

बार्टीवर मातंग समाजाचा विश्वास हे प्रेरणादायी – धम्मज्योती गजभिये
पुणे — दिनांक 22 जानेवारी प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे ही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था आहे.अनुसूचित जातीत मोठ्या संख्येने असलेल्या मातंग समाजाच्या विकासासाठी ती प्राधान्याने काम करत आहे. या संस्थेमुळे महाराष्ट्रातील मातंग समाजाचे पारंपारिक स्वरूप बदलून चालले असून हा समाज आधुनिक आणि विकासाच्या दिशेने पुढे जाईल,असे मातंग समाजातील होतकरू संघटनांची भूमिका बनत चालली आहे.ती आपल्यासाठी प्रेरणादायी असल्याची माहिती बार्टी संस्थेचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी व्यक्त केली.
दिनांक 20 जानेवारी 2023 रोजी बार्टी मुख्यालयात माजी समाजकल्याण मंत्री – दिलीप कांबळे यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या मातंग समाजातील विविध पक्ष संघटनां संवाद बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते.
बार्टी महासंचालक गजभिये यांनी मातंग समाजासाठी बार्टी कार्यालयाकडून आजवर केल्या जात असलेल्या विविध विकास कामासंबंधी या संवाद बैठकीत सविस्तर माहिती सादर केली. याप्रसंगी कौशल्य प्रशिक्षण, विस्तार व सेवा योजना, जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी तसेच एम.पी.एस.सी/यू.पी.एस.सी/रेल्वे/बँकिंग इ.क्षेत्रांमध्ये मातंग समाजातील तरुण-तरुणींना प्राधान्य दिले जाईल. नजीकच्या काळात मातंग समाजातील तरुणांना त्या-त्या सेवेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रशिक्षित केले जाईल.बेंचमार्क सर्वेक्षणामधून मातंग समाजाचा डाटा शासकीय पातळीवर कायमस्वरूपी जतन होत राहील. युवा गटांच्या माध्यमातून मातंग समाजातील तरुण-तरुणींना शासकीय पातळीवर सक्षम करण्याचे काम केले जाईल. त्यांच्यासाठी चांगल्या सोयी आणि सुविधांची पूर्तता असणारी निवासी प्रशिक्षण केंद्रे देण्यासाठी प्रयत्न केला जाईल. यामधून तरुणांच्या हाताला रोजगार मिळत जाईल अशा पद्धतीचे उपक्रम बार्टीमार्फत चालवले जातील, वस्ताद – लहुजी साळवे यांच्या जन्मदिनी आणि स्मृतिदिनी त्यांच्या स्मृती स्थळावर अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रातून येणाऱ्या लहुसेनेसाठी सर्व प्रकारच्या सोयी आणि -सुविधा येथून पुढे उपलब्ध करून देण्यात येतील,असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.