
श्रीयुत जिल्हा न्यायाधीश मा. श्री सुनील वेदपाठक साहेब यांनी “घटा घटांचे रूप आगळे…!” या कथासंग्रहात विषयाची विविधता साधली आहे. वेगवेगळे विषय वेगवेगळ्या आशयातून समर्पकपणे जीवनानुभव मांडताना दिसतात. त्यांच्या या नुसत्या कथा नसून जिवंत जाणिवेच्या आणि जीवनानुभवातील संघर्षाच्या कथा आहेत. या नऊ कथांच्या माध्यमातून त्यांनी वाचकाला सुखाबरोबर आनंदा बरोबर जगण्याचे मूल्यही दाखवून दिले आहे. लेखकांनी आपल्या अवतीभोवतीच्या सौंदर्याला आपल्या आलेल्या अनुभवातील जीवन मूल्यांना सहवासातील जीवन प्रसंगातील आयुष्याच्या सुखदुःखातील आपल्या बालपणातील आपल्या जगण्यातील अशा वेगवेगळ्या प्रेरणादायी जीवन मूल्याच्या सौंदर्याला कथाबिजेच्या माध्यमातून कौशल्याने साकार केले आहे. आपल्या जीवनातील अनुभवास आलेल्या प्रत्येक प्रसंगाकडे चिरंतन मूल्यात्मक सौंदर्यदृष्टीतून पाहताना त्यांच्या माणुसकीवान अंतःकरणाचा वाचकांना सदैव परिचय होतो. प्रत्येक कथेच्या आशियातून सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ जीवनाचे मूल्यात्मक सौंदर्य अतिशय देखणेपणे मांडले आहे.
“घटाघटाचे रूप आगळे..!” हा कथासंग्रह खूप मौलिक आणि प्रेरणादायी आहे. त्यांच्या प्रत्येक कथेतील आशय हा सत्याला आणि माणुसकीला धरून आहे. प्रत्येक कथा सत्य मांडताना वास्तवाला नाकारत नाही हे या कथेचे सौंदर्य आहे. कधीतील आशियाची अनुभूती आणि संवादाची अभिव्यक्ती अनुभवताना सत्य सदैव जिंकले आहे. हे खूप महत्त्वाचे या कथासंग्रहाचे सौंदर्य आहे. म्हणून मला असे म्हणावे वाटते की वास्तव आणि सत्य या कथासंग्रास हातात हात घालून वावरत आहे. म्हणून हा कथासंग्रह मौलिक यशस्वी ठरला आहे.
या कथासंग्रहातील पहिली करा म्हणजे “कालाय तस्मै नमः” ही वास्तव आणि सत्य कथा आहे . या कथेला स्वतःच्या स्वअनुभवाचं परिमाण लाभल्यामुळे ही कथा वस्तुनिष्ठ आशय आणि अनुभवाच्या दृष्टिकोनातून सत्य उतरली आहे. स्वतःच्या आयुष्यात आलेल्या अनुभव प्रसंगातून दोन पिढ्यातील दोन काळामधल्या जुन्या व नवीन कौटुंबिक आणि सामाजिक स्वातंत्र्याच्या जगण्याचे बदल या कथेत लेखकानी चित्रित केले आहेत. या कथेतील भाषा प्रवाही आहे. या कथेतील प्रसंग आणि घटना हे वाचकांना प्रत्यक्ष संवादातून प्रसंगाचे जिवंत चित्र डोळ्यासमोर आकाराला आणून देतात. या कथेतील प्रत्येक प्रसंग आणि संवाद वाचकांची उत्कंठा वाढवून वाचनाचा उत्साह कायम ठेवणारे आहेत. आयुष्यात आलेला सत्य अनुभव कथाशयाच्या माध्यमातून आपण आपल्या सत्य प्रसंगातूनच सौंदर्याने मांडला आहे. ज्ञानाने, शिक्षणाने आणि आधुनिक बदलामुळे मानवी जीवन तसेच कौटुंबिक आणि सामाजिक व्यवस्था बदलत चालली आहे. हा संदेश ही कथा वाचकांना देते. एक पिढी आई-वडिलांच्या विचारावर विश्वास ठेवून चालणारी, आईवडिलांच्या निर्णयाला प्रमाण मानणारी, एकंदरीत आई वडिलांचा मान राखणारी पिढी कशी होती हे दिसते. या प्रामाणिक आणि संस्कारशील कुटुंबाच्या निर्णयाला प्रमाण मानून चालणाऱ्या पिढीमुळे दोन मने जुळली असतानाही केवळ वडिलांच्या शुल्लक अटिंसाठी कौटुंबिक विश्वासाला तडा जाऊ नये यासाठी विवाहाला बाधा येते. मनात असतानाही विवाह जुळत नाही….तर दुसरीकडे ज्ञानाने, शिक्षणाने आणि सर्वांगीण स्वातंत्र्यामुळे तसेच कौटुंबिक आणि सामाजिक परिवर्तनामुळे झालेला बदल या कथेत चित्रित केला आहे. आपल्या समोर आलेली दुसरी पिढी स्वतःच्या आयुष्याचा निर्णय कुटुंबातील निर्णयापेक्षा स्वतःच्या दृष्टिकोनाला अनुलक्षून तो स्वतःचा निर्णय आहे म्हणून तो स्वतः घेतला पाहिजे. त्यामुळे दोन पिढ्यातील झालेला हा सर्वांगीण पातळीवरील बदल आजच्या काळाचे सत्य सांगणारा आहे. आपल्या “कालाय तस्मै नमः” या कथेतील मांडलेले प्रश्न आणि आलेला अनुभव हे प्रत्येक काळाला लागू होणारे त्रिकालाबाधित सत्य आपण कथाशयाच्या माध्यमातून पकडून शब्दबद्ध केले आहे. काळाचे प्रश्न कवेत घेऊन प्रवाही होणारी ही कथा येणाऱ्या प्रत्येक पिढीला अशा बदलाचे सत्य सांगणारी आहे. कथेतील संवाद आणि अनुभवाच्या योग्य संगतीतून या कथेला प्रत्येक कुटुंबामध्ये अनुभवला येणारे वास्तव कथा शब्दाच्या माध्यमातून मांडताना ही कथा वाचकांना जिवंत, ज्वलंत परिस्थितीचे ज्ञान करून देते. एक उत्कृष्ट कथालेखक म्हणून लेखकाच्या कथा लेखनाचे कौशल्य या कथेच्या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. ही कथा कौटुंबिक आणि सामाजिक संदेशाची वास्तव परिस्थिती जगालाच सांगणारी आहे. की हेच काळाचे सत्य आहे. ही सत्यकथा अतिशय उत्कृष्ट अतिशय वास्तव आणि वस्तुस्थितीचे वस्तुनिष्ठ ज्ञान करून देणारी आहे. म्हणून ही एक प्रेरणादायी कथा आहे.
या कथा संघातील दुसरी कथा “वाटते एक’ घडते भलतेच!” ही आहे. ही एक वास्तव सत्य कथा असल्यामुळे प्रत्येकाच्या जीवनाला स्पर्श करणारी आहे. या कथेचा आशय वास्तवाने नटला आहे. या कथेतील प्रत्येक संवादातून अनुभवाचा जिवंतपणा खूप मनोमन भावतो. या कथेच्या माध्यमातून प्रत्येकाच्या आयुष्यात असे अनेक प्रसंग येतात की आपल्या मनात असते एक आणि घडते भलतेच… याच अनुभवाचा प्रत्यय या कथेतून येतो. म्हणून ही कथा प्रत्येकाच्या जीवना अनुभवाचे सौंदर्य शब्दबद्ध करणारी आहे. याचबरोबर याच कथेत आपण निर्माण केलेल्या कलेतून अभिनयातून आणि सादरीकरणातून आपण ठरवलेल्या सौंदर्यापेक्षा प्रेक्षकांना आणि परीक्षकांना काही अलौकिक आणि दैदिप्यमान दिसायला आणि अनुभवायला येतं त्यावेळेस कथेचं सौंदर्य आणि मूल्य वाढल्याचे समाधान प्राप्त होते. म्हणून ही एक कथा वास्तव सौंदर्याने नटली आहे.
“किंमत मातृत्वाची” ही कथा अतिशय दर्जेदार आहे. या कथेचा विषय प्रत्येकाच्या अंतःकरणाचा आहे. या कथेत जीवनाच्या अंतिम सत्याचे सौंदर्य टिपले आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही कथा वाचकांच्या हृदयाचा ठाव घेते. प्रत्येक प्रसंग आणि संवादातून वाचक पुढे जात असताना शेवट काय? ही उत्कंठा वाचकांच्या मनात कायम असते. हे या कथेचे यश आहे. काळीज पिळवटून टाकणारे परिस्थितीचे सत्य आणि आपल्या पोटचं तान्हं बाळ दुसऱ्याला दत्तक दिल्यावर हरवलेल्या मातृत्वाची वेदना ही आयुष्य हेलावून टाकणारी घटना किती भयानक वेदनादाई आहे हेे सांगणारं जीवनाचं अंतिम सत्य हे या कथेत लेखकाने खूप कौशल्य आणि प्रभावीपणे मांडले आहे. यामुळे ही कथा अतिशय श्रेष्ठ जीवनमूल्याची शिकवण देणारी आहे.
“कोटी कोटी रूपे तुझी” ही कथा वाचताना पारमार्थिक जीवनाचा अनुभव प्रत्येक वाचकाला येतो. संतांच्या जीवनात आलेल्या हाल अपेष्ट आणि अडचणी आणि त्यातून त्यांच्या सात्विक जीवनाचा झालेला परिचय असाच आशय या कथेचा भक्तिमय आहे. नियती कुठेतरी आपल्या बाजूने उभी असलेली आणि नियतीचा एक दैवी चमत्कार सावता आणि सुधामती या पात्राच्या अनुषंगाने वाचकाला अनुभवास येतो.
देव माणसं, नात्याची वीण, मैत्रधर्म, या आणि अशा त्यांच्या कथेतून ते जीवनाकडे गांभीर्याने जाणीवपूर्वक त्रयस्ताच्या भूमिकेतून पाहताना दिसतात. मैत्रधर्म या कथेच्या माध्यमातून सखाराम आणि तुकाराम या पात्राच्या अनुषंगाने समाजातील व्यक्तीचित्रणाचा वास्तव स्वभाव रेखाटला आहे. समाजात जगताना अनुभवास येणाऱ्या अशा अनुभवाचे हे वास्तव आणि जिवंत उदाहरण आहे. शेवटपर्यंत सत्याला माणुसकीला एकनिष्ठतेला सात्विकतेला आणि निर्मळ कर्माला किती महत्त्वं आहे हे या कथेच्या लेखकानी दर्शविले आहे. अनेक मूल्यांनी ही कथा सुंदर झाली आहे.
वरील सर्व कथांच्या माध्यमातून त्यांच्या अंतःकरणाचा सत्यभाव, प्रत्येक घटना प्रसंगाकडे सकारात्मकतेने पाहण्याची दृष्टी, अंतःकरणातील माणुसकीची श्रद्धा… ही त्यांच्या कथेतील नवी मूल्य आहेत. सौंदर्याबरोबरच सत्याचा साक्षात्कार करणे आणि वास्तवाबरोबर वस्तुनिष्ठता अनौपचारिक पद्धतीने मांडणे ही त्यांची कौशल्य कथा वाचताना प्रत्येकास अनुभवास येतात. "घटाघटाचे रूप आगळे...! ही त्यांची एक वास्तव आणि सौंदर्यशील जाणिवेची कथा आहे. बालपणीचा जयप्रकाश नावाचा मित्र ज्यावेळेस खूप वर्षानंतर अचानक आणि अनपेक्षित भेटतो... तेव्हा लेखकाला धक्काच बसतो. आणि एका चुकीच्या प्रसंगामुळे अंधकारमय भविष्य मित्राच्या वाट्याला आले आणि संपूर्ण आयुष्य कसे उद्ध्वस्त झाले याचे मन हेलावणारे शोकात्मक जीवन या कथेचा सार आहे. लेखकांनी या कथेत माणुसकी, मित्रधर्म, अंतःकरणाचा मोठेपणा, दयाभाव, मैत्रीचे पावित्र्य, आणि एकनिष्ठता या मूल्याची जाणीव या कथेच्या शब्दाशब्दातून पेरली आहे. म्हणून ही कथा मौलिक अर्थाने सुंदर ठरली आहे. "भक्तीसुधा" ही कथा तत्कालीन वास्तव परिस्थितीचे गांभीर्य वाचकांच्या समोर मांडते. आनंदी आयुष्याची होळी करणारी आपली अपत्य, जीवनाकडे व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहणारी मुलं, भावनेपेक्षा पैशाला महत्त्व देणारी पिढी,स्वतःच्या स्वार्थापुढे पैशापुढेआणि फायद्यापुढे आईवडिलांच्या कोणत्याही भावनेचा विचार न करणारी मुलं ही या समाजाची वास्तव परिस्थिती या कथेच्या माध्यमातून लेखकानी मांडली आहे. स्वतःचं सुख समाधान हरवून मुलाबाळांसाठी जगणाऱ्या आई-वडिलांची शेवटी होणारी शोकात्मक कहानी या कथेचा आत्मा आहे. हे समाजाचं जळजळीत वास्तव या कथेन अतिशय कौशल्याने वाचकाच्या समोर मांडले आहे. पैशापुढे स्वतःचा आनंद आणि समाधान हरवून स्वार्थाच्या मागे धावणाऱ्या या पिढीला मोठी शिकवण देणारी ही कथा खरंच खूप मौलिक आहे. या व अशा अनेक मूल्यांची पेरणी करणाऱ्या वरील सर्व कथा वाचताना खरंच उत्कंठा वाढवत वास्तव परिस्थितीची जाणीव करून देणाऱ्या आहेत. एक चांगला वाचनीय आणि मौलिक संदेश देणारा हा कथासंग्रह आहे. आपल्या आयुष्यात आनंद आणि सुख याचबरोबर माणुसकी, एकनिष्ठता, मैत्रीचे पावित्र्य, मनाचा मोठेपणा, कर्माचे फळ, दोन पिढ्यातील संघर्ष, सात्विक परमार्थिक भाव, ईश्वरीय माणसांचे दर्शन या व अशा अनेक मूल्यांचे दर्शन कथा वाचताना अनुभवास येते. कथेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत कथा वाचताना कथेचा विषय, आशय आणि पात्रे अंतःकरणात रममान होत वाचकही तल्लीन होतो. जवळजवळ सर्वच कथेचा शेवट गोड आणि आनंद देणारा, प्रेरणा देणारा असल्यामुळे वाचकांना शेवटी निर्मळ समाधान मिळते. हे या कथासंग्रहाचे मौलिक यश आहे. यामुळे हा कथासंग्रह वाचकांच्या अंतःकरणाचा ठाव घेणारा आणि अनेक श्रेष्ठ जीवन मूल्याची शिकवण देणारा आहे.
दत्तात्रय जाधव,९६८९२५०२५१