचं
आज्या विसरुन गेला
लहानांनपासून शहाण्यासुरत्या माणसांपर्यंत मोबाईल मध्ये माणसं वेडी झाली. ही कविता बालाजी पेठकर यांनी सादर केली.
या टीव्ही मोबाईलात
कोणी सुखी कोणी दुखी
शाहणीसुरतीही झाली
माणसं सगळी मुखी
आई असणा-या घराला घरपण येते हे शैलजा कारंडे यांनी माय कविता सादर केली.
साखर नको की तूप नको
दुध नको की साय
क्षणभरासाठी का होईना
होना माझी माय
कविता म्हणजे काय असते हे ऋचा पत्की यांनी सादर केली.
कविता बोले सुंदर वाणी
कविता आठवणींची वेणी
कविता देते उदंड आशा
कविता वदते प्रकाश भाषा
संविधानामुळे आज भारत सुखी आहे. यासाठी क्रांती करावी लागली. अंकुश सिंदगीकर यांनी सादर केली.
मिलते रहंगे मिलकर रहेंगे
हम भारत के है लाल
संविधान की क्रांती
रंग लायी आज
आकाड महिन्यात लेक नांदून येणार म्हणून माय जीवाचा आटापिटा करते. दोघातला संवाद रामदास केदार यांनी लेक कवितेत सादर केले.
आकाड बिकाड पाळायला
लेक यायची नांदून
उस्न पास्न करुन माय
सुख ठेवायची बांधून
माणसातली माणुसकी कशी माणसे हरवू लागली आहे.माणूसकीचे झरे कसे आटू लागले. रसुल पठाण यांनी अश्रू कवितेतून सादर केली
माणुसकीचे झरे आता अटू लागले
डोळ्यात अश्रू माझ्या दाटू लागले
मिरवितात जे हाती रंगाचे झेंडे घेऊन
तेच स्वातंत्र्याचा गळा घोटू लागले.
संतोष नारायणकर यांनी माझ्या मामांच्या दोन हायत पोरी, एक आहे काळी एक आहे गोरी ही कविता तर प्रविण भोळे यांनी सध्याची राजकीय परिस्थिती, तसेच चंद्रदीप नादरगे यांनी श्वास ही कविता सादर केली. कथाकथन सत्रात एकापेक्षा एक कथा सादर करुन विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.दिगंबर कदम यांनी खास ग्रामीण शैलीत पांगूळ ही कथा सादर केली. अनिता येलमटे यांनी विद्यार्थी पालक आणि गुरुजीतला संवाद असलेली काळे गुरुजी ही कथा सादर केली. अंबादास केदार यांनी धुरा ही कथा तर प्रा.चंद्रशेखर कळसे यांनी अतिशय ह्दय हेलावणारी पंचनामा ही कथा सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विरभद्र मिरेवाड तर आभार देवकत्ते सरांनी मांडले.
संस्थेच्या रौप्य महोत्सवाची जल्लोषात सांगता
प्रतिनिधी,उदगीर
श्री पांडुरंग विद्यालयाच्या रौप्य महोत्सव सप्ताह दिनांक 3 फेब्रुवारी पासून विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात आला. विविध कार्यक्रम, कार्यक्रम रूपरेषा प्रमाणे यशस्वी रित्या पार पाडण्यात आले. दिनांक 10 फेब्रुवारी रोजी ह. भ. प. हरिहर महाराज दिवेगावकर यांच्या काल्याचे किर्तन व संस्थेचे सचिव श्री विनायकरावजी बेंबडे साहेब यांच्या 65 व्या वाढदिवसाचे अभिष्टचिंतन सोहळा या कार्यक्रमाने रौप्य महोत्सवी वर्षाची सांगता जल्लोषात करण्यात आली. अनेक मान्यवरांनी बेंबडे साहेबांना प्रत्यक्ष भेटून सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक श्री नादरगे एस.व्ही.सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी बेंबडे साहेबांचा सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. उपस्थित सर्वाच्या स्नेहभोजनाची व्यवस्था संस्थेचे सचिव श्री विनायकरावजी बेंबडे साहेब यांनी केली होती. सात दिवसापासून चालू असलेल्या रौप्य महोत्सवाची सांगता कीर्तन सोहळा व अभिष्टचिंतन करून करण्यात आली. कल्लूर, इस्मालपूर परिसरातील सर्व पालक, श्रोते,विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, निमंत्रित पाहुणे या कार्यक्रमात सहभागी होते. अभिष्टचिंतन सोहळ्यामध्ये संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार श्री केंद्रे साहेब,माजी आमदार मनोहररावजी पटवारी साहेब,खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत भाऊ चामले, माजी जी.प. सदस्य शिवाजीराव केंद्रे साहेब तसेच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवर संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सुंदर माझी शाळा सांगितिक काव्यमैफलीला उदंड प्रतिसाद
उदगीर – श्री पांडुरंग विद्यालय कल्लूर या शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले होते. सुंदर माझी शाळा हा कवी, गीतकार व निवेदक गणेश घुले संभाजीनगर यांच्या संगीत काव्यमैफलीचाही कार्यक्रम रसिक, विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने पार पडला. या कार्यक्रमाचे निवेदक गणेश घुले, तबला वादक संतोष लोमटे, संगीत गायक श्रीराम पोतदार, बासरीवादक निरंजन भालेराव हे उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत संस्था सचिव विनायक बेंबडे यांनी केले. त्यांनी आपल्या काव्यमैफलीतून सर्वसामान्यांच्या शिक्षण हक्कासाठी शाहू, फुले आंबेडकरांपासून कर्मवीर भाऊराव पाटलांपर्यंत अनेक महान विभूतींनी वाढवलेल्या शाळांचे खाजगीकरण करून सरकारी शाळा बंद करण्याचा डाव सरकार खेळतेय…हे कवितेतून उभे केले.
आता कुठे हो जमू लागली पाटी पेन्सिल धरू
माझ्या गावची शाळा साहेब बंद नका ना करू…
अशा कवितेतून सध्या बंद पडत असलेल्या मराठी शाळांची व्यथा मांडली आहे तर शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे .त्यांच्या हाती कच-यांची झोळी न देता पाटी पेन्सिल देऊन ज्ञानाच्या प्रवाहात आणले पाहिजे अशी हाक कवी देतो.
कचरा झोळी नको ग आई पुस्तक घेऊ दे
अक्षर अक्षर वेचायाला शाळेत जाऊ दे
शिक्षणाची दुकानदारी दुकान झाली शाळा
हे चित्र आजचे आहे पण रंग उद्याचा काळा
..अशा एकापेक्षा एक सरस आशयसंपन्न कवितांच्या माध्यमातून “सुंदर माझी शाळा” ने बदलत्या शिक्षण व्यवस्थेवर नेमकं भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. नैतिक मूल्यांची शिकवण देणाऱ्या व हरवलेल्या बालपणाचा जागर कविने कवितेत मांडून मुलांना शाळेची ओढ निर्माण करायला लावणारी बालकविता सादर करताच मुलांनी प्रचंड प्रतिसाद देऊन टाळ्या वाजवल्या.







शिक्षणाचा लागे लळा गं
सुंदर माझी शाळा गं…
उजेडाचा काळा फळा गं
सुंदर माझी शाळा गं…
कवीने शिक्षकांच्या शिकवणीवरही उत्तम भाष्य केले आहे. मुलांनी गुरुजींकडे केलेली मागणी कवी करतो
सर, तुम्ही शाळेमध्ये असे काही शिकवा
पळून जावा कंटाळा, निघून जावा थकवा.!
शाळा सोबत फळा ही बदलतो आहे डिजीटल युगाने क्रांती केली. यामुळे मुलं अस्वस्थ होऊ लागली. पालकांनाही मोबाईल मधून बाहेर पडता येत नाही याची खंत मुलं व्यक्त करतात.
सोबत तुमच्या नेहमी, मोबाईल असतो केवळ
घरी आल्यावर तरी , घ्याना मला जवळ.
अशा एकाहून एक दर्जेदार संगीत मैफलीतून सुंदर माझी शाळा हा कार्यक्रम अंर्तमुख होत गेला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवकत्ते परशुराम यांनी केले तर आभार केंद्रे डी.पी. यांनी मांडले.
चिमुकल्यांच्या विविध कलागुणांनी जिंकली प्रेक्षकांची मने.
कल्लूर : पांडुरंग विद्यालय चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात.
उदगीर : तालुक्यातील कल्लूर येथील श्री पांडुरंग विद्यालय येथे घेण्यात आलेल्या वार्षिक स्नेहसंमेलनात चिमुकल्यांच्या विविध कलागुणांनी प्रेक्षकांची मने जिंकली.
अध्यक्षस्थानी संस्थासचिव विनायकराव बेंबडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार संस्थाध्यक्ष गोविंद केंद्रे, तहसीलदार बोगावकर, भगवानराव पाटील तळेगावकर, वाढवणा पोलीस स्टेशन चे सपोनि गायकवाड, प्रा. प्रवीण भो॓ळे…….आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी एकापेक्षा एक सरस गाण्यांवर बहारदार नृत्य सादर करून उपस्थितीत प्रेक्षकांची दाद मिळविली. प्रास्ताविक मुख्याध्यापक एस. व्ही. नादरगे यांनी केले. सूत्रसंचालन पी. बी. देवकत्ते यांनी तर आभार केंद्रे यांनी मानले. कार्यक्रमासाठी ………….. याच्यांसह कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.
लेखक आपल्या भेटीला उपक्रमातून मुलांना प्रेरणा
उदगीर –
पाठ्यपुस्तकातील कवी रमेश तांबे मुंबई यांनी लेखक आपल्या भेटीला या उपक्रमातून मुलांना हितगूज करत प्रेरणादायी कविता सादर केल्या. पांडुरंग विद्यालय कल्लूर या शाळेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विषयाचे शिक्षक रांजेद्र भोळे हे होते. पाहुण्यांचे स्वागत सचिव विनायक बेंबडे यांनी केले.
कवी रमेश तांबे यांनी मुलांसाठी वेगवेगळ्या कविता आणि छोट्या छोट्या प्रबोधनाच्या कथा सादर करित मुलांना खळखळ हसवित त्यांची मने जिंकून घेतली.
किती मजेमजेचे घडले
जेव्हा इवलासा मी झालो
नाकात सुईच्या मी
बिनधास्त झोपी गेलो.
मुलांनी गुरुजीशी, मुलांनी वर्गखोलींशी, खिडकिंशी कसे नाते जपावे? संस्काराचे बिजारोपण करत असलेल्या पांडुरंग विद्यालया सारख्या शाळा ह्या क्वचितच राहिलेल्या आहेत.
वर्गामधली एक खिडकी
मला खूप खूप आवडायची
तिथं बसून रोज मला
ती जग सारं दाखवायची
भाषण या कवितेत अचानक भाषण करताना कशी गडबड आणि फजिती होते, काळजात धडधड वाढू लागते. समोरची पोरं हसतात व स्टेजवर जो बोलतो त्यालाच कळते. या आशयाची कविता
पाचवा होता नंबर माझा
लागलो उजळणी करु
छातीमदी कशी अचानक
धगधग झाली सुरु
दोन्ही हाताने पकडून माईक
आठवू लागलो भाषण
काही कळेना काही सुचेना
दिसू लागले मरण
अशा विविध विषयांवरच्या कविता सादर केले .आपल्या स्वप्न, खिडकी, नवलनगरी आदी कथा सादर करुन रसिकांची व विद्यार्थ्यांची मने जिंकून घेतली. अध्यक्षीय समारोपात राजेंद्र भोळे यांनी मर्ढेकर व केशवसुतांच्या कवितेच्या ओळी सादर करुन आधुनिक कविता कशा प्रकारे पुढे आल्या हे सांगीतले. कार्यक्रमांचे सूत्रसंचलन नादरगे चंद्रदिप तर आभार माधव सुडे यांनी मांडले.
गुणवत्तापूर्ण शिक्षण व संस्कार देणारे पांडुरंग विद्यालय.

रौप्य महोत्सव कार्यक्रमात ना. संजय बनसोडे यांचे मत.
उदगीर : तालुक्यातील कल्लूर येथील श्री पांडुरंग विद्यालय म्हणजे गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबर संस्कार देणारे विद्यालय असल्याचे मत क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
श्री पांडुरंग विद्यालयाचा रौप्य महोत्सव वर्ष उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार गोविंद केंद्रे, ह. भ. प. कैलास महाराज लिंगधाळकर, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य प्रा. श्याम डावळे, भगवानराव पाटील तळेगावकर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले, माजी नगरसेवक गणेश गायकवाड, राहुल अंबेसंगे, उदयसिंग ठाकूर, पंचायत समितीचे माजी उपसभापती रामदास बेंबडे,व्यंकटराव मरलापल्ले,हाणमंतराव हंडरगुळे, समद शेख,रऊफ शेख, राष्ट्रवादी युवक काॅग्रसचे तालुकाध्यक्ष रोहिदास कुंडगीर, कल्लूरचे सरपंच लक्ष्मण कुंडगीर, राहुल कुंडगीर, उपस्थित होते. पुढे बोलताना ना. बनसोडे म्हणाले की, विनायकराव बेंबडे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थांच्या शिक्षणाची सोय व्हावी, म्हणून ही शाळा काढली. या शाळेसाठी सध्या आमदार फंडातून पंचवीस लाख रूपयांचा निधी जाहीर करत असून भविष्यात मोठा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही दिली. प्रास्ताविकात संस्थेचे सचिव विनायकराव बेंबडे यांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख मांडला. लोकनेते गोपीनाथ मुंढे यांच्या पुढाकारातून ही संस्था मिळाली असल्याचे सांगीतले. अध्यक्षीय समारोपात माजी आमदार गोविंद केंद्रे म्हणाले की, ग्रामीण भागातील मुलांची इच्छाशक्ती प्रबळ असेल. तर ते मोठया पदापर्यंत पोहचू शकतात. आज अनेक कष्टकरी, शेतकऱ्यांची मुले स्पर्धा परीक्षा पास होऊन आयएएस, आयपीएस बनत आहेत. म्हणून ग्रामीण भागातील मुलांनी न्यूनगंड न बाळगता अभ्यास करून यशस्वी व्हावे. यावेळी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त काढण्यात आलेल्या पांडुरंगाची ज्ञानगंगा या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवराच्या हस्ते करण्यात आले. सुत्रसंचालन प्रा. प्रविण भोळे यांनी केले. तर आभार मुख्याध्यापक नादरगे एस.व्ही यांनी मानले. कार्यक्रमासाठी शाळेतील माजी विद्यार्थ्यांसह कल्लूर, इस्मालपूर, मन्ना उमरगा, अनुपवाडी, कर्लेवाडी, वंजारवाडी, एकुर्का रोड आदीं गावचे पालक मोठ्या संख्येनी उपस्थित होते.