प्रश्न ४८ भानामती म्हणजे काय?
उत्तर – अंगावर वा कपड्यांवर बिब्ब्यांच्या फुल्या उठणे, घरातील वस्तू जागेवरून आपोआप हालू लागणे, बंद कपाटातून वस्तू बाहेर येणे, कपडे आपोआप पेटणे, घरात विष्ठा पडणे, पैसे नाहीसे होणे, घरातले पदार्थ कडू, खारट होणे, डोळ्यांतून काचा, खडे, सुया निघणे, या सर्व गोष्टी भानामतीचे प्रताप म्हणून समजल्या जातात.
भानामतीमुळे कधीही चांगले प्रकार घडत नाहीत. भानामातीमुळे विहिरीला पाणी लागले, अपघातातून बचावलो, मुलीचे लग्न जुळले, लॉटरी लागली असे कधीही होत नाही.
मराठवाड्यातला आंध्रप्रदेशच्या जवळ असलेला भाग (नांदेड, परभणी जिल्हे), आंध्रमधील काही जिल्हे, कर्नाटकातील काही जिल्हे या ठिकाणी स्त्रियांच्या अंगात येऊन घुमण्याच्या प्रकाराला भानामती म्हणतात. मोठ्या संख्येने असे रुग्ण अनेक गावांत तेथे आढळून येतात. या प्रकाराची तपासणी करण्यासाठी कर्नाटक व आंध्र या दोन्ही राज्यांनी पाहणी समिती नेमून या बाबींचा तपशीलवार एक अहवाल केला आहे.
महाराष्ट्रातील या मानसिक भानामतीबद्दल महात्मा फुले समता प्रतिष्ठान व अंधश्रद्धा निर्मूलन समिति यांनी नांदेड, परभणी भागात मानसोपचार शिबिरे घेऊन मदत व मार्गदर्शन केले आहे. आंध्र व कर्नाटक राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही याबाबत भानमती कमिशन नेमावे, अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली आहे. (प्रश्नोत्तराच्या या प्रकरणात मात्र भानामती म्हणजे पहिल्या प्रकारच्या घटना या अर्थानेच उत्तरे दिली आहेत. भानामती म्हणजे अंगात येणे या भानामतीच्या बाबतीतले स्पष्टीकरण भुताने झपाटणे, अंगात येणे या प्रकरणात दिले आहे.)
-डॉ. नरेंद्र दाभोलकर व
प्रा. प. रा. आर्डे
यांनी लिहिलेल्या ‘अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम’ या पुस्तकातून साभार
टायपिंग सहकार्य- श्रीप्रसाद खुळे