देवणी (प्रतिनिधी):
लातूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची औपचारिक घोषणा होताच देवणी तालुक्यात राजकीय पट पुन्हा एकदा तापू लागला आहे. तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गट आणि सहा पंचायत समिती गणांवर निवडणुकीची चाहूल लागल्यापासून प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये सावध हालचाली व गुप्त बैठकींचा सिलसिला सुरू झाला आहे. अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्याने जिल्हा स्तरावर नव्या समीकरणांचा ताण निर्माण झाला आहे. त्याचबरोबर देवणी पंचायत समितीचे सभापती पद खुल्या प्रवर्गातील पुरुषांसाठी राखीव असल्याने स्थानिक राजकारणात नवा भूचाल निर्माण झाला आहे. तालुक्यातील दोन प्रमुख गट — वलांडी आणि बोरोळ गणांमध्ये सध्या सत्तेचा शतरंजाचा खेळ रंगताना दिसतोय. प्रत्येक गटातून अनेक इच्छुक उमेदवार आपापली पाळेमुळे मजबूत करत असून, स्थानिक जनतेचा कल कोणाकडे झुकतोय हे स्पष्टपणे सांगणे अद्याप लवकर आहे.राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, काही इच्छुकांनी आपला प्रचार सुरू केला आहे, तर काही अजूनही पक्षाचा हिरवा कंदील मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. काही ठिकाणी मात्र पक्षातीलच गटबाजी उफाळून आली असून, जुन्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल की बाहेरून आयात झालेल्या नेत्यांना प्राधान्य — हा प्रश्न कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा मुख्य विषय ठरला आहे.देवणी तालुक्यातील वातावरण सध्या शांत पण अस्वस्थ आहे. प्रत्येक ग्रामपंचायत, सामाजिक संघटना आणि शिक्षण संस्थांमध्ये राजकीय चर्चांचा जोर वाढला आहे. “कोण उमेदवार?” या एका प्रश्नावर संपूर्ण तालुका बोलतो आहे.सत्ताधारी पक्ष असो वा विरोधक, सर्वत्र इच्छुक उमेदवारांनी आपली तयारी सुरू केली असून, “मीच योग्य उमेदवार” या भावनेने पक्षीय शर्यत रंगत आहे. काही ठिकाणी तर कार्यकर्तेच म्हणताना दिसतात “राजकारणात लाट कोणाची हे सांगणे कठीण, पण वादळ नक्की देवणीहूनच उठणार आहे.”या निवडणुकीत मतदारांना पुन्हा एकदा स्थानिक विरुद्ध बाहेरील, अनुभवी विरुद्ध नवोदित असा सामना पाहायला मिळू शकतो. तालुक्याचे लक्ष सध्या वलांडी, बोरोळ आणि जवळगा या भागाकडे खिळले आहे.देवणी तालुक्यातील ही निवडणूक फक्त स्थानिक सत्तेसाठी नव्हे, तर तालुक्याच्या राजकीय दिशा ठरविणारी निर्णायक लढत ठरू शकते, असे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
दयानंद कांबळे नागराळकर…
7887827886



Leave a Reply