
बौद्धांचे आद्यकर्तव्य आहे की त्यांनी दर रविवारी बुद्ध विहारात जावे. __ डॉ. बाबासाहेब आंबेडकर (२४ नोव्हेंबर १९५६, सारनाथ)
मित्र हो,
आपण ज्या आदर्श महापुरुषांना मानतो त्यांच्या आदेशयुक्त संदेशाचे आपण पालन करतो काय? हा प्रश्न आम्ही आता स्वतःलाच विचारला पाहिजे. त्याचे उत्तर होय असेल तर आपले अभिनंदन आहे. मात्र नाही असेल तर त्याचे समर्पक उत्तरे शोधून मार्गक्रमण करण्याची नितांत आवश्यकता आहे, असे मला वाटते. म्हणून काळाची प्रासंगिकता लक्षात घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर २४ नोव्हेंबर १९५६ ला सारनाथ येथे “बौद्धांचे आद्यकर्तव्य आहे की त्यांनी दर रविवारी बुद्ध विहारात जावे” असे म्हटले होते. तर मग आपण या आदेशयुक्त संदेशाचे कितपत पालन करीत आहोत? याचा वैचारीक जमाखर्च, आयव्यय मांडला पाहिजे. म्हणून माझ्या भावना शब्दबद्ध करण्याचा प्रयत्न करीत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर २३ नोव्हेंबर १९५६ ते २७ नोव्हेंबर १९५६ पर्यंत सारनाथ येथे होते. त्या काळात २४ नोव्हेंबर १९५६ ला दुपारी ३ वाजता काशी हिंदू विश्वविद्यालय संघाच्या वतीने आयोजित आर्टस् काॅलेजच्या मैदानात भरलेल्या सभेला मार्गदर्शन करताना ‘ब्रह्मं सत्यं जगन्मिथ्या’ या शंकराचार्यांच्या विधानावर भाष्य करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की, ब्रह्म तेवढे सत्य असेल तर इतर सत्याचे काय? व्यावहारिक जीवनात माणसाची पंच ज्ञानेंद्रिये हीच सत्याला निर्वाळा देतात. ज्ञानेंद्रिये हीच ज्ञानार्जनाची अंतिम साधने आहेत. अशावेळी शंकर मात्र, ब्रह्म कुठे आहे? याचा सुगावा लागू देत नाही. ब्रह्म सार्वत्रिक असेल तर तो ब्राह्मणात व अस्पृश्यात ही असायला हवा.
‘जगन्मिथ्या’ जग एक दृष्टिभ्रम आहे. आमच्या ज्ञानाची साधने म्हणजे आमची ज्ञानेंद्रिये जगाच्या अस्तित्वाची जाणीव करून देत असताना जगाचे अस्तित्व कसे नाकारता येईल? म्हणून ‘ब्रह्मं सत्यं जगन्मिथ्या’ ही एक बौद्धिक लटपट आहे, असे बाबासाहेब म्हणतात. त्यात त्यांनी विषमता प्रधान वैदिक व ब्राह्मणी धर्म ग्रंथाना तिलांजली देऊन राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या तत्त्वांची स्वीकृती केली पाहिजे.
तसेच २४ नोव्हेंबर १९५६ ला सारनाथ येथे उपस्थित जनसमुदाय व भिक्खूंना संबोधित करताना डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की, हिंदू धर्म ग्रंथ व राज्य घटना या दोन्ही गोष्टी एकत्रित राहू शकत नाहीत. तद्वतच ‘ब्रह्मं सत्यं जगन्मिथ्या’ या शंकराचार्यांच्या सिद्धांताला तुच्छ व निरर्थक ठरवून नव्याने बौद्ध झालेल्या बौद्धांचे आद्यकर्तव्य आहे की, त्यांनी दर रविवारी बुद्ध विहारात गेले पाहिजे जेणेकरून त्यांना बौद्ध धर्माचा परिचय होईल. याचा अर्थ जुन्या बौद्धांना यातून सुट दिली आहे, असा होत नाही. मात्र वर्तमानात अपवादात्मक स्थितीत काहींना सोडले तर बहुतांश जुने असोत की नवीन! ते मात्र जाणीवपूर्वक बुद्ध विहारात जाण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. असे कमी अधिक प्रमाणात सामाजिक चित्र पाहायला मिळत आहे. उलटपक्षी प्रत्येक शहरात व खेड्यापाड्यात असणाऱ्या अनेक विहारात जाणाऱ्या वृद्ध व्यक्ती पहायला मिळत असल्या तरी नवीन पिढीचा त्यात अंतर्भाव नाही. ही निर्वात पोकळी, उणीव भरून काढण्याचे कर्तव्य जबाबदार व्यक्तींनी पार पाडण्याची आवश्यकता आहे.
भारताचा इतिहास समजून घेताना हे लक्षात येते की, प्रथमतः परकीय आर्य व स्वकीय नाग लोक यांच्यात झालेल्या युद्धात नाग लोकांचा पराभव झाल्याने आर्यांनी त्यांची अमानवीय बंधने नाग लोकांवर लादली. याचे संदर्भ स्पष्ट करताना बौद्ध धर्माचा स्वीकार केल्यानेच अस्पृश्य वर्गाचे कल्याण होईल असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिपादन केले आहे. तसेच बौद्ध झाल्यावर सुद्धा येथील हिंदूनी आम्हाला समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला तर बर्मा, चीन, जपान, श्रीलंका या सारख्या बौद्ध राष्ट्राच्या मदतीने आम्ही ते मिळविल्या शिवाय राहणार नाही, असेही स्पष्ट केले होते. ज्या प्रमाणे विविध मार्गाने आलेल्या नद्यांचे समुद्रात मिलन झाल्यावर अस्तित्व संपुष्टात येते त्याचप्रमाणे विविध समूहातील माणसांनी बौद्ध धर्मांचा स्विकार केल्यावर त्यांचे मूळ अस्तित्व संपुष्टात येऊन बौद्ध धर्माची नवीन ओळख निर्माण होते. तर मग आपण वर्तमानात नेमके कुठल्या वळणावर आहोत? आपल्या विहारात जाणाऱ्या व्यक्ती नेमके काय करतात? ज्यामुळे इतरांनी त्यांचे अनुसरण करून विहारात जावे. असे काहीच घडत नसेल तर बौद्धांनी विहारात का जावे? हा प्रश्न अनुत्तरित राहतो. याची सोडवणूक करण्यासाठी २५ नोव्हेंबर १९५६ ला डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे “माणसामानसातील संबंध प्रेम, करुणा या तत्त्वानुसार जोडणा-या बौद्ध धर्माचा मध्यवर्ती सिद्धांत समता आहे.” हे समाजाला पटवून देण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यावरील उपाय योजनावर विहारात चर्चा होणे गरजेचे आहे. तसेच अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण व रोजगार या संबंधित समस्यांवर सातत्याने विहार व्यवस्थापनाने चर्चा घडवून आणल्या तरच जनता विहारात येईल. याची जाणीव ठेवून मार्गक्रमण करण्याची नितांत आवश्यकता आहे. करिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे बौद्धांचे आद्यकर्तव्य आहे की त्यांनी दर रविवारी बुद्ध विहारात जावे. या विधानाच्या ६८ व्या वर्धापनदिनानिमित्त मी माझे त्रोटक मत व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे.
लेखक : मेश्राम बी. बी., संचालक : फुले शाहू आंबेडकराईट स्टडी सर्कल व नॅशनल कौन्सिल मेंबर ऑफ दि ऑल इंडिया नाग असोसिएशन (आईना), छत्रपती संभाजी नगर, महाराष्ट्र.
संपर्क : ९४२१६७८६२८