४१२. अभंग क्र. ४१६०

बौध्यअवतार माझिया अदृष्टा ।मौन्य मुखें निष्ठा धरियेली ।।१।।

लोकांचियेसाठी शाम चतुर्भुज । संतांसवें गुज बोलतसां ।।धृ।।

आलें कलियुग माझिया संचिता । डोळां हाकलितां न पडेसी ।।२।।

म्यांच तुझें काय केलें नारायणा । कां नये करुणा तुका म्हणे ।।३।। मौन धारण केलेला हा बौद्धअवतार माझ्या वाट्याला आला आहे. लोकांसाठी शाम चतुर्भुज झाला आहे. संतांशी गुजगोष्टी करत आहे. माझ्या भाग्यात हे कलियुग आलं आहे, तुझं रुप डोळ्यापुढून हाकललं तरी जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, "मीच तुझं असं काय घोडं मारलं आहे की तुला माझी कींव येत नाही?" माझ्या नशिबी हा मौनव्रत धारण केलेला बुद्धाचा अवतार आला आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. विठ्ठलाची मूर्ती ही बुद्धाचीच मूर्ती आहे असं अनेक तज्ञ, अभ्यासू लोकांनी मांडलं आहे. बुद्ध हा विष्णुचा नववा अवतार मानला जातो. विठ्ठल म्हणजे विष्णुच आहे अशीही मांडणी केलेली दिसते. संत बहिणाई पाठक आपल्या एका अभंगात लिहितात, "कलियुगी देव बौद्ध्यरुप झाला। तुकोबा शरीरी प्रवेशिला ।। म्हणजे कलियुगात देवाने बुद्धाचं रुप घेतलं आणि त्याने तुकाराम महाराजांच्या शरीरात प्रवेश केला आहे. तुकाराम महाराज जसे नामदेवांचा अवतार मानले जातात तसेच ते बुद्धाचेही अवतार मानले जातात. आपला वारसा हा तथागत भगवान गोतम बुद्धांचा वारसा असल्याची जाणीव अनेक वारकरी संतांना होती असं दिसून येतं. संतशिरोमणी नामदेव महाराज जे वारकरी धर्माचे संस्थापक मानले जातात ते म्हणतात, "बौद्ध अवतारी आम्ही झालो संत । वर्णावया मात नामा म्हणे ।।" तुझा बुद्धावतार वर्णन करण्यासाठी म्हणजे बुद्धविचार लोकांना सांगण्यासाठी आणि बौद्धावतारात तु कशी वैदिकांवर मात केली होती ते वर्णन करण्यासाठी आम्ही संत झालो आहोत, अशा शब्दात नामदेव महाराज संतांचं अवतारकार्य सांगतात. तर संत जनाई म्हणतात, "बौद्ध अवतार होऊन । विटे समचरण ठेऊन ।।पुंडलिक दिवटा पाहून । तयाचे द्वारी गोंधळ मांडिला ।। बया दार लाव । बौद्धाई बया दार लाव ।।" संत एकनाथ महाराजांनी तर अनेक बुद्धाला बोधाई माऊली म्हटलं आहे. "बोधोनि सकळही लोका । बोधे नेले त्रिविध तापवो ।। बौद्धरुपें नांदसी । बोलेविना बोलणे एक वो ।। साधक बाधक जेथे एकपणेच बोधविसी वो । ऊदो म्हणो ऊदो बोधाई माऊली हो ।।" किंवा

“लोक देखोनि उन्मत्त । दारांनी आसक्त ।।न बोले बौद्धरुप । ठेविले जघनी हात ।।”
“धर्म लोपला अधर्म जाहला । हे तु न पाहसी ।। या लागे बौद्धरुपें पंढरी नांदसी ।।” या सर्वांवरुन विठ्ठल हा बुद्धच आहे असं संत परोपरीने सांगताना दिसतात.
बुद्ध हा विष्णुचा अवतार मानला गेला तरी या अवतारात त्याने कोणताही चमत्कार केला नाही. कोणालाही ठार मारलं नाही. कोणत्याही लीला केल्या नाहीत. तर जगाला शांतीचा आणि अहिंसेचा संदेश दिला. समतेचा संदेश दिला. कृष्णावतारातही कृष्ण वर्णव्यवस्थेची बंधनं धुडकावून लावतो. सर्व जातीच्या सवंगड्यांबरोबर खेळतो. एकत्र काला करतो. तो जातपात वा अस्पृश्यता पाळत नाही. तो द्वारकेला जाणारं लोणी अडवून ते गोरगरीब सवंगड्यांना वाटतो. आकाशातल्या इंद्राची पूजा बंद करुन भूवरच्या गोवर्धन पर्वताची पूजा सुरु करतो. हे सर्व करत असला तरी तो अर्जुनाला गीता सांगतांना “चातुर्वर्ण व्यवस्थेचं’ समर्थन करतो त्यामुळे त्याने आधी जे केलं त्या सर्वावर पाणी फिरतं. आपलं वर्णश्रेष्ठत्व इतर वर्णाच्या लोकांच्या मनात ठसावं यासाठी ब्राह्मणांनी कृष्णाच्या तोंडी ‘चातुर्वर्णम् मया सृष्ट्यम्’ हे उद्गार नंतर घुसडले असं सांगितलं जातं. पण तथागत बुद्ध अतिशय स्पष्ट शब्दात चातुर्वर्ण व्यवस्था नाकारतात. माणसामाणसातले भेद नाकारतात. जन्माधिष्ठित उच्च-नीचता नाकारतात. समतेचा पुरस्कार करतात. सर्वांना समान अधिकार असल्याचं सांगतात। स्त्रीसुद्धा पुरुषाइतकीच कर्तृत्ववान असू शकते असं सांगून वैदिकांनी स्त्रीयांना जे ‘चूल आणि मूल’ या चौकटीतच कोंडून ठेवलं होतं ते त्यातून स्त्रियांची मुक्तता करतात. तुकाराम महाराजही “अवघी एकाचि च वीण । तेथे कैंचे भिन्नाभिन्न ।।” असं म्हणून वर्णभेद, जातीभेद, लिंगभेद आणि धर्मभेदही नाकारतात. कोणी नीच नाही, कोणी उच्च नाही असं सांगून , “सकलांसी येथे आहे अधिकार” अशा शब्दात ब्राह्मणांचे विशेष अधिकार आणि शूद्रातीशूद्र आणि स्त्रीयांची अधिकारहीनताही नाकारतात. सर्व जगच विष्णुमय असल्याने चराचरात अभेद असल्याचं मांडून, “भेदाभेद भ्रम अमंगळ” असल्याचं सांगतात. तथागत बुद्धांप्रमाणेच तुकाराम महाराज कर्मकांडाला विरोधही करतात. विचाराच्या पातळीवर, आचाराच्या पातळीवर आणि तत्वज्ञानाच्या पातळीवरसुद्धा वारकरी विचार हा बुद्धविचाराशी नातं सांगणारा आहे, बुद्धविचार पुढे नेणारा आहे, बुद्धाचा वारसा पुढे चालवणारा आहे हे यावरुन दिसून येतं. या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात,
“बौध्यअवतार माझिया अदृष्टा । मौन्य मुखें निष्ठा धरियेली ।।’ माझ्या भाग्यात आलेल्या बौद्धावताराने मौनव्रत घेतलं आहे. तो काही बोलत नाही. विठ्ठल नामदेव महाराजांच्या हाताने जेवतो. चोखोबांच्या घरी जाऊन दहीभात खातो. नामदेवांच्या कीर्तनात नाचतो. जनाईबरोबर दळण दळतो, भांडी घासतो, धुणी धुतो. संत सावता महाराजांना शेतात निंदू-खुरपू लागतो. संत नरहरी महाराजांना दागिने घडवू लागतो. असं काही तुकाराम महाराजांच्या चरित्रात दिसत नाही. विठ्ठलाने उदकी वह्या राखल्याचा आणि जिजाईंच्या पायातला काटा काढल्याचा उल्लेख तेवढा आहे. बुद्धावतारात, बुद्ध सतत भ्रमण करत. नीती-अनिती, धर्म, समजून सांगत. लोकांना उपदेश करत. पण विठ्ठलाने मात्र मौन धारण केलं आहे. दोन्ही हात कटीवर ठेऊन तो उभा आहे. त्याचं मौन हे सामान्य लोकांसाठी आहे, मात्र तो संतांशी गुजगोष्टी करतो असं तुकाराम महाराज सांगतात. ते म्हणतात, “लोकांचियेसाठी शाम चतुर्भुज । संतांसवें गुज बोलतसां ।।” चतुर्भुज होणं म्हणजे बंधनात बांधलं जाणं. सामान्य लोकांसाठी विठ्ठल बंधनात बांधलेला आहे, पण संतांशी मात्र तो गुजगोष्टी करतो. तुकाराम महाराज जे सांगतात याला फार सखोल अर्थ आहे. एकेकाळी बौद्ध धर्म सर्व भारतभर पसरलेला होता. पण पुष्यमित्र शुंगाने बौद्ध सम्राट बृहद्रथ यांची विश्वासघाताने हत्या केली. बौद्ध भिक्कूंच्या कत्तली केल्या आणि वैदिक धर्म पुन्हा सर्व बहुजन समाजावर लादला. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे मराठा समाजातले अतिशय श्रेष्ठ विद्वान होते. त्यांनी अँमस्टरडँम येथे जाऊन सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यास केला होता. भारतात परतल्यावर त्यांनी बौद्ध धर्माचा अभ्यास केला होता. त्यातून त्यांनी जे निकष काढले त्यापैकी एक महत्त्वाचा निकष म्हणजे इथला बहुजन समाज आज स्वतःला काहीही म्हणवून घेत असला तरी तो मूळात बौद्ध आहे. कालौघात तो आपली मूळ ओळख विसरला आहे.
“लोकांचियेसाठी शाम चतुर्भुज । संतांसवें गुज बोलतसां ।।” या शब्दात तुकाराम महाराज हेच सांगत आहेत. सामान्य लोकांसाठी विठ्ठलाने मौन धारण केलं आहे. सामान्यांना विठ्ठलाचं बौद्धरुप माहिती नाही, उमगत नाही, पण संतांना मात्र ते माहिती आहे. सद्यस्थितीत बुद्धांचा संदेश सामान्यांपर्यंत पोचत नसला तरी संतांपर्यंत तो निश्चितच पोहोचतो आहे आणि त्यांच्या वाणीतून तोच प्रतिबिंबित होतो आहे. तथागत बुद्ध सतत भ्रमण करत पण पावसाचे चार महिने ते एका ठिकाणी मुक्काम करत. याला वर्षावास म्हणतात. या काळात विविध ठिकाणचे लोक तथागत बुद्धांना भेटायला तिथे येत असत. त्यांच्याशी चर्चा करत. आपल्या शंकांचं निरसन करत. बुद्धांचा उपदेश ग्रहण करत आणि पुन्हा आपापल्या गावी परतत. आज आषाढी-कार्तिकी वारी हे त्या वर्षावासाचेच अवशेष आहेत. पुढच्या चरणात तुकाराम महाराज म्हणतात, “आलें कलियुग माझिया संचिता । डोळां हाकलितां न पडेसी ।।” माझ्या संचितात, माझ्या नशिबी कलियुग आलं आहे. या कलियुगात तु मौनव्रत घेतलं आहे. पण तुझी प्रतिमा कितीही प्रयत्न केले तरी माझ्या डोळ्यासमोरुन हटत नाही. मला सतत तुझाच ध्यास लागला आहे. मला दुसरं काही सुचत नाही. इतर अवतारात तु भक्तांचं रक्षण केलं, दुष्टांचं निर्दालन केलं. भक्तांना धीर दिला. मग मीच असा काय गुन्हा केला आहे की तुला माझी थोडीही दया येत येत नाही? “म्यांच तुझें काय केलें नारायणा । कां नये करुणा तुका म्हणे ।।”
या शब्दात तुकाराम महाराज अप्रत्यक्षरीत्या त्यांच्या एकाकी लढ्याचाच उल्लेख करत आहेत असं लक्षात येत. तुकाराम महाराजांनी माणसाचं माणूसपण नाकारणाऱ्या, माणसामाणसात भेद करणाऱ्या, सर्व स्त्रीया आणि शूद्रातीशूद्र यांना त्यांचे निसर्गदत्त अधिकार नाकारणाऱ्या मनुवादी व्यवस्थेच्या विरोधात फार मोठा संघर्ष छेडला. शब्दांचि च शस्त्रे करुन तुकाराम महाराज या व्यवस्थेविरोधात लढले. समतेचा विचार रुजवण्यासाठी आणि विषमतेच्या विचाराचं निर्मूलन करण्यासाठी त्यांनी आपल्या वाणीचा आणि लेखणीचा उपयोग केला. त्यामुळे हितसंबंधी लोकांनी त्यांचा प्रचंड शारीरिक, मानसिक छळ केला. अमानुष छळ केला. पण त्यातून सोडवायला विठ्ठल आला नाही. दामाजीची सुटका करायला तो महार बनून आला होता. द्रोपदी वस्त्रहरण प्रसंगी तो धावून आला होता. मगरीने पाय धरलेल्या हत्तीच्या मदतीला तो धावून आला होता असं पोथ्यापुराणात लिहिलं आहे. असा तु जर भक्तांची सुटका करायला धावून जात असशील तर मग माझ्याच मदतीला तु का येत नाहीस? तुला माझ्याविषयी करुणा का वाटत नाही? तुला माझी दया का येत नाही? असा आर्त प्रश्न तुकाराम महाराज आपल्या विठ्ठल माऊलीला विचारतात.
आजही अभ्यासकांना वारकरी आणि बुद्ध यांच्यातलं नातं माहिती असलं तरी सामान्य वारकरी म्हणवणाऱ्यांना बुद्धांविषयी प्रेम वाटत नाही. आपुलकी वाटत नाही. आदर वाटत नाही. कारण दुष्ट, कारस्थानी सनातन्यांनी त्यांच्या मनात असं भरवलं आहे की बुद्ध आपला नाही, परका आहे, आपला बुद्धाशी काही संबंध नाही. स्वतःला वारकरी म्हणवणाऱ्या परंतु डोक्यात विषमतावादी, माणसामाणसात भेद करणाऱ्या वैदिक विचारांचीच पेरणी झालेली असल्यामुळे, त्यांच्या मनात जातीयवादी विचारांचं तण माजलेलं आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्विकारल्यामुळे तर या बिनडोक लोकांच्या मनात बौद्ध धर्म आणि तथागत बुद्ध यांच्याविषयी अधिकच दुरावा निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत या मूढ लोकांना आपल्या मूळ विचारांचं, धर्माचं भान आणून देण्यासाठी तुकाराम महाराजांचा हा अभंग अतिशय महत्त्वाचा आहे. आपली परंपरा स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेची शिकवण देणारी परंपरा आहे. लोकांना शारीरिक, मानसिक, बौद्धिक गुलाम बनवणारी, उच्चनीचता पाळणारी, भेद पाळणारी, द्वेष पसरवणारी परंपरा आपली नाही. याचं भान या सामान्य जनांना जेंव्हा येईल तेंव्हा संतविचार समाजात रुजण्याला अनुकूल मनोभूमी तयार होईल. यासाठी वैचारिक मशागत करावी लागेल. ती करण्यासाठी कटिबद्ध होऊ या!

जय जगद्गुरू !
जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या अशा सुंदर, विचारप्रवर्तक, नीतीपर, विज्ञानपर अभंगांच्या निरुपणावर आधारित सुंदर ग्रंथ, प्रत्येक घरात हवाच !
अभंगशतक १ : “शुद्ध ऐसे ब्रह्मज्ञान” (किंमत : ₹ ५००/-)
मिळण्यासाठी तसेच या सोबतच
“जगद्गुरू तुकाराम महाराज जीवनसंघर्ष” ( ₹ ६०/-)
“लोकराजा महाराजा सयाजीराव गायकवाड” ( ₹ ६०/-)
“पाइकाचे अभंग”( ₹ २००/)
हे सर्व ग्रंथ पोस्टेजसह घरपोच सवलतीत मिळण्यासाठी संपर्क करा. संपर्क क्र . ९४२०८०१९५६
gathaparivar.org

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp