महात्मा बसवेश्वर चॅरिटेबल हॉस्पिटलच्या माध्यमातून अल्पावधीतच लौकिकास आलेले डॉ.दीपक सोमवंशी यांनी वैद्यकीय क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने सेवा देत उल्लेखनीय असे कार्य केले.डॉ.दीपक सोमवंशी यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त त्यांच्या वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील कार्याचा आढावा घेणारा हा लेख…
डॉ.दीपक संग्राम सोमवंशी यांचा जन्म दि. २३ नोव्हेंबर १९६७ रोजी तुळजापूर जि. उस्मानाबाद येथे झाला. हलाखीच्या परिस्थितीमुळे. बालवयापासूनच अनेक चटके सोसण्याची वेळ डॉ.सोमवंशी यांच्यावर आली.त्यांचे प्राथमिक शिक्षण पारा ता.कळंब जि.उस्मानाबाद येथे झाले.माध्यमिक शिक्षण विद्यावर्धिनी हायस्कूल उदगीर, एम.बी.बी.एस. चे शिक्षण स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई जि.बीड, एम. डी.चे शिक्षण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे झाले.हलाखीच्या परिस्थितीत मोठ्या जिद्द आणि चिकाटीने डॉ.सोमवंशी यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.कष्टाचा डोंगर चढल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही या विचाराने प्रेरित होवून ते जीवनातील एक एक टप्पा सर करीत सेवा करण्याचा छंद जोपासला.डॉ.सोमवंशी यांच्या वडिलांनी अतिशय कष्टातून यांना शिक्षण दिले. त्यांनीही जिद्दीने शिक्षण पूर्ण केले. शिक्षण संपल्यावर डॉ.सोमवंशी यांनी प्रथम नेकनूर ता.केज जि. बीड येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाले.या ठिकाणी त्यांनी दोन वर्षे सेवा बजावली व अनुभवाची शिदोरी घेवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा बजावली.या ठिकाणी त्यांनी आठ वर्षे सेवा बजावली.त्यानंतर रायगड जिल्ह्यात श्रीवर्धन येथे खाजगी रुग्णालयात सराव केला.येथे पाच वर्षे प्रॅक्टिस केल्यानंतर त्यांचे तेथे मन रमेना.कारण आपण ज्या भागात वाढलो,घडलो त्याभागातील लोकांची सेवा करता यावी. असं त्यांना नेहमी वाटायचं.आपल्या परिसरातील रुग्णासाठी वेळ द्यावा.त्यांची सुख – दुःख जाणून घेवून त्यांच्याशी समरस व्हावे.त्यांचे कल्याण करावे.दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होवून त्यांचे जीवन प्रसन्न करणे, निरोगी करणे यापेक्षा कोणतेच मोठे कार्य असू शकत नाही याची जाणीव घेवून २००९ मध्ये उदगीर येथे महात्मा बसवेश्वर चॅरिटेबल हॉस्पिटलची सुरुवात केली. हे हॉस्पिटल आता १५ व्या वर्षात पदार्पण केले असून या हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी उल्लेखनीय सेवा दिली.अनेक रुग्णांना जगण्याचे बळ दिले.स्त्रियांना निरोगी बनविले,अनेकांना जीवदान दिले.अनेक स्त्रियांना मानसिक आधार दिला तर अनेक रोग पिढी जगण्याचे बळ दिले.डॉ.सोमवंशी यांनी रुग्णसेवेबरोबरच त्यांच्यासाठीच वेगवेगळ्या शिबिराचे आयोजन केले.या शिबिरातून अनेकांना जगण्याची ऊर्जा मिळाली. सर्वरोग निदान शिबिरामध्ये रोग्यांना बोलावून त्या रोगनिदानचे विशेष डॉक्टर बोलावून त्या रुग्णाचे रोगनिदान करून त्यांना जीवनात समाधान आणले.डॉ.सोमवंशी यांनी अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडल्या.त्यामुळे शस्त्रक्रियेच्या बाबतीत डॉ.सोमवंशी यांनी नेत्रदीपक लौकिक मिळवला.
डॉ.सोमवंशी यांनी वैद्यकिय सेवेबरोबरच सामाजिक कार्यातही सहभाग नोंदवला.अनेक कार्यक्रमास ते उपस्थिती लावतात.सामाजिक प्रबोधन करणारे कार्यक्रमास ते हजेरी लावून असे कार्यक्रम व्हावेत यासाठी ते अनेकांना प्रोत्साहित करतात.प्रसंगी सहकार्यही करतात. विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने संपर्कात आलेल्या लोकांना ते कार्य करण्यास प्रवृत्त करतात.माणसे जोडणे आणि ते जपणे ही त्यांची वैशिष्ट्ये. कामाच्या निमित्ताने त्यांच्याकडे आलेल्या व्यक्तींना ते आपल्या कामाच्या व्यापातूनही वेळ देत असतात.त्यामुळे त्यांच्याकडे विविध कामाच्या निमित्ताने लोक येत असतात. डॉ.सोमवंशी यांनी अनेकांना सहकार्य करून व्यवसायास लावले.अनेकांना स्वावलंबी बनविले. प्रत्येक क्षेत्रात आपली माणसे कार्यरत असावीत हा त्यांचा हेतू त्यामुळे त्यांच्या मार्गदर्शनाने अनेकजण वेगवेगळ्या क्षेत्रात स्थिरावली आहेत.वैद्यकीय व सामाजिक कार्यात सेवाभावी वृत्तीने कार्य करणाऱ्या डॉ.दीपक सोमवंशी यांचा आज वाढदिवस त्यानिमित्त त्यांना खूप खूप शुभेच्छा !

शंकर बोईनवाड पत्रकार,उदगीर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp