पाषाण युगात मानवी टोळ्या सुपीक प्रदेशाच्या लालसेने एकमेकांवर आक्रमणे करीत असत. कृषीचा शोध लागल्यावर संगठीत अर्थव्यवस्था उदयास आली. त्यामुळे सामाजिक सुव्यवस्था कायम राखण्यासाठी राजकीय संघटनेची गरज होती. त्यातून राजेशाही व्यवस्था उदयास आली. पुढे राजकीय आणि सामाजिक वर्चस्वासाठी एकमेकांच्या भूप्रदेशावर आक्रमण करण्याची प्रथा सुरु झाली.

वाल्मिकी रामायणाच्या बालकांडातील सर्ग 54 च्या श्लोक 18, 21 आणि 23 मध्ये काही विदेशी आक्रमकांची नावे आढळतात. त्यात प्रामुख्याने पह्लव, शक, यवन आणि कंबोज यांचा समावेश आहे. या विदेशी आक्रमकांनी इ.स.पू. दुसऱ्या शतकापासून भारतावर आक्रमणे सुरू केली. यावरुन एक महत्त्वपूर्ण बाब स्पष्ट होते की रामायण या महाकाव्याची रचना वर उल्लेखित राजांच्या आक्रमणानंतर झाली आहे. भारताच्या ज्ञात इतिहासानुसार पहिले आक्रमण हे आर्यांचे आहे. हे आक्रमण साधारण इ.स.पू. 1800 ते 1500 या कालखंडात झाले. त्यानंतर कोणत्याही आक्रमणाचा उल्लेख इ.स.पू. चौथ्या शतकापर्यंत दिसत नाही. इ.स.पू. 326 मध्ये अलेक्झांडरने भारतावर आक्रमण केले. त्यानंतर मौर्यांची राजवट सुरु होते. मौर्यांची विशेषतः सम्राट अशोकाचे साम्राज्य एवढे बलाढ्य होते की कोणत्याही विदेशी शक्तीने या राजवटीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत केली नाही. पुष्यमित्र शूंग याने कपटाने मौर्य राजवटीचा पाडाव घडविला. परिणामस्वरुप सम्राट अशोकाच्या सर्वसमावेशक धोरणामुळे निर्माण झालेला सामाजिक एकोपा विस्कळीत झाला. याचा फायदा घेत विदेशी आक्रमणे परत सुरु झाली. या विदेशी आक्रमकांचा उल्लेख मनुस्मृतीच्या 10 व्या अध्यायातील 44 व्या श्लोकात आढळतो –
पौण्ड्रकाश्चौडद्रविडाः काम्बोजा यवनाः शकाः ।
पारदाः पह्लवाश्चीनाः किराता दरदाः खशाः ।।
या श्लोकातील कंबोज, यवन, शक, आणि पह्लव हे विदेशी आक्रमक राजे आहेत.मनुस्मृतीने भारतीय समाजाला अनेक जातीपातींमध्ये विभाजित केल्यामुळे परस्पर सलोखा आणि सद्भाव संपुष्टात येऊन भारताची अखंडता धोक्यात आली. सम्राट अशोकाने अतिशय प्रयत्नपूर्वक निर्माण केलेली प्रभावी प्रशासनिक व्यवस्था आणि सामाजिक संरचना मौर्य राजवटीच्या अस्तानंतर आलेल्या ब्राह्मण राजांना टिकविता आली नाही. मनुस्मृतीच्या विभाजनकारी विचारामुळे भारताच्या तत्कालीन सामरिक सैन्य शक्तिवर विपरीत परिणाम होऊन भारताची सैन्य सज्जता जी मौर्य राजवटीने जोपासली होती, धोक्यात आली. या दुबळ्या ब्राह्मण राजांच्या दिशाहीन, नकारात्मक आणि केवळ ब्राह्मण वर्गाला पाठिंबा देणा-या व्यवस्थेचा फायदा घेत परकीयांनी भारतावर आक्रमण केले. बॅक्ट्रियाचा यवन राजा *डिमेट्रियस* याने उत्तर पश्चिम प्रदेशावर आक्रमण केले. या यवन राजांची माहिती त्यांच्या नाण्यांवरुन मिळते. या यवन राजांमध्ये *मिलींद* या राजाचाही समावेश आहे. एक अन्य राजा *अपोलोडोटस* याचाही उल्लेख येतो, ज्याने काठियावाड(गुजरात) भाग काबिज केला. केवळ यवन राजांनीच भारताला धडक दिली असे नाही तर अन्य काही राजे ज्यात *पार्थियन*, *शक* आणि *कुषाण* यांचाही समावेश आहे. यापैकी भारतात शकांची तीन राज्ये ठळक होती. यातील दोन उत्तर भारतात ज्यांची राजधानी अनुक्रमे *मथुरा* आणि *तक्षशिला* येथे होती. तिसरे राज्य पश्चिम भारतातील *मालवा* आणि *काठियावाड* प्रदेशात होते. विदेशी आक्रमकांमध्ये *कुषाण* हे महत्त्वाचे राजे होते. यातील राजा *द्वितीय कडफिसस* याने भारताच्या उत्तर- पश्चिम भूप्रदेशावर प्रभुत्व स्थापन केले. एवढेच नव्हेतर त्याने वाराणसी पर्यंतचा प्रदेश काबिज केला. कुषाण राजांमध्ये सर्वात प्रभावशाली प्रसिद्ध असा कुषाण सम्राट *कनिष्क* होय, जो *बौद्ध धम्माचा* संरक्षक होता. मनुस्मृतीच्या काळात ही आक्रमणे झाली. या आक्रमणांची झळ प्रारंभीच्या काळात मुख्यत्वे ब्राह्मणांना बसली आणि म्हणूनच हीन भावनेने त्यांचा उल्लेख *शूद्र* असा करण्यात आला. मनुस्मृतीतील तो श्लोक असा -

पौण्ड्रकाश्चौडद्रविडा काम्बोजा यवनाः शकाः।
पारदा पह्लवाश्चीनाः किराता दरदाः खशाः।।10-44।।
अर्थ – पौण्ड्रक, औड, द्रविड, कंबोज, यवन, शक, पारद, पहलव, चीन, किरात, दरद आणि खश (उपनयन इत्यादी कर्माच्या अभावी शूद्रत्वाला प्राप्त झाले)
हा श्लोक ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्वपूर्ण आहे. यातील कंबोज आणि यवन या देशांचा उल्लेख अशोकाच्या अनुक्रमे मानसेहरा (पाकिस्तान) आणि गिरनार (गुजरात) शिलालेखात आढळतो. या देशांशी सम्राट अशोकाचे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध होते. मात्र मनुस्मृतीची रचना करून ब्राह्मणांनी आपापसातील बंधुभाव जो सम्राट अशोकाने निर्माण केला होता, नष्ट करुन सामाजिक एकता धोक्यात आणली. या सामाजिक असंतोषाचा फायदा विदेशी आक्रमकांनी उठविला हेच या श्लोकावरुन स्पष्ट होते. थोडक्यात मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर जी विदेशी आक्रमणे भारतावर झाली त्याला प्रामुख्याने येथील ब्राह्मणवादी व्यवस्था जबाबदार आहे, असे म्हटल्यास अतिशयोक्तीपूर्ण ठरणार नाही.
मनुस्मृतीची ही ब्राह्मणवादी परंपरा त्यानंतरच्या काळात निर्मित महाकाव्यांनी कायम ठेवल्याचे दिसते. वाल्मिकी रामायणाच्या बालकांडातील 54 आणि 55 व्या सर्गातील शक, यवन, पह्लव, कंबोज इत्यादींचे जे उल्लेख आहेत ते ब्राह्मण – क्षत्रिय वर्चस्व संघर्षाचे प्रतिक आहेत. कारण विश्वामित्राने वसिष्ठ ऋषीकडील कामधेनू ची मागणी केली. जेव्हा वसिष्ठाने नकार दिला तेव्हा विश्वामित्राने जबरदस्तीने त्या गाईचा ताबा घेतला. याचा उल्लेख रामायणाच्या बालकांडातील 54 व्या सर्गाच्या पहिल्याच श्लोकात आढळतो –
कामधेनुं वसिष्ठोऽपि यदा न त्यजते मुनिः।
तदास्य शबलां राम विश्वामित्रोऽन्वकर्षत ।।
अर्थ – श्रीराम ! जेव्हा वशिष्ठ ऋषीने कामधेनू गाय देण्यास नकार दिला, तेव्हा विश्वामित्राने त्या गाईला बळजबरीने ताब्यात घेतले.
यासाठी वसिष्ठाने पह्लव, शक, यवन कंबोज आदी वीरांची सृष्टी निर्माण करुन विश्वामित्राच्या सैन्याचा पराभव केला, असा उल्लेख 54 व्या सर्गाच्या श्लोक क्रमांक 18, 21 आणि 23 मध्ये आहे. या युद्धात विश्वामित्राचे 100 पुत्र आणि सर्व सेना नष्ट झाल्याचा उल्लेख 55 व्या सर्गाच्या श्लोक क्रमांक 4 व 5 मध्ये आढळतो.
त्यामुळे विश्वामित्र तपश्चर्या करतो आणि महादेवाला प्रसन्न करून दिव्यास्त्र प्राप्त करुन वसिष्ठाविरुद्ध वापर करतो आणि त्याला पराभूत करतो, असा उल्लेख बालकांडातील 55 व्या सर्गातील श्लोक क्रमांक 12 ते 24 मध्ये आलेला आहे. यातून दुसरा अर्थ असाही निघतो की ब्राह्मण – क्षत्रिय संघर्षात ब्राह्मणांनी क्षत्रियांवर सूड उगवण्यासाठी वर उल्लेख केलेल्या विदेशी आक्रमकांना पाचारण केले असावे. स्वतःचे वर्चस्व कायम राखण्यासाठी त्यांनी हे राष्ट्रद्रोही कृत्य केले असे वाटते.
हा ब्राह्मण – क्षत्रिय संघर्षाचा भाग असावा. कारण ब्राह्मण- क्षत्रिय राजकीय आणि धार्मिक संघर्ष अगदी ऋग्वेद काळापासून सुरु झाला आहे. ऋग्वेदाच्या तिसऱ्या मंडळातील 53 वे सुक्त विश्वामित्र व वशिष्ठ यांच्या परस्पर संबंधांवर प्रकाश टाकणारे आहे. या सुक्ताच्या ऋचा क्रमांक 21ते 24 मध्ये याची माहिती आढळते. ऋग्वेदातील वशिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यातील संघर्ष विशिष्ट वर्गाला ठराविक व्यवसायापासून रोखण्याच्या ब्राह्मणवादी मनोवृत्तीचे द्योतक आहे ब्राह्मणांचा आग्रह होता की पुरोहिताचे कार्य केवळ ब्राह्मणांसाठीच आरक्षित असावे तर क्षत्रियांना पुरोहिताचे कार्य करण्याचा अधिकार का नाही ? असा क्षत्रियांचा प्रश्न होता. वसिष्ठ हा ब्राह्मण पुरोहित होता. आणि विश्वामित्र क्षत्रिय पुरोहित. त्या काळात ज्ञान आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर एका वर्णातून दुस-या वर्णात प्रवेश करणे शक्य होते. याचा उल्लेख बाबासाहेब डाॅ.आंबेडकरांनी Revolution and Counter Revolution in Ancient India या ग्रंथातही केला आहे. अगाढ तपश्चर्या आणि विद्वत्तेच्या जोरावर ब्राह्मण पुरोहित होण्याची विश्वामित्राची महत्वाकांक्षा होती. मात्र वसिष्ठाने याला तीव्र विरोध केला. कारण वसिष्ठाशी स्पर्धा करणारा दुसरा पुरोहित नव्हता. या दोघात एकमेकाला कमी दाखविण्याची जणू स्पर्धा सुरु होती. रामायणातील वरील सर्गातील जो उल्लेख आहे तो याचाच भाग आहे. या संघर्षांचा उल्लेख महाभारताच्या आदिपर्वातील अध्याय 175 व 176 मध्ये कल्माषपाद या इक्ष्वाकु वंशाच्या राजाच्या कथेतही आढळतो. विश्वामित्र आणि वसिष्ठ यांचा संघर्ष एवढा पराकोटीला पोहचला होता की विश्वामित्र वसिष्ठाला ठार करण्याच्या प्रयत्नात होता. याबाबतची माहिती महाभारताच्या शल्यपर्वाच्या 42 व्या अध्यायात आढळते.
यावरुन एक बाब स्पष्ट होते मनुस्मृतीने ज्या विभाजनकारी व्यवस्थेला प्रोत्साहन दिले, पुढील काळात रामायण आणि महाभारताने ती कायम ठेवली. पुढे या व्यवस्थेने एवढे भीषण रूप धारण केले की भारताला अनेक विदेशी आक्रमणांचा सामना करावा लागला.

भि.म.कौसल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp