पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘इंडिया मेरीटाईम वीक 2025’ अंतर्गत आयोजित ‘मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्ह’ कार्यक्रम पार पडला.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, गेल्या 3 दिवसांपासून जे उत्तम मंथन आणि चिंतन याठिकाणी सुरू आहे, त्यामुळे देश आणि विश्वात मेरीटाईममध्ये होणारे बदल आणि त्याचे फायदे देशासह जगभरात पोहोचणार आहेत.
त्यासोबतच इंडिया मेरीटाईम वीक महाराष्ट्रासाठी विशेष फलदायी ठरले आहे. यावेळी कोट्यवधी रुपयांचे सामंजस्य करार केलेले आहेत, यात पोर्ट डेव्हलपमेंट, शिपयार्ड डेव्हलपमेंट, शिप बिल्डिंग, वॉटर ट्रान्सपोर्ट, क्लीन वेसेल्स इत्यादींचा समावेश आहे. सामरिक सामंजस्य करारदेखील पूर्ण केले आहेत, जेणेकरून मेरीटाईममध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मेरीटाईम व्हिजन साकार करण्यासाठी महाराष्ट्र अग्रेसर राहील, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेरीटाईम क्षेत्राला नवी दिशा दिली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र भारतात ‘पोर्ट लेड डेव्हलपमेंट’ होऊन भारताच्या सामुद्रिक शक्तीचा आविष्कार पाहायला मिळत असून जागतिक व्यापारात भारताची एक वेगळी भूमिकादेखील संपूर्ण जगाला पाहायला मिळत आहे, असे मत मांडून मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले.
महाराष्ट्र राज्य मेरीटाईम क्षेत्रात नवी ताकद बनत आहे. आज आपले ‘जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण‘ (JNPA) हे देशातील सगळ्यात मोठे कंटेनर ट्रॅफिक हँडल करणारे बंदर बनले आहे. वाढवण बंदर हे आपल्या प्रगतिशील कार्यामुळे जगातल्या टॉप 10 बंदरात समाविष्ट होणार असून, जगाला भारताची सामुद्रिक ताकद दिसून येईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल, केंद्रीय राज्यमंत्री शांतनू ठाकूर, केंद्रीय राज्यमंत्री कीर्ति वर्धन सिंह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.



Leave a Reply