🌹 आपले संविधान… राज्यपद्धतीच नव्हे, तर जीवनपद्धती… 🌹
🌷 हमारा अभियान – हर घर-हर मन संविधान 🌼 *भाग - २७* 🌼
🌸 भाग-तिसरा : मुलभूत अधिकार 🌸 आतापर्यंत आपण आपल्या राज्यघटनेचा भाग-एक (अनुच्छेद-१ ते ४) व भाग-दोन (अनुच्छेद-५ ते ११) या दोन्ही भागांविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आजपासून आपण आपल्या राज्यघटनेचा प्रत्येक भारतीयांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असलेल्या भाग-तीन विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या राज्यघटनेची रचना ही अत्यंत सुसूत्रपणे करण्यात आलेली आहे. पहिल्या भागात आपल्या देशाचे नाव व त्याच्या राज्यक्षेत्राविषयी निश्चिती केल्यानंतर कोणकोणत्या व्यक्तींना आपल्या देशाचे अधिकृत नागरिक ठरवले जाईल, याविषयी सविस्तर माहिती भाग-दोन मधुन विस्ताराने देण्यात आलेली आहे. आता देशाचे नाव, राज्यक्षेत्र आणि अधिकृत नागरिकांची निश्चिती झाल्यानंतर, ह्या अधिकृत देशवासीयांना कोणते हक्क आणि अधिकार देण्यात येतील, याची खात्रीसह माहिती देणे गरजेचे होते आणि म्हणूनच नागरिकतेच्या भाग-दोनला लागूनच प्रत्येक भारतीय नागरिकाला देण्यात येणाऱ्या मुलभूत अधिकारांचा समावेश राज्यघटनेच्या भाग-तीन मध्ये करण्यात आला. संविधानाच्या माध्यमातून आपण आपल्या देशाच्या प्रत्येक नागरिकाला काय देणार आहोत? या प्रश्नाचे उत्तर आपण प्रास्ताविकेत बघितले. आपण आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि विविध प्रकारे न्याय देण्याचा संकल्प केलेला आहे. परंतु हे सर्व कशा पद्धतीने आणि किती मर्यादेपर्यंत देणार? याबाबत अतिशय सविस्तर माहिती आपल्या संविधानाचा 'भाग-तीन : मूलभूत अधिकार' यामध्ये देण्यात आलेली आहे. आता हे मूलभूत अधिकार म्हणजे नक्की काय? तर, हे असे नैसर्गिक अधिकार असतात, ज्यांमुळे प्रत्येक व्यक्ती आपले जीवन सुखी, समृद्ध आणि प्रतिष्ठापूर्वक जगू शकतो. मूलभूत अधिकार हे वैयक्तिकरित्या प्रत्येक व्यक्तीला दिले जातात. एखाद्या व्यक्तीचे जर हे अधिकार हिरावून घेतले, तर त्याचे जीवन एक प्रकारे नरकमयच झाले म्हणून समजा. म्हणूनच एक भारतीय म्हणून आपल्या सर्वांना आपल्या संविधानाच्या माध्यमातून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेतील सर्व सदस्यांनी कोणकोणते मूलभूत अधिकार दिलेले आहेत, हे आपण सर्वांनी जाणून घेणे अत्यावश्यक आहे. संविधान म्हणजे फक्त आरक्षण देण्यापुरतेच मर्यादित असल्याची भावना बहुतांश तथाकथित उच्चविद्या विभूषित म्हणवणाऱ्यांच्या मनात असल्याचा, माझा कटू अनुभव आहे. खरं तर त्यांनी ते अभ्यासलेले देखील नसते. पण संविधान म्हटलं की, डोक्यात सर्वात पहिला विचार येतो तो फक्त आरक्षणाचा. आता हे आरक्षण म्हणजे नक्की काय बाब आहे? हे ही बहुतांश जणांना माहीत नसते. असो. पुढे तो भाग येईल, तेव्हा त्याबाबत सविस्तर बोलता येईल. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की, संविधान हे सर्वांचे आहे आणि सर्वांसाठीच आहे. भाग-तीन मध्ये देण्यात आलेले मूलभूत अधिकार हे सर्वच भारतीयांना कोणत्याही भेदभावाशिवाय देण्यात आलेले आहेत. संविधानाच्या भाग-तीनला भारताचा 'मॅग्नाकार्टा' देखील म्हटले जाते. आता हा मॅग्नाकार्टा काय आहे? तर, हा एक लॅटिन भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ आहे 'स्वातंत्र्याची महान सनद'. इंग्लंड मधील अनिर्बंध राजेशाही आणि सामान्य जनता यांच्यातील संघर्षात राजेशाहीला माघार घ्यावी लागली आणि जन्म झाला तो मॅग्नाकार्टाचा. १५ जून १२१५ रोजी इंग्लंडचा राजा जॉन आणि त्याच्या सरदारांमध्ये थेम्स नदीच्या काठावर हा करार झाला आणि सर्व जनतेला व्यक्तीस्वातंत्र्य प्राप्त झाले. सर्वांना समान तत्व लागू करण्यात आले. यामुळे सामान्य व्यक्तीला देखील महत्त्व प्राप्त झाले. ब्रिटनमध्ये खऱ्या अर्थाने लोकशाहीची स्थापना झाली आणि म्हणूनच कोणत्याही देशाच्या राज्यघटना निर्मितीत हा मॅग्नाकार्टा मार्गदर्शक ठरतो. भारताच्या संविधानात मूलभूत अधिकारांच्या जाहीरनाम्याचा समावेश असावा, हा विचार १८९५ मध्ये डॉ. ॲनी बेझंट यांनी त्यावर्षीच्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात मांडला. १९२८ साली भारतीय संविधानाची रूपरेषा काय असावी, हे सुचविण्यासाठी पं. मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती नेमली, तिनेही संविधानात मूलभूत अधिकारांची हमी देणाऱ्या तरतुदी समाविष्ट कराव्यात, असे सुचवले. १९३१ च्या कराची येथील राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात मूलभूत अधिकारांचा ठराव पंडित नेहरूंनी मांडला. पुढे घटना समितीने स्वतंत्र भारताच्या संविधानात मूलभूत अधिकार असावेत, हा निर्णय एकमताने घेतला आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आपल्या भारतीय समाजव्यवस्थेचा परिपूर्ण अनुभव आणि अभ्यास असल्याने त्यांनी हे मूलभूत अधिकार राज्यघटनेत समाविष्ट करताना अतिशय विस्तृतपणे मांडून परिपूर्ण न्याय दिला. *क्रमशः....* 🌹 *प्रश्नमंजुषा क्रं.:-२७* 🌹
१) …….. हा एक लॅटिन भाषेतील शब्द असून त्याचा अर्थ आहे ‘स्वातंत्र्याची महान सनद’.
२) मूलभूत अधिकार हे असे नैसर्गिक अधिकार असतात, ज्यांमुळे प्रत्येक व्यक्ती आपले जीवन ……., ……… आणि ……… जगू शकतो.
३) आपण आपल्या देशातील प्रत्येक नागरिकाला ……, ……, ……. आणि विविध प्रकारे …….. देण्याचा संकल्प केलेला आहे.
४) …………. यांना आपल्या भारतीय समाजव्यवस्थेचा परिपूर्ण अनुभव आणि अभ्यास असल्याने त्यांनी हे मूलभूत अधिकार राज्यघटनेत समाविष्ट करताना अतिशय विस्तृतपणे मांडून परिपूर्ण न्याय दिला. 👉 *इच्छुकांनी सदर प्रश्नमंजुषेची उत्तरे 7276526268 ह्या माझ्या व्हाट्सअप नंबर वर आपले नाव, गाव व जिल्ह्याच्या नावासह आज रात्री पर्यंत पाठवावी. सदर पोस्ट आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून संविधान जनजागृतीच्या उपक्रमात सहभागी व्हावे, ही विनंती.*🙏 ✍️ *नुरखॉं पठाण* *गोरेगाव रायगड* 7276526268
👉🏿 संविधान प्रचारक
दिलीप गायकवाड
गाव: सायगाव, तालुका:खेड, जिल्हा: पुणे:सध्या वास्तव्य कल्याणीनगर, पुणे, जिल्हा:पुणे महाराष्ट्र
9923186418