“रमजान महिन्यामध्ये कुरआनचे अवतरण झाले- मानवजाती-करिता मार्गदर्शन व मार्गदर्शनाच्या सुस्पष्ट पुराव्यांनी समाविष्ट सत्य व असत्याची कसोटी. ज्या कुणाला या महिन्याचा लाभ होईल त्याने ह्या महिन्यात पूर्ण उपवास करावेत.” (कुरआन 2:185) रमजानची महानता यामुळेच आहे की या महिन्यात 'पवित्र कुरआन' हा ईश्वरी ग्रंथ सकल मानवजातीच्या कल्याणाकरिता अवतरीत होण्यास सुरुवात झाली. रमजानचे महत्व जाणायचे असेल तर कुरआन जाणून घेतला पाहिजे. कुरआन हे अंतिम ईश्वरीय ग्रंथ आहे याचा केंद्रबिंदू मानव आहे. *"हे मानवांनो"* असे अनेकदा कुरआन उद्देशून बोलतो. मानवी जीवनाचा उगम, इतिहास, मानवी संस्कृती, त्याच्या जीवनाचा उद्देश व अंत, इहलोकीय व परलोकीय जीवन, वैयक्तिक व सामूहिक जीवन, वैवाहिक, कौटुंबिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय जीवन या साऱ्या जीवनक्षेत्राबाबत कुरआन भाष्य करतो. हा अंतिम व सुरक्षित ईश्वरीय ग्रंथ आहे जिवंत भाषेतील जिवंत ग्रंथ आहे. सर्वात जास्त पठाण केला जाणारा ग्रंथ आहे. त्याला मुखोद्गत करणाऱ्याची संख्या करोडोच्या घरात जाते. हा आवाहन करणारा ग्रंथ आहे. पवित्र कुरआनच्या ज्या मूलभूत श्रद्धा आहेत, त्यापैकी पहिली म्हणजे या साऱ्या विश्वातील मानवांचे मूळ एक पुरुष आणि एक स्त्री आहे. सार्या मानवांचे आजोबा व आजी आदम व हव्वा (ॲडम व ईव्ह) एकच आहेत, म्हणून सर्व मानव आपापसात बंधू व भगिनी आहेत. ही वैश्विक बंधुभावाची शिकवण कुरआन प्रथम व्यक्त करतो. दुसरी महत्त्वाची श्रद्धा अशी की या साऱ्या सृष्टीचा निर्माता, रचयिता, शासक, पालक, मालक, धनी, स्वामी हा एक आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी त्याला 'निर्मिक' असे संबोधले आहे. तो निर्गुण निराकार आहे. तो स्वयंभू आहे. ना ती कोणाची संतती आहे ना त्याची कोणी संतती आहे. त्याच्या समान कोणीही नाही. असा अल्लाहचा (ईश्वर) परिचय कुरआन करतो. ज्याप्रमाणे एका शाळेचे दोन मुख्याध्यापक, एका राज्याचे दोन मुख्यमंत्री व एका देशाचे दोन प्रधानमंत्री अशक्य आहे, तसेच या साऱ्या सृष्टीचे एकापेक्षा जास्त ईश्वर ही अशक्य. कुरआनची तिसरी महत्त्वाची श्रद्धा ही प्रेषितत्त्व आहे. मानवाला या जगात जीवन जगण्याचे मार्गदर्शन करण्याकरिता जवळपास एक लाख चोवीस हजार (1,24000) संदेशवाहक या पृथ्वीतलावर आले. प्रत्येकांनी आपापल्या काळातील लोकांना सत्य मार्गाकडे बोलावले. आदरणीय आदम(अ.) हे पहिले मानव व पहिले संदेशवाहक आहेत आणि पैगंबर मुहम्मद(स.) हे संदेशवाहकांच्या शृंखलेतील अंतीम संदेशवाहक आहेत. पैगंबर मुहम्मद(स) यांचे जीवन व शिकवणी आजही पूर्णता सुरक्षीत आहेत. त्यांच्याबद्दल पवित्र कुरआन म्हणतो, *"हे मुहम्मद(स.) आम्ही तुम्हाला सकल जगवासियांकरीता कृपा बनवून पाठविले आहे."* पृथ्वीच्या अंतापर्यंत येणाऱ्या प्रत्येक मानवाकरीता पैगंबर मुहम्मद(स.) कृपाळू आहेत. त्यांनी सहाव्या शतकात अरबस्थानात न्याय, समता व बंधुत्वावर आधारीत सुंदर समाज व राज्य स्थापित केले. यासारखे दुसरे उदाहरण इतिहासात आढळणार नाही. पवित्र कुरआनची चौथी व महत्त्वाची श्रद्धा म्हणजे मरणोत्तर जीवन. मानवी जीवन इहलोक व परलोक या दोन भागात विभाजीत आहे. आपण इहलोकीय जीवन जगत आहोत. हे अशाश्वत आहे. मृत्यू प्रत्येकासाठी अटळ आहे. हे जग नश्वर आहे. याला सोडून प्रत्येकाला जायचे आहे. एके दिवशी या पृथ्वीचा अंत होईल. प्रलय(क.यामत) येईल त्यादिवशी पृथ्वीतलावर जन्मलेल्या प्रत्येक मानवाला आपल्या निर्मात्या समोर उभा रहावे लागेल. आपल्या प्रत्येक कर्माचा जाब द्यावा लागेल, ही उत्तरदायित्वाची भावना कुरआन प्रत्येक मानवात निर्माण करतो. या पृथ्वीतलावर केलेल्या कर्माचे फळ स्वर्ग किंवा नरकाच्या स्वरूपात परलोकीय जीवनात मिळेल. हे परलोकीय जीवन स्थायी, नेहमीकरीता आहे. पैगंबर मुहम्मद(स.) उदाहरण देऊन सांगतात की, *"हे इहलोकीय जीवन शेती आहे, त्या परलोकीय जीवनाची. इथे जे पेराल, तिथे ते उगवेल."* असा हा ईश्वरी ग्रंथ पवित्र कुरआन रमजानच्या महिन्यांमध्ये लाभला म्हणून अल्लाहचे (ईश्वर) आभार व्यक्त करण्यासाठी मुस्लिम बांधव रमजानच्या महिन्यात रोजे धारण करतात. रोजा बद्दल पवित्र कुरआनमध्ये अल्लाह (ईश्वर) म्हणतो, *"हे ईमानधारकानो, विहित केले तुमच्यावर रोजे जसे विहित केले होते तुमच्या पूर्वीच्यांवर जेणेकरून तुम्ही धर्मपरायण व्हाल."* (कुरआन 2:183)
यावरून हे स्पष्ट होते कि रोजे काही नवीन नाहीत. मानवाच्या आरंभापासूनच हे रोजे सर्वांकरीता अनिवार्य होते. म्हणूनच याचे स्वरूप आज आपण प्रत्येक धर्मात पाहतो. रोजाची व्याख्या अशी आहे, “रोजा म्हणजे सकाळी सूर्योदयाच्या दोन तासापूर्वी पासून ते सूर्यास्तापर्यंत काहीही न खाणे, न पिणे, पत्नीशी समागम न करणे आणि प्रत्येक वाईट बाबी पासून स्वतःचा बचाव करणे म्हणजे रोजा.”
म्हणजेच हा रोजा ज्याठिकाणी पोटाचा आहे त्याबरोबरच शरीराच्या प्रत्येक अवयवांचाही आहे. खोटे बोलू नये हा जिभेचा रोजा, वासनेच्या दृष्टीने पाहू नये हा डोळ्याचा रोजा, मलीन विचार करू नये हा ह्रदयाचा व बुद्धीचा रोजा. एकंदरीत रोजा म्हणजे शरीरांच्या प्रत्येक अवयवांना नियंत्रित करणारे प्रशिक्षण आहे. रमजान महिन्यात एकूण सातशे वीस तास या कालावधीत मानवाला चारित्र्यसंपन्न मानव बनवण्याचे प्रशिक्षण रोजाच्या माध्यमाने दिले जाते. रोजाचा मुख्य उद्देश 'तक़वा' (इशप्रेम व इशभय) निर्माण करणे आहे, तर
‘तकवा’ विषयी संक्षिप्तपणे विचार करू. रोजा ठेवणाऱ्यांत “तक़वा’ निर्माण झाला तर उपवासाचे सार्थक झाले! मात्र तकवा निर्माण न झाल्यास त्याचे रोजे केवळ व्यर्थ ठरतील, तक़वा’ हा मूळ अरबी शब्द असून ईशप्रेमापोटी अल्लाहच्या आज्ञांचे पालन करणे आणि ईशभयाने त्याच्या अवज्ञेपासून अलिप्त राहणे असा त्याच्या दुहेरी अर्थ होतो. इस्लामी राजवटीचे प्रमुख हजरत उमर (रजि.) यांनी एका प्रसंगी हजरत काफ बीन मलिक (रजि.) यांना विचारणा केली. "हे काफ (रजि.), मला "तक़वा' विषयी सांगा. हजरत काफ़ (रजि.) म्हणाले, "उमर (रजि.), कधी आपणावर एखाद्या घनदाट काटेरी जंगलातून जाण्याचा प्रसंग आला?" उमर (रजि.) उत्तरले, "हो. एकदा असा प्रसंग आला होता." "मग काय केले?" उमर सांगू लागले. हे काफ (रजि.), एक एक पाऊल अत्यंत दक्षतेने, सावधतेने व काळजीपूर्वक टाकत होतो, की जेणेकरून एखादा काटा मला टोचू नये! अशा प्रकारे मी अतिदक्षतापूर्वक संपूर्ण जंगल पार केले. "ह. काफ (रजि.) बोलते झाले. "उमर, हाच तर आहे तक़वा. दुनियेरूपी या जंगलातून जीवनरूपी हा प्रवास असा दक्षतापूर्वक पूर्ण करा की. कुठल्याही क्षणी, कुठलीही चूक, अल्लाहची अवज्ञा आपल्या हातून घडू नये."
विसाव्या शतकातील थोर इस्लामी विचारवंत मौलाना अबुल आला मौदूदी (रह.) ‘तक़वाचे स्पष्टीकरण एका सुंदर उदाहरणाने करतात. दोन घोडेस्वार आहेत. पैकी एकाच्या हाती घोड्याचा लगाम आहे, म्हणून हवे त्या दिशेने जाण्यास तो घोडेस्वार भाग पाडील, मात्र दुसऱ्या घोडेस्वाराच्या हातून घोड्याचा लगाम सुटलेला आहे. लगाम हाती नसल्याने हा दुसरा घोडेस्वार पूर्णतः घोड्याच्या नियंत्रणात आहे. घोडा आपल्या इच्छेनुसार हवेतिकडे त्या घोडेस्वाराला घेऊन जाईल. आदरणीय मौलाना मौदूदी साहेब म्हणतात, “मानवाच्या ठाई असणारे हे मन, या वासना म्हणजेच हे घोडे होय आणि ही समस्त मानवजात वासनारूपी या घोड्यांवर स्वार प्रवाशासमान आहे. एक तो प्रवासी आहे की, वासनारूपी या घोड्याचा लगाम त्याच्या हाती आहे. अर्थात या वासनावर त्याचे संपूर्णपणे
नियंत्रण आहे. दुसरा तो आहे जो संपूर्णता वासनारूपी घोड्याच्या आहारी गेला आहे. नियंत्रणात आहे. लगाम हाती नसल्याने घोडा त्याच्या ताब्यात नसून तोच घोड्याच्या ताब्यात आहे.खरेतर आज उभ्या मानवजातीपुढील मूळ प्रश्न हाच आहे. वासनांच्या आहारी गेलेली. बेलगाम झालेली ही माणसं, ढासळलेली. रसातळाला गेलेली ही नीतीमत्ता माणसं कशी नीतीहीन झालीत आहे. पशुवत झालीत. नव्हे हिंस्र पशूनीही शरमेने मान खाली घालावी असली नीच कारस्थानं माणूस करू लागलाय. हीच खंत व्यक्त करताना डॉ. राधाकृष्णन म्हणतात, “वैज्ञानिक प्रगती करून माणसाने चंद्रावर तर झेप घेतली खरी, पण याच धरतीवर माणूस म्हणून जगायचे अजून तो शिकला नाही. वासनांच्या आहारी गेलेली ही माणसं आणि परिणामस्वरूप त्याच्याकडून घडणारे हे घोटाळे, द्वेष आणि हिंसा पसरवणारी भाषणे, सेक्स स्कैंडल्स्, ही घृणा, हे दंगे. ही अराजकता, स्वार्थीपणा, भौतिकता, चंगळवाद हो, हाच आहे मानवजातीला जडलेला खरा रोग. 'तकवा नाही, संयम नाही, ईशभय नाही, माणुसकी नाही, नीतीमत्ता नाही, प्रेम नाही. आस्था नाही, दया नाही, माया नाही. अरे जन्मदात्या माता-पित्याची ओळख राहिली नाही माणसांना शेम! शेम! पैशासाठी हावरटपणा दाखवणाऱ्या मानवांना पाहून मन खिन्न होते. पैसा! पैसा!! पैसा!!! माणसं कशी पिसाळलीत या पैशाकरिता, जन्मदात्या आईची ओळख राहिली नाही. साऱ्या समस्याची निव्वळ भौतिक कारणं शोधण्यात आपण मग्न आहोत. भूकंप का झाला? चक्रीय वादळ का आलं? पाण्याची पातळी खोल का गेली? एड्स का बोकाळला? कोरोणा सारखे महाभयंकर आजार का फोफावले? माझ्या मते भौतिक कारणावरोबरच उपनिर्दिष्ट कारणे ही या दुर्दशेला कारणीभूत असावीत, असंख्य वृद्ध माताची वृद्धापकाळातील ही तळमळ, अगणित निष्पाप अनाथांच्या कठातून फुटणाऱ्या या किंकाळ्या, विधवांचे हे अखंडित अश्रु, हा अन्याय, हा अत्याचार ही तर कारणे नसावीत ना या समाजाच्या दयनीय अवस्थेची? सुनामी व प्रलयंकारी भूकंपाच्या घडलेल्या भयंकर दुर्घटना ! मृत्युनं जणु थैमान घातलेलं, अशा भयंकर दुःखाच्या क्षणी देखील सोन्या चांदीची दाग-दागिने लुटण्यासाठी मातीच्या ढिगायाखालून आया-बहिणीच्या प्रेतांना उकरून काढणारी ही माणसंच तर होती. संपत्तीच्या हव्यासापोटी पिसाळलेले मानवरूपी हे हिंस्र पशू. ही आहे समस्या या देशाची, हा आहे खरा प्रश्न उभ्या मानवजातीचा. या पार्श्वभूमित आपण रोजा, उपवासाचा विचार करू. रोजा आहेच मुळी वासनारूपी घोडयावर नियंत्रण मिळविण्यासाठी. संयम, ईशभिरुता निर्माण होण्यासाठी.. आता आपण 'तकवा', संयम, ईशभितेचे एक उदाहरण पाहू. ही आहे दिड हजार वर्षांपूर्वीची एक घटना, एक विधवा आणि तिच्या अनाथ चिमुकलीची प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या पश्चात त्यांचे अनुयायी ह, उमर (रजि.) यांचे शासन आहे. दोन-पाच शेळ्यांच्या दुधावर या दोघींचा फाटका संसार कसाबसा उभा आहे. दारिद्र्याने कंटाळून एके दिवशी ती विधवा माता भल्या पहाटे दूध काढणाऱ्या आपल्या चिमुकलीला म्हणते, "बाळे! आज दुधात थोडं पाणी घाल. पैसे थोडे जास्त मिळतील." दुधात पाणी घालणे त्याकाळी गुन्हा होता. मुलगी म्हणते, "आई. हे कृत्य ह, उमर (रजि.) यांना कळालं तर?" अगं वेडे, उमर कशाला येतील एवढ्या रात्री इथे तुला पहायला?" आई उत्तरते. यावर ही चिमुकली मोठ्या आत्मविश्वासने आपल्या आईला समजावते. "आई. उमर पाहो की न पाहो अल्लाह तर सदा सर्वदा पाहतोय. त्याला तर कळाल्यावाचून रहाणार नाही. आणि गाठ तर आपली शेवटी त्याच्याशीच आहे?" धन्य ती अनाथ चिमुकली. अंधाऱ्या रात्री दुधात पाणी घालण्यासारखी क्षुल्लक चूक ती करत नाही. हा आहे 'तकवा', ही आहे ईशभिरूता, हाच आहे संयम, हेच आहे वासनारूपी घोड्यावर नियंत्रण, हीच आहे दुनियेरूपी जंगलातून जीवनरूपी प्रवास करताना घ्यावयाची दक्षता. कुठे ही महान चारित्र्याची अनाथ चिमुकली आणि कुठे दिवसा ढवळ्या देशाच्या अब्जावधी रुपयांवर डाका घालून जनतेला देशोधडीला लावणारे आजचे स्वार्थी, भ्रष्टाचारी, चारित्र्यहीन राज्यकर्ते, अरेरे! प्रेषित मुहम्मद (स.) रोजाचे हे उद्दिष्ट वर्णन करताना एकदा म्हटले, "रोजा ठेवूनही जो खोटे बोलणे व खोटे वागणे सोडत नाही. त्याच्या निव्वळ उपासमारीची अल्लाहला काही एक गरज नाही." आदरणीय प्रेषित मुहम्मद (स.) एका प्रसंगी म्हटले, "रोजा निव्वळ खाणे-पिणे सोडण्याचे नाव नाही तर शरीराच्या प्रत्येक अवयवावर नियंत्रण मिळविणे आहे.आज भ्रष्टाचार हा देश व समाजापुढील ज्वलंत प्रश्न आहे. प्रेषित मुहम्मद (स.) साहेबांच्या एका कथनानुसार, "हरामाच्या कमाईवर पोसलेल्या व्यक्तीची, कुठलीही उपासना, सत्कर्म अल्लाह स्वीकृत करणार नाही. " अर्थात कमाईच हरामाची असेल तर नमाज, रोजा, हजयात्रा, जकात, दान- धर्म आदि कुठल्याही उपासनेला तिळमात्र किंमत नाही. ही आहे इस्लाम कुरआन व प्रेषितांची दिव्य शिकवण. आज काही लोक शाकाहार नी मांसाहार असा बाऊ करताना आढळतात. मात्र शाकाहाराच्या उपासकांची कमाई बहुतांशी आहे हरामाची. गोरगरिबांच्या रक्ताचं शोषण करून कमावलेली ही गडगंज संपत्ती, आरामशीर गादीवर बसून सावकारकीच्या, दलालीच्या माध्यमानं संपूर्ण समाजाचं केलेलं शोषण काय या लोकांचा असा ग्रह आहे की हरामाच्या या कमाईने ते अल्लाहला, आपल्या स्वामीलाही धोका देऊ शकतील? 'तकवा' जो रोजाचा हेतू आहे. त्याला विषद करणारी प्रेषित मुहम्मद (स.) साहेबांच्या काळातील ही एक घटना खूप बोलकी आहे. उपवास करणारे दोघेजण (रोजेदार) मदिनेतील प्रेषितांच्या मशिदीत आले. नमाज पूर्ण करून ते जाऊ लागले. प्रेषित मुहम्मद (स.) त्यावेळी मशिदीत उपस्थित होते. प्रेषितांनी त्या दोहोंना जवळ बोलावलं. वजू (नमाजपूर्वी तोंड, हात-पाय स्वच्छ धुणे) व नमाज पुनः अदा करण्याची आज्ञा केली व त्या दिवशीचा उपवास ईदनंतर पुन्हा ठेवण्याविषयी संकेत दिले. त्या दोघांनी आश्चर्याने विचारले, "हे प्रेषित मुहम्मद (स.) आमचं असं काय चुकलं, की आमची वजू, नमाज, रोजा आदि सर्व व्यर्थ झालं?" प्रेषित (स.) म्हटले, "नमाजपूर्वी तुम्ही दोहोंनी आपसात अमुक एका व्यक्तीची निंदा नालस्ती केली नाही काय? त्या निदां नालस्तीने तुमची नमाजही गेली आणि रोजाही गेला."
ही घटना खूप बोलकी आहे. साहजिकच या दोहोंपैकी एकाने कुणा व्यक्तीची निंदा-नालस्ती केली असणार आणि दुसऱ्याने ती ऐकली असणार. म्हणजेच एकाची उपासना जिभेने निंदा नालस्ती केल्यामुळे व्यर्थ झाली. तर दुसऱ्याची उपासना कानांनी निंदा-नालस्ती ऐकल्यामुळे वाया गेली. प्रेषित मुहम्मद (स.) एकदा म्हटले, *"तुम्हापैकी कुणाला रोजा असेल आणि कुणी त्याच्याशी शिवीगाळ, भांडण तंटा करू लागला तर रोजा असणाऱ्याने सागावे की, "बाबारे, मला रोजा आहे, माझ्याशी शिवीगाळ, भांडण-तंटा करू नकोस."* भाग्यवान आहेत ते ज्यांना पवित्र रमजानचा हा शुभ महिना जीवनात पुन्हा एकदा लाभला. ही त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे. या पवित्र महिन्यात सद्सद्विवेक बुद्धीने महिनाभर रोजे (उपवास) ठेवल्यास निश्चितच रोजेदारात तो तकवा, ईशभिरूता व संयम निर्माण होईल, ज्याचा त्याच्या संपूर्ण जीवनावर प्रभाव पडेल.
पहाटे उठून सूर्योदयापूर्वी सेहरी करणे. सूर्यास्तापर्यंत खाणे-पिणे वर्ज्यं, कडक उन्हाळ्याचे दिवस, उन जसं मी म्हणतयं! तहान भयंकर लागलेली। आत्मा पाणी पाणी करतोय! अशा अवस्थेत नमाजसाठी मशिदीत यायचं. वुजू करायची, हात पाय धुवायचे, तीन वेळा गुळण्या करायच्या. थंड थंड पाणी – एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तीनदा घशापर्यंत न्यावयाचे. मात्र खबरदार! घशाखाली पाण्याचा एक थेंबही जाता कामा नये! बाप रे! कसली ही अग्नीपरीक्षा! भुकेने पोटात कावळे ओरडताहेत! समोर पंचपक्वान्न आहेत. मात्र सावधान! एक घास घेणे नाही. साऱ्या जगाला अंधारात ठेवून एक घोट पाणी तू घशात लोटू शकशील! अंधारात काना-कोपऱ्यात, लपून छपून काही खाऊ-पिऊ शकशील! मात्र कुणीही रोजेदार असं करत नाही! अगदी ५-७ वर्षांचे बालकही असे करत नाहीत. कारण रोजा त्याच्यात ही भावना निर्माण करतो की, साऱ्या जगाला अंधारात ठेवणे शक्य आहे, पण त्या अल्लाहला कदापि मी अंधारात ठेवू शकत नाही! तो तर सदासर्वदा मला पहात आहे. हीच जाणीव त्याला खाण्या-पिण्यापासून परावृत्त ठेवते. ज्याने रोजाच्या अवस्थेत अन्न पाणीही केवळ अल्लाहसाठी त्यागले तो का उपवास सोडल्यानंतर दारू, व्यभिचार आदि अल्लाहने सदासर्वदासाठी निषिद्ध करविलेल्या गोष्टी करील? नाही! तो असे कदापि करणार नाही. कारण रोजाच्या माध्यमातून त्याच्या मनात ही शिकवण खोलवर रुजलेली असेल की कुणी पाहो अथवा न पाहो, अल्लाह तुला पाहिल्यावाचून राहणार नाही. हाच आहे ‘तकवा’, हीच आहे ईशभिरूता. संपूर्ण एक महिना संयम व आत्म नियंत्रणाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर जेव्हा चंद्रदर्शन होते, त्याच्या दुसऱ्या दिवशी रमजान ईद, ईद उल फितर साजरी केली जाते. प्रत्येक धर्मात व समाजात आनंदोत्सव व समारंभ साजरे करण्याची परंपरा आहे. हे उत्सव साजरे करीत असताना नवीन चांगले वस्त्र परिधान करणे, घरात गोडधोड जेवण करणे, एकमेकांना भेटणे व शुभेच्छा व्यक्त करणे वगैरे प्रथा अगदी प्राचीन इतिहास काळापासून मानवी समाजात सुरू आहेत. काही सण ऋतू व मौसमावर अवलंबून असतात, काही सण विशेष पिकांच्या उत्पन्नावर अवलंबून असतात. काही उत्सव शौर्य व विर व्यक्तींच्या गाथा वर आधारित असतात परंतु इस्लामी सन सर्वसाधारणपणे आहुती, बलिदान, अल्लाहचे आज्ञापालन व शरीयतच्या नियमानुसार व अल्लाहचे आदेश पालन यावर अवलंबून असतात. रमजान ईद तीस दिवसांच्या उपवासानंतर केवळ आनंदोत्सव नसून ईश्वराचे आभार प्रदर्शनही आहे. अल्लाह समोर आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचे प्रतीक म्हणून इदचा सोहळा साजरा केला जातो. यासाठी शहराबाहेर असलेल्या ईदगाह वरती जाऊन नमाज पठण केली जाते. तत्पूर्वी सर्वप्रथम आपल्या व आपल्या वर निर्भर कुटुंबीयांतर्फे सदका ए फि़त्र अदा करणे हे अनिवार्य मानले गेले आहे. आपण खात असलेले गहू किंवा त्याची किंमत प्रत्येक माणसावर पावणेदोन शेर (एक किलो साडेसहाशे ग्रॅम) या प्रमाणात ईदच्या आदल्या दिवशी पर्यंत गोरगरीबात वाटप करण्यात यावी तरच आपण रमजानमध्ये केलेल्या सर्व उपासना व आराधना स्वीकार्य अन्यथा नाही. ईदच्या नमाजला जाण्यापूर्वी अंघोळ करून, आपल्या ऐपतीनुसार नवीन कपडे परिधान करून सुगंधित शरीर व मनाने अल्लाहची स्तुती करत लोक ईदगाह कडे जातात. तेथे नमाज पठण करतात. खतीब प्रवचन देतो, त्याला लक्षपूर्वक ऐकून अल्लाहच्या दरबारी दुवा मागितली जाते. ईदचा दिवस उपवासधारकांकरीता पगाराचा दिवस आहे. उपवास धारकास त्याचा मोबदला आत्मिक शुद्धीच्या स्वरूपात मिळतो. ईदगाहवर नमाज पढणे ही प्रेषीतांची परंपरा आहे. काही अडचण असल्यास शहराच्या एखाद्या मशिदीत ही ईदची नमाज पढली जाते. ईदगाह वर नमाज पढणे जास्त पुण्याईचे मानले जाते. समाजातील सर्व स्तरातील लोक या ठिकाणी जमा होऊन खांद्याला खांदा लावून नमाज पठण करतात. सामाजिक समतेचे जिवंत प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळते. ईदगाह वर जेव्हा एक गरीब एका श्रीमंताच्या, एक काळा गोऱ्याच्या, एक लहान मोठ्याच्या, एक सामान्य असामान्याच्या खांद्याला खांदा लावून जेव्हा नमाज पढतो तेव्हा प्रेषितांनी कायम केलेली सामाजिक समता प्रत्यक्षात साकारली जाते. समतेचे एक उदाहरण म्हणजे दिल्लीतल्या जामा मशिदीत तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम नेहमी ईदची नमाज पढायचे. एकदा त्यांना उशीर झाला आणि त्यांना मशिदीत सर्वात शेवटी तिथे जागा मिळाली जिथे चपला बूट ठेवले गेले होते. लोकांनी त्यांना समोर येण्यासाठी विनंती केली, पण त्यांनी तिथेच एका सर्वसामान्य माणसाच्या खांद्याला खांदा लावून ईदची नमाज पठण केली. अशाप्रकारे ईदगाहवर किंवा मशिदीत सार्वजनिकपणे ईदची नमाज पडण्यामागे राजा-रंक, श्रीमंत-गरीब, श्रेष्ठ-कनिष्ठ असे सगळे जातीय भेद, वर्णभेद नष्ट करून सामाजिक समता प्रस्थापित होते. म्हणूनच कवी इक्बाल ने म्हटले आहे--
“एकही सफ़ मे खडे हो गए मेहमूद व अयाज न कोई बंदा रहा ना बंदा नवाज.”
नमाज पठणानंतर जे प्रवचन दिले जाते त्यात समाजातील वाईट परंपरांचा विरोध, सत्याचा स्वीकार, माणुसकी, बंधुभाव व आपुलकीची शिकवण दिली जाते. मानवाचे इहलोकीय व परलोकीय कल्याण याचे विवेचन केले जाते. मानवाने समाजात माणसाशी माणसासारखे वागावे या शिकवणी दिल्या जातात. शेवटी दोन्ही हात वर करून सर्व लोक अल्लाहशी शांतीकरिता प्रार्थना करतात. स्वतःकरिता, आपल्या कुटुंबाकरिता, शेजारी-पाजारी, देशवासियांकरिता व विश्वातील साऱ्या मानवांच्या कल्याणाकरिता सृष्टी निर्मात्यासमोर मागणी करतात. दुवा नंतर सर्व बांधव एकमेकांची गळाभेट घेतात. ईदगाहला आलेल्या सर्व मुस्लिम व अमुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या जातात. घरी पोहोचल्यानंतर घरातील लहान मोठ्यांना ‘ईद मुबारक’ ‘ईदच्या शुभकामना’ असे शुभमंगल बोल बोलतात. ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव सर्वधर्मीय बांधवांना (शेजारी व मित्रांना) आपल्या घरी बोलावून एकत्र बसून शीरखुर्मा चा आस्वाद घेतात. अशा प्रकारे ईदचा हर्षोल्लास साजरा केला जातो. संपूर्ण रमजान महिन्यात जे प्रशिक्षण झाले त्याची प्रचिती येणाऱ्या अकरा महिन्यात आपल्या आचरणातून दिसून यावी हा यामागचा उद्देश आहे.
(वरील विषयाशी निगडित प्रश्न शंका किंवा काही माहिती सवी असेल तर 9421378600 या क्रमांकावर संपर्क साधावा)