परिक्षार्थी विद्यार्थ्यांना कसलाही त्रास होणार नाही आशी ग्वाही
लातूर, प्रतिनिधी
मराठा आरक्षण अंमलबजावणी व मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणास पाठींबा देण्यासाठी १४ फेब्रुवारी रोजी पुकारण्यात आलेला राज्यव्यापी बंद लातूर शहर व जिल्ह्यात पाळण्यात येणार असून सर्व समाजबांधवांनी या बंद मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन लातूर जिल्हयातील सकल मराठा समाजबांधवांनी केले आहे.
लातूर येथे या संदर्भात मंगळवारी (दि.१३) समाज बांधवांची बैठक घेण्यात आली व त्यात सर्वोनुमते हा बंद पाळण्याचे ठरले. याअंतर्गत लातूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी सकाळी ८ वाजता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करुन या बंदला सुरुवात होणार आहे. जरांगे पाटील हे गरजवंत मराठयांच्या हितासाठी जीवावर उदार होऊन उपोषण करीत आहेत. त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने चर्चा – भेटीत वेळ न घालता आरक्षण अमलबजावणी करणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठीच समाज बांधवांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे . व्यापारी बांधवांनी आपल्या आस्थापना, संस्थाचालकांनी शैक्षणिक संस्था, बंद ठेवून या बंदसाठी सहकार्य करावे असेही आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे. जरांगे पाटील यांच्या सुचनेप्रमाणे हा बंद शांततेत व सनदशीर मार्गाने होणार असल्याचे समाजाच्या वतीने सांगण्यात आले.
…………….
विद्यार्थ्याना सहकार्य
१४ फेब्रुवारी रोजी १२ विच्या प्रात्यक्षिक परीक्षा असून कोणत्याही विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची खबरदारी बंद दरम्यान घेतली जाणार आहे. त्यामुळे परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी कसलाही ताण न घेता परीक्षा द्यावी असे स्पष्ट करीत सकल मराठा समाजाने त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.