
विशेष लेख:
‘बटेंगे तो और भी कटेंगे ‘
लेखक :©️ रघुनंदन भागवत
प्रत्येक निवडणुकीत नेहमी एक विशिष्ट ‘थीम ‘ जन्म घेते आणि त्या ‘थीम ‘ भोवती ती निवडणूक फिरत रहाते. १९५२ ते १९६७ पर्यंत देशात काँग्रेसची एकपक्षीय राजवट असल्याने सर्व निवडणुका या ‘स्थिर सरकार ‘ च्या संकल्पनेआधारे लढवल्या गेल्या. १९७१ ची निवडणूक ‘गरिबी हटाव ‘ या इंदिरा गांधीच्या घोषणेभीवती केंद्रित होती.त्यापुढे विरोधकांच्या बड्या आघाडीची ‘इंदिरा हटाओ ‘ ही रणनीती फोल ठरली. १९७७ ची निवडणूक आणीबाणी विरोधात लढवली गेली आणि जनतेनेच ‘इंदिरा हटाव ‘ असा कौल दिल्याने काँग्रेसचा प्रथमच पराभव झाला. १९८०च्या निवडणुकीत ‘इंदिरा लाओ देश बचाओ’ ही काँग्रेसची घोषणा मध्यवर्ती होती. १९८४ च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा हत्येमुळे राजीव गांधींसाठी सहानुभूतीची लाट होती. १९८९ च्या निवडणुकीत ‘बोफोर्स तोफांच्या खरेदीतील लाच प्रकरण’ केंद्रस्थानी होते व त्याचा फटका काँग्रेसला बसला. त्यानंतर १९९९ पर्यंत अस्थिर आघाडी सरकारांचा जमाना होता त्यामुळे ‘पक्षीय/वैयक्तिक स्वार्थ ‘ हाच कळीचा मुद्दा होता. २००४ ची निवडणूक भाजपच्या ‘इंडिया शायनींग ‘ या स्वप्नाभोवती लढवली गेली.
२००९ ची निवडणूक ‘टीना ‘(there is no alternative) या टॅगलाईनवर लढवली गेली. २०१४ ची निवडणूक ‘इंडिया अगेन्स्ट करपशन’ च्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लढवली गेली आणि काँग्रेसचा दारुण पराभव झाला. २०१९ ची निवडणूक राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर लढवली गेली.
२०२४ची निवडणूक ‘आरक्षण व संविधान ‘ बचाओ या विरोधकांच्या अजेंड्यावर लढवली गेली व त्यापुढे भाजपचा ‘अब की बार चारसो पार ‘ हा आत्मविश्वास धुळीला मिळाला.
सध्या महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणुका एका वेगळ्याच भावनिक आवाहनाच्या लाटेवर स्वार झाल्यासारख्या दिसतात. हे भावनिक आवाहन आहे ‘बटेंगे तो कटेंगे ‘ आणि हे आवाहन केले आहे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सकल देशभक्त नागरिकांना. या आवाहनाला जनतेकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि तेच जणू या निवडणुकांचे घोषवाक्य ठरले आहे. पंतप्रधान व सरसंघचालकांनी सुद्धा योगींच्या या भूमिकेला अनुमोदन दिले आहे.या सर्वांनी समस्त राष्ट्रभक्त देशवासियांना एक होण्याची कळकळीने साद घातली आहे कारण ‘एकी हेच बळ ‘ ठरणार आहे.
योगीना हे आवाहन का करावे लागले त्यासाठी वर्तमानाबरोबरच भूतकाळातले काही संदर्भ आहेत.
पृथ्वीराज चौहान यांनी मोहम्मद घोरीचा १२ वेळा पराभव केला होता. पण तेराव्या वेळी पृथ्वीराज यांचा मेहुणा जयचंद यानेच असूयेपोटी मोहम्मद घोरीला निमंत्रण दिले आणि पृथ्वीराज चौहानांचा नाश घडवून आणला.
‘बटे और कटे ‘.
काही राजपूत, व मराठे यांनी परकीयांशी एकजुटीने लढण्याऐवजी आपापसात लढण्यात धन्यता मानली. काही जणांनी तर आक्रमकांची चाकरी करण्यातच पुरुषार्थ मानला.उदा. मिर्झाराजे जयसिंग.परिणाम काय झाला? राणा प्रताप स्वातंत्र्यासाठी अपार हालअपेष्टा भोगत रानोमाळ भटकत राहिले तर जयसिंग राठोड अकबरला आपली बहीण ((जोधाबाई ) देऊन ‘स्वर्गसुख ‘ उपभोगत राहिला.
‘राजपूत बटे और कटे’
छत्रपती संभाजीराजे फितूरीमुळे औरंगजेबच्या हाती लागले व धर्मारक्षणासाठी अनन्वित अत्याचार सहन करत हुतात्मा झाले.
१७६१ च्या पानिपत लढाईपूर्वी नजीबुल्ला राघोबादादांच्या तावडीत सापडला होता. ते त्याला ठार मारणार होते पण मल्हारराव होळकर आड आले कारण त्यांनी नजीबुल्लाला ‘अभयदान’ दिले होते. परिणाम काय झाला? नजीबुल्लाने अहमदशाह अब्दालीला बोलावले व मराठ्यांचे ‘पानिपत ‘ घडवून आणले.
१७६१ च्या पानिपताच्या लढाईत मल्हाररावांना मराठ्यांचे सरसेनापती व्हायचे होते. पण भाऊसाहेब पेशव्यानी त्यांची इच्छा मानली नाही.ऐन युद्धात विश्वासराव पेशवे धारातीर्थी पडल्यावर व भाऊसाहेब पेशवे बेपत्ता झाल्यावर मराठा सैन्याचे नेतृत्व करण्याचे सोडून मल्हारराव आपल्या सैन्यासकट इंदोरला निघून गेले. मराठ्यांचा दारुण पराभव झाला.
पानिपतच्याच लढाईत सुरजमल जाट मराठ्यांच्या मदतीला आला नाही कारण त्याचा मराठ्यांवर राग होता.(मराठ्यांनी काही काळापूर्वी त्याच्याकडून खंडणी वसुल केली होती) पण देशातील सर्व मुसलमान राजे आपसातील मतभेद विसरून अब्दालीच्या नेतृत्वात एक झाले.(दिल्लीचा बादशाह अपवाद)
परिणाम
‘मराठे बटे और कटे’
१८५७ च्या स्वातंत्र्यसमरात राणी लक्ष्मीबाई मदत मागण्यासाठी ग्वालीयरला शिंदे राजघराण्याकडे गेल्या. पण राणीला मदत करण्याऐवजी शिंद्यानी ब्रिटिशांना कळवले की राणी ग्वाल्हेरला आपल्याकडे आलेल्या आहेत. ब्रिटिशांनी राणीवर हल्ला चढवला आणि या हल्ल्यातच राणी लढता लढता ब्रिटिशांकडून मारली गेली.झाशीचा किल्ला भग्नावस्थेत आहे तर ग्वाल्हेरचा राजप्रासाद इंद्राला सुद्धा हेवा वाटावा असा आहे.
तात्या टोपेनी ब्रिटिशांना दे माय धरणी ठाय केले होते. पण फितुरीने घात केला आणि तात्या फासावर लटकले.
हिंदुस्थानी बटे और कटे.
१९४२ मध्ये व १९४६ च्या प्रांतिक व केंद्रीय विधिमंडळाच्या निवडणुकीत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी (हिंदू महासभा )गोळवलकर गुरुजींच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा मागितला होता. पण गुरुजींनी नकार दिला.संघ स्वयंसेवकांनी काँग्रेसला मतदान केले आणि हिंदुमहासभेचा एकही उमेदवार निवडून आला नाही.काँग्रेस व मुस्लिम लीग बहुतांशी सत्तेत आले. केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळात हिंदूंचा एकही प्रतिनिधी उरला नाही. याचे परिणाम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला गांधींवधांनंतर भोगावे लागले. संघावर बंदी घातली गेली तेव्हा संघावर अन्याय झाला असे म्हणणारा एकही प्रतिनिधी विधमंडळात नव्हता.संघ एकाकी पडला. यातूनच पुढे जनसंघ या राजकीय पक्षाची स्थापना झाली.
देशभक्त भारतीय बटे और कटे.
हैद्राबाद मुक्तीसंग्रामात हिंदू महासभेने उडी घेतल्यानंतर गांधीजींच्या काँग्रेसने अंग काढून घेतले कारण त्यांना हिंदू महासभेसारख्या जातीय पक्षांबरोबर आयडिन्टिफाय होणे मंजूर नव्हते.( पण गांधीजींना कासीम रिझवीचे वावडे नव्हते ). यामुळे निजामचे फावले. त्याला नेहरूकडून एक वर्षासाठी लाईफ लाईन मिळाली ती ‘स्टेटस को ‘ च्या स्वरूपात. म्हणूनच हैदराबादचे विलीनीकरण लांबले व सरदार पटेल नसते तर ते कदाचित झालेही नसते.
देशभक्त भारतीय बटे और कटे.
आता अगदी अलीकडचे उदाहरण पाहू. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत धुळे मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला मालेगाव सोडून इतर पाच विधानसभा मतदारसंघात १ लाख ९० हजार मतांची आघाडी होती. पण एका मालेगाव मतदारसंघात मुसलमानांची दोन लाखाहून अधिक मते एकगठ्ठा काँग्रेसला पडली व भाजप उमेदवार पराभूत झाला.
असेच चित्र इतर अनेक मतदारसंघात दिसले. आसाममध्ये नौगांव या मुस्लिमबहुल मतदारसंघात ९०% मुस्लिमांनी काँग्रेसला एकगठ्ठा मतदान केले. पण मथुरा या हिंदुबहुल मतदारसंघात फक्त ४८%हिंदूंनी मतदान केले.
हिंदू बटे और कटे.
वरील उदाहरणाव्यतिरिक्त इतर अनेक उदाहरणे आहेत ज्यात भारतीय समाजातील फूट परकीय आक्रमकांच्या /स्वदेशी सत्ताधाऱ्यांच्या पथ्यावर पडली.
योगी आज म्हणूनच सावध करत आहेत की’ बटेंगे तो कटेगे’. पण मी म्हणतो की इतिहासात भारतीयांनी आधीच दुफळीचे परिणाम भोगले आहेत त्यातून धडा घेतला नाही तर ‘बटेंगे तो और भी कटेंगे’
©️ रघुनंदन भागवत
raghunandan. bhagwat@gmail.com
संदर्भ टीप :-विश्वास पाटील यांची ‘पानिपत ही कादंबरी, विनय सीतापाती यांचे ‘वाजपायी -अडवाणी जुगलबंदी हे पुस्ततक, अनंत भालेराव यांचे मराठवाडा मुक्तीसंग्रामवरील पुस्तक, वृत्तपत्रीय बातम्या, प्रत्यक्ष ऐतिहासिक स्थलांना दिलेल्या भेटीत मिळालेली माहिती.