जीवनगौरव, समाजभूषण, अक्कमहादेवी व समाजभुषण उद्योजक पुरस्काराचे ही वितरण.
लातूर / विशेष प्रतिनिधी (एम.बि.टाळीकोटे) : लिंगायत महासंघ महाराष्ट्र राज्याच्यावतीने लिंगायत महासंघाचे प्रांताध्यक्ष प्रा सुदर्शनराव बिरादार सर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यातील वीरशैव लिंगायत समाजाचा राज्यव्यापी बसव महामेळावा रविवार दि 1 मे 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे.
लिंगायत महासंघाच्या वतीने आतापर्यंत सलग नऊ वेळा राज्यव्यापी बसव महामेळावे लातूर येथे संपन्न झाले आहेत. आता हा दहावा बसव महामेळावा महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यातील समाजबांधवांच्या उपस्थितीत होणार असून त्याची जोरदार तयारी लिंगायत महासंघाच्या वतीने करण्यात येत आहे. हा लिंगायत समाजाचा राज्यव्यापी बसव महामेळावा ऐतिहासिक होणार आहे. या महामेळाव्यासाठी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. व समाजाच्या विविध प्रश्नावर चर्चा करणार असून समाजाची पुढील काळासाठी रणनीती आखली जाणार आहे.
यावेळी लिंगायत समाजातील मान्यवरांना जीवनगौरव पुरस्कार, समाजभुषण पुरस्कार, अक्कमहादेवी पुरस्कार, व लिंगायत समाजभुषण उद्योजक पुरस्कार देण्यात येणार आहेत. प्रा सुदर्शनराव बिरादार सर लिखित समग्र महात्मा बसवेश्वर या ऐतिहासिक महा ग्रंथाचे प्रकाशनही यावेळी करण्यात येणार आहे. तसेच सरसकट लिंगायतांना ओबीसी चे आरक्षण लागू करावे, महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करा. लिंगायत समाजातील बेरोजगार तरुणांना दहा लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज द्या. मंगळवेढा येथील होणाऱ्या महात्मा बसवेश्वर स्मारकाचे काम लवकर सुरू करा आदी मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री महोदयांना देण्यात येणार आहे.
हा महामेळावा यशस्वी करण्यासाठी लातूर जिल्ह्यातील लिंगायत महासंघ ही संघटना व सर्व पदाधिकारी जोरदार तयारी करणार आहेत. अशी माहिती लिंगायत महासंघाचे जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील यांनी दिली.