
बिघडलेल्या समाजव्यवस्थेवर ताशेरे ओढणारा कविता संगृह: ” घाव ” -प्रा.डाॅ. नरसिंग कदम बनवसकर
फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेने समाजव्यवस्थेला कलाटणी दिली.बहुजनाच्या दारापर्यंत शिक्षण पोहोचले. शिक्षण घेतल्यानंतर विद्रोह, नकार करणारे वाढले. जुलुमी राजवटीत जगणारे आवाज उठवू लागले. हा आवाज बुलंद करण्याचे काम त्यांच्या लेखणीने केले. अनेक चळवळी उदयाला आल्या. धर्मांधता, जातियवाद यापलिकडचे जीवन जगायला सुरुवात झाली. जे शोषित होते त्यांनी शोषणकर्त्यास विरोध करायला सुरुवात केली. प्रत्येकाला आपल्या अस्मितेची जाणीव झाली. आत्मसन्मानाने जगले पाहिजे हा भाव तयार झाला. लाचार, गुलाम होणे बंद झाले. पोटाला खायला मिळाले नाही तरी बहुजन वर्ग स्वाभीमानाने जगू लागला. अशा स्वाभीमानाने जगणारे व्यक्तिमत्व, आपल्या लेखणीच्या माध्यमातून व व्याख्यानातून परखड विचार मांडणारे व्यक्तिमत्व म्हणजे प्रा. डॉ शिवाजीराव देवनाळे होत. देवनाळे हे पद्मावती कनिष्ठ महाविद्यालय,गुडसूर येथे 'कार्यरत आहेत.ते महाराष्ट्र राज्य महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन मंडळाचे सदस्य आहेत.अनेक नामांकित वर्तमानपत्रातून त्यांचे शेकडो वैचारिक, सामाजिक व परिवर्तनवादी विचाराचे लेख प्रकाशित झालेले आहेत. हजारो समाजप्रबोधनपर व्याख्यानातून सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याचा ते प्रयत्न करीत आलेले आहेत पुढे चालू आहे. शैक्षणिक, आरोग्य, आदिवासी, दलित, शोषित आदी समस्येवर व्याख्यानातून त्यांनी जाणीव जागृती केलेली महापुरुषांचे जीवनकार्य, त्यांच्या प्रेरणा समाजापर्यंत आपल्या व्याख्यानाच्या मार्फत पोहोचवण्याचे कार्य अविरतपणे ते करत राहातात.महिला सबलिकरण, अंधश्रद्धा निर्मूलन आदी माध्यमातून समाज - प्रबोधन करत असतांना ज्या अनुभूती आल्या. त्या अनुभूतींचा लेखाजोखा म्हणजेच त्यांचा 'घाव' हा कवितासंग्रह होय. प्रा डॉ देवनाळे यांचा 'घाव'हा पहिलाच कवितासंग्रह असूनही त्यांनी चांगला विषय हाताळलेला आहे. संबंध कवितासंग्रहातून समाजव्यवस्थेचे विविधांगी पातळीतून चिंतन केलेले विचार व्यक्त होतात. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेकजण शिक्षित झाले,उच्चपदस्थ झाले पण त्यांनी पुन्हा मागे फिरून पाहिले नाही याची खंतही कवी व्यक्त करतात. प्रसंगी चांगल्या कार्याचे गोडवेही गातात . जे वाईट चाललेले आहे त्यावर ताशेरेही ओढतात. त्यांची कविता समाजातील धगधगत्या वास्तवाला अधोरेखित करताना स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची जाणीव करून देते. आपल्या मनोगतातून त्यांनी म्हटले, फुले, शाहू,आंबेडकरी विचाराचा धागा मिळाल्यामुळे आम्ही माणूस झालो. शिक्षणाची कास पकडून आम्ही शिक्षित झालो. हातात लेखणी घेऊन आम्ही व्यक्त झालो. भारत हा कृषिप्रधान देश आहे. अशा या देशात जन्माला येणे हे आमचे भाग्य आहे. असे भाग्य लाभल्यामुळे आम्ही निडरपणे जगतो. या जगण्याबद्दल कवी म्हणतात,
‘पावन भूमिची लेकरं आम्ही नाही कुणाची भिती
दिव्य देशाचे पुत्र आम्ही पर्वा कशाची ईथे।
ही देशाची भूमी दैदिप्यमान आहे. सहयाद्रीच्या सिंहाची गर्जना, संताचा इतिहास, क्रांतीकारकांची निधडी छाती या देशाला महान बनवते. या मातीचा टिळा कपाळी लावून आम्ही स्वाभीमानाने जगतो अशी देशाची महती कवीने गायली आहे. या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकजण शहीद झाले त्यांना अभिवादन करताना कवी म्हणतात,
तोफाचा वर्षाव सहन करुनी
जपले होते बाळांना
राक्षसी धाड पडली तेव्हा अर्पण केले बाळांना त्या माऊलींनी बाळांना देशासाठी अर्पण केले म्हणून आम्ही चांगले दिवस जगत आहोत. आज आम्ही सुखेनैव वागत आहोत याची जाण आम्ही सर्वांनी ठेवली पाहिजे हा सल्लाही ते सर्वांना देतात. स्वातंत्र्य मिळाले, आम्ही सुखासीन झालो, आळशी झालो.सर्व काही विसरून गेलो. चैन,मोज,मजा कराण्यामध्ये व्यस्त झालो. परंतु आपण मागे वळून पाहिले पाहिजे.
याची खंत व्यक्त करतात.
युवकांचा देश तुमचा स्वप्न पहा बलवान
एकता इथे जिवंत ठेवू देश एकसंघ
विवेकानंदाच्या भूमीमध्ये उधळू समता रंग । या देशात एकता टिकवून ठेवण्यासाठी बांधील राहिलो तरच देश चांगला चालेल. युवकांचा देश बलवान आहे त्याच्या शक्तीचा विनियोग सत्कार्यासाठी व्हावा असे कवीला वाटते. आपण उच्चशिक्षित झालो. त्यांच्या कार्याचा, विचाराचा ठेवा पुढे चालवला पाहिले. कारण,
ज्योतिबाच्या शब्दाचं चांदणं, स्मशाणावर पडलं काल मातीत कुजणारं मढं सोन्यानं मढलं
ज्योतिबानं शिक्षण घराघरापर्यंत नेऊन पोचवलं म्हणूनच आपलं सोन्यात रूपांतर झालं. परिसाचा स्पर्श खूप महत्वाचा असतो.तो परिसस्पर्श आपल्याला झाला त्याचा विनियोग चांगला करावा हा संदेश ते देतात.
जीवनाचा मार्ग सरळ असावा लागतो वाट वाकडी केली, अज्ञानी राहिले तर काय होते हे सांगताना कवी म्हणतात,
नजर वाकडी करू नको बाळा
मोठी झाली माणसं ज्ञानानं.
ज्ञान संपादन केलेली माणसेच मोठी झालेली आहेत, होत आहेत. फक्त ज्ञान संपादन करा हा बहुजनाला अनमोल संदेश देतात. हे सर्व संपादन करताना मात्र लोकशाही कशी पायदळी तुडवली जात आहे याची खंत प्रा देवनाळे व्यक्त करतात.
‘कधी लुटतात आब्रु आमच्या कत्तली होतात पदोपदी न्याय कुठे आम्ही मागायचा आता
लोकशाही आम्हाला दिसेल कधी समता आमच्या जवळ येत नाही, स्वातंत्र्य आम्हाला शिवतही नाही. सर्वत्र उपेक्षिताचे तांडे फिरत आहेत. लोकशाही फक्त कागदावरच दिसत आहे हे पाहून कवी हतबल होतात. दारिद्रय, दैन्य, विषमता यामध्ये पिचत जाणारा वर्ग खचला जात आहे.गरीब गरीबच तर श्रीमंत श्रीमंतबच होत आहे. अन्याय,अत्याचार वाढत चाललेला आहे. मग लोकशाही कुठे आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आजही जातीपातीचे राजकारण केले जात आहे. गावागावामध्ये किचक आहेत. जातीयतेचे झेंडे घेऊन हेंडगा लावतात. म्हणून आज परत एकदा भिमाची गरज आहे. म्हणून म्हणतात,
भिमा याल का जरा येळ थोडा काढून
तळ्याच्या सत्याग्रहासाठी व्याकुळ आहेत पक्षी ओंजळभर पाण्यासाठी भिमाने विचार पेरले पण ते जास्त रुजले नाहीत. संमाजातील विषमता नष्ठ झाली नाही.ती नष्ठ करण्यासाठी भिमाला परत एकदा यावे लागेल असे कवीला वाटते. पोचीरामाने नामांतराच्या लढ्यांत भाग घेतला.अतिशय निखराने लढा दिला पण जातीव्यवस्थेचा तो बळी गेला. त्याला गावकऱ्याची माफी मागायची व जयभीम म्हणायचं नाही असं सांगितलं. त्यानंतर त्याला सोडून दिले जाणार होतं पण तो झुकला नाही. त्याला जिवंत जाळलं.त्याची व्यथा व्यक्त करताना कवी म्हणतात,
तुझ्या गगनभेदी आरोळीत आकाश पाताळ एक झालं बाजत कन्हत पडलेलं म्हातारही
झोपडीच्या बाहेर आलं पोचिराम कांबळेचा लढा गल्लीबोळात जाऊन पोहोचला. आजही गावागावातला किस्या, उम्या, राम्या हातामध्ये निळ्या पताका घेऊन गर्जत आहेत. अन्यायाविरुद्ध बंड करत आहेत. अशा बंडाची भाषा बोलताना कवी दिसतो. समाजातील जातीपाती, व्यसन, निसर्गाचे
संवर्धन, शिक्षणाचे महत्व, शब्दाचे मोल, व्यसनाधिनता, मजूर, भिकारी, लाचार, शहीद आदी विविध विषयाला वाचा फोडण्याचे काम, वास्तव चित्रण मांडण्याचे काम देवनाळे यांनी परखडपणे केलेले आहे.प्रा देवनाळे स्वतः विविध माध्यमातून सामाजिक परिवर्तनासाठी कार्य करत असल्यामुळे त्यांच्या कविता काल्पनिकतेकडे झुकलेल्या नसून वास्तविकता चितारताना दिसतात. वाचक ‘घाव’ या कवितासंग्रहाचे स्वागत करतील असा आशावाद बाळगतो.
समीक्षक
प्रा.डॉ.नरसिंग अप्पासाहेब कदम
कवी, कथाकार, वात्रटिकाकार, समीक्षक तथा संपादक शिवाजी महाविद्यालय, उदगीर जि.लातूर 413517 भ्र.9404731010