“शब्दसूर्य दाही दिशा चमकतो
अंधार अज्ञानाचा संपून जातो
मावळतीच्या मोडून खुणा तो
ज्ञानतेजाने उजळीत राहतो…”

प्रत्येक माणसाला आयुष्यात काही ऊर्जावान आणि उत्साही माणसं जगण्याला प्रेरणादायी असतात. आयुष्यामध्ये माणसं तर खूप भेटतात पण माणुसकीवान माणसं भेटायला खरंतर भाग्यच लागतं. मला तर वाटते ते आपल्या आयुष्याचं काहीतरी पुण्याच असावे लागते. आपल्या आयुष्याला चांगल्या सत्कार्याची जर जोड असेल तर आपोआप पुण्य पदरात पडते. काहीतरी चांगलं करण्यासाठी आपण पाऊलं टाकत असतो. तेंव्हा चांगले मार्ग आपल्याला सापडत असतात. तेच तर आपल्या कार्याची पुण्याई असते. अशाच पुण्याच्या पायरीवर काही देवरूप माणसे मला भेटली त्या यादीत ज्यांचं नाव सन्मानानं घ्यावे वाटते असे सन्माननीय जिल्हा न्यायाधीश आदरणीय श्री सुनील वेदपाठक साहेब होय. आदरणीय जिल्हा न्यायाधीश श्री सुनील वेदपाठक साहेबांचं व्यक्तिमत्व माझ्यासाठी अतिशय आदराचे, गौरवाचे, कौतुकाचे आणि सन्मानाचे आहे. काही माणसांचं जगणं समाजाच्या कल्याणाचं आणि हिताचं असतं. मोठी माणसं आपल्या व्यक्तिमत्त्वातील प्रत्येक कौशल्यातून समाजाचे हित पाहत असतात. अनेक आदर्श गुणांचे संपादन त्यांच्या व्यक्तिमत्त्वात पहावयास मिळते. ज्ञानाबरोबर अनेक कौशल्याची झालेली जोपासना त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सदोदित पहावयास मिळते. अशा आदरणीय व्यक्तिमत्वाच्या प्रेरणादायी परंपरेत सन्माननीय श्री वेदपाठक साहेब नाव आवडीने उच्चारावे वाटते. आदरणीय साहेबांचे मुळगाव बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेले राम वडगाव आहे. संपूर्ण ग्रामीण भागाचा वारसा लाभलेलं साहेबांचे व्यक्तिमत्व हे अतिशय संवेदनशील स्वभावाचे आणि सुंदर मनाचे आहे. संस्कारशील कुटुंबातच धार्मिक आणि अध्यात्मिक बाबीचे चारित्र्यशील संस्कार त्यांना त्यांच्या घरातच मिळाले. अंबाजोगाई सारख्या विद्यानगरीच्या शहरात बीकॉम झाल्यानंतर विधी शाखेची कायद्याची पदवी त्यांनी शिक्षण पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर सारख्या शहरातील नामांकीत अशा दयानंद विधी महाविद्यालयातून पदवी घेतली. १९९५ सली आदरणीय वेदपाठक साहेब न्यायाधीश म्हणून सातारा येथे रुजू झाले. माझी जन्मभूमी असलेल्या लातूर जिल्ह्यातील उदगीर आणि चाकूर तालुक्यात त्यांनी न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे. मी चाकूर तालुक्याचा असल्यामुळे चाकूर तालुक्यात सुरू झालेल्या पहिल्या न्यायालयाचे पहिले न्यायाधीश म्हणून नियुक्तीचा प्रथम सन्मान आदरणीय श्री सुनील वेदपाठक साहेबांना मिळाला. ही माझ्या दृष्टीने आणि माझ्या तालुक्यातील तमाम नागरिकाच्या दृष्टीने अतिशय सन्मानाची गोष्ट आहे. पुढे ते बुलढाणा जिल्ह्यात पदोन्नतीने रजू झाले. यानंतरच्या काळात कोपरगाव, उस्मानाबाद येथे न्यायाधीश म्हणून काम केल्यानंतर सातारा शहरात मुख्य न्यायदंडाधिकारी म्हणून त्यांची बदली झाली. यानंतर कोल्हापूर शहरात पुढे जिल्हा न्यायाधीश म्हणून नियुक्त झाले. यानंतर जिल्हा न्यायाधीश म्हणून मुंबई, जालना येथून गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून पुणे येथे जिल्हा न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. आणि याच ठिकाणी मी जिल्हा न्यायालयात कार्यरत असल्यामुळे आदरणीय साहेबांची एके दिवशी कार्यालयीन कामाच्या निमित्ताने ओळख झाली. त्या दिवशीचा संवाद हा एक अधिकारी आणि कर्मचारी इतकाच मर्यादित न राहता… आदरणीय साहेबांनी माझ्या जन्मभूमी ते माझ्या कौटुंबिक माहिती पर्यंतचा प्रवास स्वतः जातीने विचारून घेतला. आणि माझ्या तालुक्याचे नाव उच्चारल्या बरोबर मी तुमच्या तालुक्यात न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे… अशी प्रथम ओळख झाल्यानंतर पुढे काही भेटींच्या प्रसंगात त्यांच्या बहुआयामी, साहित्यिक, कलावंत व्यक्तिमत्त्वाची व सोज्वळ, सुंदर, सदाबहार, दिलदार स्वभावाची ओळख त्यानंतरच्या अनेक भेटीतून झाली. नंतर हे आदरणीय, असामान्य, सौंदर्यशील व्यक्तिमत्व खूप जवळून अनुभवता आले. म्हणून माझ्या आयुष्यात एक संवेदनशील मनाचा मौल्यवान माणूस आणि सृजनात्मक प्रतिभेने माणुसकीची महिमा शब्दा शब्दतून रेखाटणारे लालित्यप्रधान साहित्यिक कथाकार व मार्गदर्शक म्हणून लाभले हे मी माझं मोठं भाग्य समजतो.
आयुष्याला आनंदाने सारवून सुख शोधणारा मी समाधानी पामर आहे. माझ्या आयुष्यातील अनुभव भावनेला स्मरून जगाकडे सौंदर्यशील संदर्भाने पाहणारा मी आनंदयात्री साधा माणूस आहे. सुख दु:खरूप भावाअनुभवास शब्दांच्या शिल्पाने अर्थ कोरणारा सुखछंदमय शब्दपुजारी पाईक. अशा नागमोडी वाङ्मयीन आणि वास्तव जीवन वाटेवर प्रेरणादायी मार्गदर्शक मुक्तिदाता म्हणून सन्माननीय आदरणीय सुनील वेदपाठक साहेब लाभले हे माझ्यासाठी त्या विठेवरच्या सावळ्या श्रीपांडुरंग परमेश्वराच्या कृपेचा सक्षात प्रसादच होय.
खरं तर काही माणसं सुंदर असतात… काही माणसं ज्ञानी असतात…काही माणसं तत्वज्ञानी असतात… काही माणसं कौशल्यूक्त असतात…काहीच माणसं ‘माणसं’ असतात आणि खूप कमी माणसं ‘देव माणसं’ म्हणून भेटतात… अशी माणसं ज्ञानी, सुज्ञानी, तत्वज्ञानी, कौशल्ययुक्त आणि सृजनशील प्रतिभेची साहित्यिक कलावंत असतात…अशीच माणसं अंत:करणात आणि मनात कायम ‘प्रेरणावंत’ म्हणून स्थिरावतात. अशा देवरूप , माणुसकीवान माणसांच्या यादीत आदरणीय श्री वेदपाठक साहेबांचं नाव मी प्रथम क्रमांकाने घेतो. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात न्यायाचे न्यायी पुण्यसेवाकार्य , करत असताना माणुसकीचे सात्विक कार्य लेखनाच्या माध्यमातून अशाही धावपळीच्या जीवनप्रवासात माननीय महोदयांनी सातत्याने व जिवंतपणे चालू ठेवले आहे. ते एक दैदिप्यमान कौशल्याने संपादित आहेत. सुंदर हस्ताक्षर, सुंदर चित्रकला, माणुसकीच्या सौंदर्याचे विविधअंगी लेखन ही अलौकिक कौशल्य त्यांच्या व्यक्तिमत्वाबरोबर त्यांच्या आयुष्यालाही मोठं करणारी आहेत. याच कौशल्यात त्यांच्या हातून अनेक वर्षांपासून दररोज काढले जाणारे सुंदर असे ‘मयुर चित्र’ हे त्यांच्या असाधारण व अनन्यसाधारण प्रतिभेची सर्वश्रेष्ठ, सर्वोत्तम देणगी आहे. आपल्या देशाच्या राष्ट्रीय पक्षाचे दररोज कुंचल्यातून साकारणारे एकमेवाद्वितीय मोराचे दिन चित्र ,हे अर्थपूर्ण, मूल्यगर्भित व अनेक गुणवैशिष्ट्यांचा संकेत देणारे आहे. हे ‘मयूरचित्र’ त्यांच्या अंतःकरणाच्या सौंदर्याचे ‘शिल्पचित्र’ आहे. अंतर्मनातील सौंदर्याचा सात्विक भाव रोजच्या देखण्या मयूर चित्रातून साकारताना आम्ही रोजच पाहतो. त्यांचे हे चित्रकार्य सौंदर्यशील आनंदाचे आहे. या पुण्य कार्यातून ‘स्वतःला समाधान आणि जगाला सौंदर्यांनंद देणे’ हे आज सत्य समीकरण झाले आहे. माझ्याबरोबर जगालाही अप्रूप नवल असणारी ही कला अतिशय देखणी आहे. रोज काढल्या जाणाऱ्या मयुरचित्राकडे पाहताना माझं अंत:करण आनंदानं न्हाऊन निघतं. आनंदानं अंत:करण आकाश कवेत घ्यायला लागतं. ते त्यांच्या अंत:करणाचं सौंदर्यचित्र पहाणार्या हजारो अंत:करणारनाला आज सुखद सौंदर्याचा अप्रतिम अनुभव देत आहे. आदरणीय साहेबांचे मयूरचित्र हे मानवी कल्याणाच्या जीवनमूल्याची भाषा बोलणारे आहे. आदरणीय साहेबांनी या मयूर चित्रातून भारतीय सणांचा दिनविशेष आणि राष्ट्रीय उत्सवांचा संकेत रेखाटला आहे. हे मयूर चित्र कधी सर्वधर्मसमभावाचे गीत गाते…तर कधी संस्कृतीची मौलिकता रेखाटते,तर कधी अनुपम निसर्गसौंदर्याचा अनुभव देते,तर कधी राष्ट्रभक्तीचा सुर आळविते,तर कधी अध्यात्मिकतेचे भजन गाते,तर कधी ग्रंथाचे तत्वज्ञान सांगते,तर कधी विविधतेत एकतेचे सूत्र बांधते,सर कधी पंच महाभूताचे सत्य सांगते,तर कधी आयुष्याचा अर्थ आणि जीवन सार्थ करणारा परमार्थ सांगते….अशी नानाविध अर्थ देणारी ही मयूरचित्रे त्यांच्या कर्तव्यपरायण आयुष्याचे ‘आमरशिल्पचित्र’ आहेत. त्यांच्या या आत्मसौंदर्यंप्रधान कलेचं कौतुक करण्यास माझ्याकडे शब्द नाहीत. अशा एकमेवाद्वितीय, अनन्यसाधारण, असामान्य व्यक्तीमत्वास व त्यांच्या सौंदर्यश्रेष्ठी मयूरचित्र कलेला माझा मानाचा मुजरा आणि नमन्…
म्हणूनच सन्माननीय साहेब म्हणजे एक आगळं वेगळं सौंदर्यलक्षी व्यक्तिमत्व आहे. ते एका अधिकारी पदावर कार्यरत असतानाही आपल्या स्वभावाची सत्यशील सामाजिकता त्यांनी आपल्या लेखनातून आणि कार्यातून कायम तेवत ठेवली आहे. पवित्र अशा न्यायाच्या क्षेत्रात जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून प्रामाणिकपणे न्यायकार्य करताना आपल्या कार्यप्रती ते सदैव तत्पर असतात. एक वेगळे व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी अनेक आनंदी छंद जोपासले आहेत. त्यांचे अनेक प्रेरणादायी छंद हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला सौंदर्यशीलतेने श्रृंगारीत करत दररोज या आदरणीय अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाला महानतेचा आयाम बहाल करत आहेत. सन्माननीय साहेबांच्या साहित्यिक व्यक्तिमत्त्वाची ओळख ही ‘सिद्धहस्त’ कथालेखनाच्या माध्यमातून होते. माननीय साहेबांचे तीन कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. मी त्यांचा ”असं एकही अक्षर नाही…!” हा एक कथासंग्रह वाचला आहे. यानंतर “पांढऱ्या पोपटाचा बंदिवास” आणि “पहिला कोट” या कथासंग्राहातून मा.साहेबांनी आपल्या दैनंदिन अनुभवातील भावाशयातून कथा साकारल्या आहेत.कथेच्या माध्यमातून माणुसकीची सर्वश्रेष्ठ मूल्य पेरणारे सामाजिक जाणिवेचे कथाकार म्हणून त्यांच्या व्यक्तिमत्वाची दृढतेने ओळख वाचक रसिकांना होते. त्यांच्या सत्य, प्रामाणिक, सौंदर्ययुक्त, संवेदनशील मनाची आणि आपलेपणा, माणुसकी, जिव्हाळा, बंधुभाव, मातृप्रेम, कुटुंबप्रेम, समाजप्रेम, देशप्रेम, मानवता, संस्कारशिलता, दानशीलता, कृतज्ञता श्रमशिलता, अध्यात्मिकता, नैतिकता, ज्ञाननिष्ठा, लेखननिष्ठा, चित्रनिष्ठा, मित्रनिष्ठा, कार्यनिष्ठा,छंदनिष्ठा ही त्यांच्या अंत:करणाची जीवनमूल्य,साहित्यमूल्य व कलामूल्य अनन्यसाधारण व्यक्तिमत्त्वाच्या ठाई विराजमान आहेत. असं विलोभनीय व्यक्तिमत्त्व माझ्या आयुष्यात आल्यामुळे माझ्याही आयुष्याला आनंदाची, सुखाची, आणि मार्गदर्शक सौंदर्याची सुंदर व्यक्तिमत्वरुपी किनार मिळाली आहे. याहून भाग्य वेगळे काय असते?
म्हणून शेवटी असे म्हणावे वाटते की,
“माणुसकीच्या मनोर्यांनी उंच व्हावे
दिगंत आकाशालाही कवेत घ्यावे
प्रतिभेला सृजनाचे पंख येती तेव्हा
अमरपणाच्या तेजाने न्हावून निघावे”
आदरणीय साहेबांचा आज जन्मदिवस आहे. अशा सर्वगुणसंपन्न, प्रतिभासंपन्न, साहित्यिक, कलावंत, ज्ञानवंत, न्यायवंत सन्माननीय शुभंकर व्यक्तीमत्वाच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांना पुढील आनंदी, सुखी, समाधानी,आरोग्यदायी, दैदिप्यमान आयुष्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो.
शुभेच्छुक:-
श्री दत्तात्रय सुभाषराव जाधव,
जिल्हा न्यायालय, पुणे.
संपर्क क्रमांक:-९६८९२५०२५१.