महात्मा फुले कृषी विद्यापीठ द्वारा प्रसारित होऊन केंद्रीय समितीद्वारा नुकतीच नोटिफाय झालेली उन्हाळी हंगामासाठी असलेल्या फुले पूर्णा नावाच्या तीळ जातीचं बियाणं अकराशे एकर क्षेत्रावरती या वर्षाच्या उन्हाळी हंगामात शेतकऱ्यांच्या शेतावर पेरली जाणार आहे…..उन्हाळ्यात तीळ पिकाची लागवड करण्यासाठी समाज माध्यमांवरती दिलेल्या लेखास शेतकऱ्यांकडून उस्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्र राज्यातील कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांनी तीळ फुले पूर्ण जातीचे बियाणे व्यक्तिशः संपर्क करून लागवडीसाठी घेऊन गेलेले आहेत. तेलबिया संशोधन केंद्र जळगाव येथून 250 किलो सत्यप्रत बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले होते. शेतकऱ्यांनी संशोधन केंद्रावरून बियाणे घेऊन गेलेत संशोधन केंद्रावरील बियाणे संपल्याने, तेलबिया संशोधन केंद्रा च्या संपर्कात असलेले प्रगतशील शेतकरी जे आहेत ज्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने बीज उत्पन्नाचा प्लॉट घेतलेला होता अशा शेतकऱ्यांकडून जवळजवळ दहा क्विंटल बियाणे शेतकऱ्यानी व्यक्तिशः संपर्क साधून घेऊन गेलेले आहेत. यावरून असं लक्षात येतं की शेतकऱ्यांना नवीन पीक पद्धती पाहिजे होती आणि ती त्यांना उपलब्ध झाली आहे काही शेतकरी केळी पिकात आंतरपीक म्हणून तीळ पिकाची लागवड करीत आहेत, तर काही शेतकरी कापून गेलेल्या केळी पिकात खोडव्यामध्ये तीळ पिकाची लागवड करीत आहे, काही शेतकरी सलग तीळ पिकाची ठिबक वरती लागवड करीत आहे. काही शेतकऱ्यांची लागवड झालेली आहेत आणि काही शेतकरी लागवड या आठवड्यात पूर्ण करतील.एकंदरीत शेतकऱ्यांचा कल पाहता तीळ पीक आता खरिप हंगामा चे पीक राहिलेलं नसून उन्हाळी हंगामाचे प्रमुख पीक होत आहे. संशोधन केंद्रावर व्यक्तिशः भेट देऊन बियाणे घेऊन जाणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्यांना आम्ही आवर्जून या पिकाबद्दल च्या लागवडीविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे. त्यातील ठळक मुद्दे म्हणजे लागवड करताना बीज प्रक्रिया करण अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे बियाणापासून व जमिनीमधून उद्भवणारे बुरशीजन्य रोग होऊ नये म्हणून तीन ग्रॅम थायरम किंवा अडीच ग्रॅम Carbandenzim किंवा चार ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर प्रति किलो बियाणास चोळावे त्यानंतर पेरणीपूर्वी पीएसबी culture 25 ग्रॅम प्रति किलो बियाणास बीज प्रक्रिया करावी. पेरणी शक्यतो 15 फेब्रुवारी च्या आत पूर्ण करावी आणि बैलपांम्बरीने 30 x 15 सेंटीमीटर किंवा 45 x 10 सेंटीमीटर अंतरावर पेरणी करावी. पेरणी करताना बियाणे अडीच ते तीन सेंटीमीटर पेक्षा जास्त खोलीवर पडणार नाही याची काळजी घ्यावी. बियाणे जास्त खोलवर पडल्यास उगवणीवर विपरीत परिणाम होतो. बियाणे तिफनने पेरताना शक्यतो एक किलो मध्ये एक किलो दाणेदार खत किंवा शेणखत किंवा गांडूळ खत किंवा एक किलो भाजलेल्या बाजरीत पेरणी केल्यास आपल्याला विशिष्ट पाहिजे असलेल्या अंतरावर पेरणी करता येते. पेरणीनंतर आठ ते दहा दिवसांनी पहिली विरळणी आणि 15 ते 20 दिवसांनी दुसरी विरळणी करावी. पिकाच्या योग्य वाढीसाठी व अधिक उत्पादन मिळवण्यासाठी हेक्टरी रोपांची संख्या 2.20 लाख प्रति हेक्टर इतकी ठेवावी त्यासाठी पेरणी 45 सेंटिमीटर अंतरावर केलेली असेल तर दोन रोपातील अंतर 10 सेंटीमीटर ठेवावे. पेरणी तीस सेंटीमीटर अंतरावर केलेली असेल तर दोन रोपातील अंतर 15 सेंटीमीटर ठेवावे. खत व्यवस्थापन करताना तीळ पिकास चांगले कुजलेले शेणखत पाच टन प्रती हेक्टर किंवा एरंडी पेंड एक टन प्रति हेक्टर कुळवणी अगोदर जमिनीत चांगले मिसळून द्यावे. रसायनिक खते द्यावयाची असल्यास तीळ पिकास नत्र 60 किलो प्रति हेक्टर स्फुरद 40 किलो प्रती हेक्टर आणि पोटॅश 20 किलो प्रति हेक्टर ह्याप्रमाणे पेरणी करताना द्यावे. नत्राची अर्धी मात्रा म्हणजेच 30 किलो देण्यासाठी 63 किलो युरिया पेरणी करताना द्यावा तर उर्वरित मात्रा पेरणीनंतर 21 दिवसांनी द्यावी. नत्राची दुसरी मात्रा दिल्यानंतर पीकास पाणी द्यावे. अधिक उत्पादननासाठी पीक फुलोऱ्यात आणि बोंडे वाढीच्या अवस्थेत असताना दोन टक्के युरियाची फवारणी केल्यास फायदा होतो. हेक्टरी दहा किलो सल्फर जमिनीमधून दिल्यास या पिकास त्याचा अधिक फायदा होत असल्याचं निर्देशनास आलेले आहे. तीळ पीक सुरुवातीच्या काळामध्ये फार हळू वाढते, रोप अवस्थेमध्ये हे पीक अत्यंत नाजूक असून पिकाबरोबर वाढणाऱ्या तना बरोबर पाणी अन्नद्रव्यांसाठी स्पर्धा करू शकत नाही. साधारणपणे सुरुवातीचा 35 ते 40 दिवसाचा कालावधी हा स्पर्धाक्षम असल्याने सुरुवातीच्या काळात तन नियंत्रण होणे आवश्यक आहे. त्यासाठी पेरणीनंतर 15 ते 20 दिवसांनी पहिली कोळपणी व निंदणी, तर 30 ते 35 दिवसांनी दुसरी कोळपणी व गरजेनुसार निंदनी करून पीक तन विरहित ठेवावे. तीळ पिकाची मुळे ही तंतू मुळे असल्याने जमिनीच्या वरच्या थरात वाढत असल्याने खोल अंतर मशागत केल्यास मुळाना इजा पोहोचते. पीक लहान असताना अंतर मशागत करावी. पाणी व्यवस्थापन करताना अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. कारण तीळ पाण्यासाठी फारच संवेदनशीआहे. तिळाचे पीक हे पाण्याचा ताण सहन करणारे असले तरी उन्हाळी हंगामात पिकास पाण्याचा ताण पडू देऊ नये, पीक उगवण्यासाठी जमिनीत पुरेसी ओल असणे आवश्यक आहे. जमिनीच्या मगदूराप्रमाणे बारा ते पंधरा दिवसाच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पिकास फुले येण्याच्या तसेच बोंडे धरण्याच्या वेळेस पाण्याचा ताण पडू देऊ नये. तीळ पिकास उन्हाळी हंगामामध्ये पाच ते सहा पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पिक संरक्षणाच्या बाबतीत तीळ पिकावर प्रामुख्याने पाने गुंडाळणारी अळी, पाने खाणारी अळी व गादमाशी तसेच रस शोषण किडी, तुडतुडे कोळी व पांढरी माशी याचा प्रादुर्भाव दिसून येतो. ह्या किडींच्या बंदोबस्तासाठी 5% निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा Quinolphos कीटकनाशक दोन मिलि प्रति लिटर पाणी याप्रमाणे पंधरा दिवसाच्या अंतराने दोन वेळा फवारणी घ्यावी. तीळीवर प्रामुख्याने पर्णगुच्छ, मर, खोड व मुळकुज, भुरी हे रोगप्रमुखांनी आढळून येतात रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी बियाणास बीज प्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे आहे. रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास मॅन्कोझेब 1250 ग्रॅम किंवा कॉपर ऑफ क्लोराईड 1500 ग्रॅम प्रति पाचशे लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. रोगग्रस्त झाडे अथवा भाग गोळा करून नष्ट करावा. पीक साधारणता 80 ते 85 दिवसाच्या पुढे बोंडे आणि पाने पिवळसर दिसू लागल्यावर पिकाची कापणी करावी, कापणी झाल्यावर पेंढ्या बांधाव्यात, बांधलेल्या पेंड्या शक्यतो शेतात ताडपत्रीवर किंवा खळ्यावर पाच ते सहा पेंड्यांची खोपडी करून उन्हात चांगल वाळू द्यावेत त्यानंतर पेंड्या ताडपत्री वर उलट्या करून बियाण्याची झटकनी करावी नंतर बियाणे स्वच्छ करावेत व चांगले वाळवून साठवावे. सुधारित तंत्रज्ञान वापरून तिळाची लागवड केल्यास 10 क्विंटल प्रति हेक्‍टरी उत्पादन मिळू शकते.

ByAgro India

Feb 3, 2025

बरेच शेतकरी फेब्रुवारी महिन्यात केळी लागवडीकडे वळतात किंवा करीत असल्याचं निर्देशनस येत आहे. त्याला कारण असे की गेल्या पाच, सात वर्षांपासून फेब्रुवारीत लागवड केलेल्या केळीला बाजारपेठेत चांगला भाव मिळत असून शेतकऱ्याला त्याचा खूप मोठा फायदा होत आहे. परंतु एक Cucumber mosaic virus नावाचा विषाणूजन्य रोग हा नेमका उन्हाळी लागवडीमध्ये जास्त प्रमाणावर होतो. हा रोग होण्यास कारणीभूत असलेले विषाणू हे जवळ जवळ दोन हजार प्रकारच्या Host plants वर उपजत असतात आणि त्यांना पोषक हवामान ज्यावेळेस मिळते त्यावेळेस झपाट्याने त्याची वाढ होते आणि नेमक्या ह्या उन्हाळ्यात लागवडीमध्ये तापमान वाढीचा वाईट परिणाम केळी पिकावर होत आलेला आहे. परंतु काही शेतकरी बांधव असे आहेत की ह्या तापमान वाढीचा जो परिणाम आहे त्याला केळी पिकावर कोणताही परिणाम होणार नाही यासाठी केळीच्या दोन ओळींमध्ये आंतरपीक म्हणून तीळ पिकाची निवड करीत आहेत. तीळ पिकास पकवतेस 90 दिवस जास्तीत जास्त लागतात आणि ह्या 90 दिवसांमध्ये तीळ पिकाची वाढ साधारणता एकशे वीस सेंटीमीटर पर्यंत होत असते आणि तीळ पिकाचे पान ही भाल्याच्या आकाराची किंवा भेंडीच्या आकाराची असल्याकारणाने त्या पिकाची सावली छान प्रकारे जमिनीवर पडत असते आणि नेमका या सावलीचा फायदा त्यामध्ये लागवड केलेल्या केळी पिकास उन्हाळ्या हंगामामध्ये होतो आणि केळीच्या पिकाच संरक्षण या सावलीमुळे होतं आणि त्या ठिकाणच सूक्ष्म तापमान तयार होऊन उष्ण तापमान पासून केळीचं संरक्षण होण्यास मदत होते. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे तीळ पिकाच्या मुळाजवळ एक विशिष्ट प्रकारचं विषारी वायू तयार होतो आणि ह्या वायूमुळे केळीच्या मुळावरील वाढलेले पिकासाठी घातक असलेले सूत्र कृमी नैसर्गिकरित्या मरतात आणि पर्यायाने सी एम व्ही सारख्या रोगास प्रतिबंध तयार होतो.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तीळ पिकाला कोणतेही जंगली जनावर खात नाही आणि त्यामुळे संपूर्ण क्षेत्राची राखण जंगली जनावरांपासून तीळ पीक करीत असत हा एक लक्षात घेण्यासारखा विषय आहे. तीळ पीक एक प्रकारचं संरक्षण कवच मुख्य पिकासाठी करीत असत असं म्हणायला हरकत नाही. पिकास लागवडीपासून ते काढणीपर्यंत 90 दिवस लागतात आणि नेमकं ह्या 90 दिवसात उन्हाळ्यामध्ये तापमान वाढलेल असत आणि त्या तापमान वाढीचा वाईट परिणाम केळीच्या पिकावर होत असतो. केंद्र शासन या वर्षापासून तेलबिया पिकांसाठी विशेष मोहीम राबवित असून शासनाच्या दरामध्ये शासकीय पातळीवरती तेल बिया पिकांची खरेदी केंद्र उघडून MSP च्या भावामध्ये शेतकऱ्यांच उत्पादित माल घेण्यासाठी त्यांनी विविध योजना आणलेले आहेत कारण तेलबिया पिकामध्ये भारत हा मागे पडत चाललेला असून बाहेरच्या देशातून त्यांना तेलबिया पिके आयात करावी लागत आहेत. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर परकीय चलन मोजावे लागत आहे. देशाला तेलबिया पिकांमध्ये स्वयंपूर्ण करण्यासाठी शेतकरी राजालाच पुढे यावं लागणार आहे आणि अशी विविध प्रयोग घेऊन आपल्या देशाला समृद्ध करता येईल.
.. . . . .. प्राध्यापक डॉ.सुमेरसिंग राजपूत, तीळ पैदासकार, तेलबिया संशोधन केंद्र जळगाव.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp