संविधान आणि लोकशाहीमुळे मिळालेले हक्क आणि अधिकारांमुळे या देशातील नागरिक ज्यांना जाती व्यवस्थेच्या गुलामी मध्ये असताना जगण्याचा सुद्धा अधिकार नव्हता ते आज या लोकशाहीमध्ये सुखी आनंदी जीवन जगत असताना आपला देश संविधान आणि लोकशाही प्रति असणारे आपले कर्तव्य आणि त्यांची जाणीव विसरत चाललेले आहेत.
या देशावर दीडशे वर्ष ब्रिटिशांनी आणि त्या अगोदर हजारो वर्ष परकीय आक्रमकांनी राज्य केले अंतर्गत धर्मांध शक्तींनी वर्ण आणि जातींच्या गुलामी मध्ये गुरफटून ठेवले. स्वातंत्र्यापूर्वी शिक्षण आणि नोकरीचे सोडा चांगलं जगण्याच्या अधिकारापासून सुद्धा वंचित असणाऱ्या अगणित जातीसमूहांची आज प्रगती होताना दिसत आहे. ती या देशांमध्ये लोकशाही व्यवस्था आहे म्हणुन, लोकशाही नसेल तर पुन्हा हा देश एकाधीकारशाहीतून हुकूमशाही कडे जाऊ शकतो.
हे असे होऊ नये म्हणून या देशातील प्रत्येक देश प्रेमी नागरिकांनी आपले संविधान आणि लोकशाही व्यवस्था समजून घेतली पाहिजे आणि तिच्याप्रती असणारी आपली कर्तव्य काय आहेत त्यांचे पालन केले पाहिजे.
संविधान निर्मात्यांनी समता स्वातंत्र्य आणि बंधुता न्यायावर आधारित राष्ट्र निर्माण करण्याचा संकल्प संविधानाच्या प्रस्तावनेमध्येच दिला आहे. संविधानामध्ये अधिकारांसोबत कर्तव्य सुद्धा सांगितले आहेत. परंतु याकडे भारतातील नागरिकांनी जागृत वर्ग आणि दुर्लक्ष केल्यामुळे आज या देशाची वाटचाल लोकशाहीतुन हुकूमशाहीकडे चालले आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेतील शेवटच्या भाषणामध्ये म्हणतात *"इतर देशांच्या तुलनेत भारताला सावधगिरीचा इशारा लक्षात घेणे अधिक गरजेचे आहे, कारण भक्ती किंवा ज्याला भक्तीचा मार्ग म्हणता येईल तो किंवा विभूतीपूजा ही जगातील इतर कोणत्याही राजकारणात दिसणार नाही, इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय राजकारणात दिसते. धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल. परंतु राजकारणात भक्ती किंवा व्यक्तिपूजा ही अध:पतन आणि अंतिमत: हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो."*
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर (संविधान सभेतील शेवटचे भाषण २५ नोव्हेंबर १९४९)
आज पक्ष आणि नेत्यांच्या भक्तीत देश हुकूमशाही कडे चालला आहे असे म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही.
बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये दिलेले शेवटचे भाषण अतिशय महत्त्वपूर्णच आहे त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात “ज्या संविधानात आपण लोकांचे, लोकांकरिता निवडलेले शासन या तत्त्वाचे जतन केले आहे ते तर आपल्याला सुरक्षित ठेवायचे असेल, तर आपल्या मार्गात कोणते अडथळे येणार आहेत ते आपण ओळखले पाहिजेत, की जेणेकरुन लोकांनी निवडून दिलेल्या सरकारच्या तुलनेत लोकांसाठी असलेल्या सरकारला लोक प्राधान्य देण्याकडे वळतील. यासाठी पुढाकार घेण्यात आपण दुर्बल ठरता कामा नये. देशाची सेवा करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. दुसरा अधिक चांगला मार्ग मला माहीत नाही.”
(बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील शेवटचे भाषण)
(स्रोत: डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे, खंड १८, भाग ३- १९४६ ते १९५६)
सध्या या देशांमध्ये लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत या देशाची विविध विचार प्रवाहांचे पक्ष सध्या सक्रिय राजकारणात आहे ते त्यांच्या पद्धतीने काम करत आणि त्यांच्या कार्यप्रणालीतून लोकशाहीचा गाभाच विसरला गेला आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
बाबासाहेबांनी या देशाची लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी संविधान सभेतील शेवटच्या भाषणामध्ये जे विचार मांडले होते ते या देशातील प्रत्येक नागरिकांनी समजून घेतले पाहिजेत.
बाबासाहेब आंबेडकर म्हणतात “जर पक्षांनी आपले पक्ष मत राष्ट्र हितापेक्षा श्रेष्ठ मानले तर भारताचे स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात येईल आणि कदाचित कायमची नष्ट होईल. म्हणून शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत स्वातंत्र्यासाठी लढण्याचा निर्धार केला पाहिजे.”
आज देशात बाबासाहेबांनी वक्तव्य केले होते त्यापेक्षा वेगळे काय सुरू आहे? सर्वच पक्षांना राष्ट्रहितापेक्षा पक्षच महत्वाचे वाटत आहेत मग संविधान संपले काय आणि लोकशाही बुडाली काय पक्ष कसा वाढेल आणि आपला नेता कसा मोठा होईल हेच महत्वाचे.
अशा या परिस्थितीमध्ये या देशातील प्रत्येक जागृत देश प्रेमी बांधवांनी लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
- राहुल कांबळे, कोल्हापूर