“आर्थिक सशक्तीकरण अभियान” ला उत्स्फूर्त प्रतिसाद.

छत्रपती संभाजी नगर (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे नागसेन विद्यालय, उस्मानपुरा छत्रपती संभाजी नगर येथे आर्थिक सशक्तीकरण अभियानावर ५ नोव्हेंबर २०२५ ला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रसिद्ध उद्योगपती भगवान गवई म्हणाले की, स्वातंत्र्याच्या ७८ वर्षानंतर सुद्धा आपण अनेक क्षेत्रात सक्षम होऊ शकलेलो नाही. करिता सामाजिक, सांस्कृतिक, अर्थ व राजकीय क्षेत्रात सशक्तिकरण घडवून आणण्यासाठी ते समाज जीवनात पूर्णवेळ कार्यरत आहेत. ऐक्याने लढत असताना समाजाला पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली पाहिजे. आपण बहुसंख्यांक असताना सुद्धा आपले स्वतंत्र बँक नाही म्हणून लॉर्ड बुद्धा फायनान्स लिमिटेड ची उभारणी सुरू आहे. एन बी एफ सी सह प्रोग्रेसिव कौन्सिल ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ची निर्मिती करून बेरोजगारांना उद्योग धंद्याकडे वळविण्याचे प्रयत्न केले जाणार आहेत. ज्यातून आपण ही उद्योगपती होऊ शकतो असा विश्वास निर्माण केला जाईल.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या संचालिका सूर्यकांता गाडे मॅडम अध्यक्षीय मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, शाळा, महाविद्यालय, शिक्षण, आरक्षण, नोकऱ्या बंद पडत असताना शासनकर्ती जमात होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आर्थिक सशक्तीकरणाला आपण प्राधान्य दिले पाहिजे.
याप्रसंगी फुले आंबेडकराईट स्टडी फाउंडेशनचे संचालक बी. बी. मेश्राम म्हणाले की, समाजात पैशाची कमी नाही तर कमी आहे, ती दूरदृष्टीची! समाजात अनेकांनी अनेकांची फसवणूक केली असल्याने विश्वास कुणावर ठेवावा? हा समाजासमोर गहण प्रश्न आहे. म्हणून समाजासमोर कुठलीही योजना सादर करताना विश्वास संपादन करण्यासाठी इत्यंभूत माहिती दिली पाहिजे जेणेकरून लोक उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवतील. आपण व्यक्त केलेल्या सर्व बाबीचे आचरण करू शकलो तर जनतेचा निश्चित विश्वास बसेल आणि आपणास आर्थिक क्षेत्रात एनबीएफसी सह लार्ड बुद्धा फायनान्स लिमिटेड सारख्या बँकांची उभारणी करता येईल. ज्यामुळे आपले आदर्श महापुरुष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वात जास्त शिक्षण अर्थशास्त्रात घेतलेले असताना त्यांचे अनुयायी दारिद्र्यात का? हा कलंक पुसून काढता येईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रानडे, गांधी आणि जिना या चर्चेत म्हणाले होते की, आपण चालवत असलेल्या पक्ष, संघटना आणि संस्था आपल्या उत्कर्षासाठी सक्षम ठरत नसतील तर उपयोगात आणले जाणारे विचार, सवयी आणि मार्ग बदलले पाहिजेत. याचाच एक भाग म्हणून पर्यायी व्यवस्थेच्या अनुषंगाने भारतीय समाज संघाच्या माध्यमातून सध्या प्रयत्न केले जात आहेत. तरी जनतेने या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा जेणेकरून “अपना नोट – अपना विकास” और “अपना वोट – अपना राज” याप्रमाणे समाजाच्या अर्थबळावर समाजाच्या उत्कर्षासाठी कार्य करता येईल.
या प्रसंगी उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध उद्योगपती अ‍ॅड. ओमप्रकाश मौर्या व सामाजिक कार्यकर्ते साहेब सिंग धनगर भाई यांनी आर्थिक सशक्तिकरण व उद्योगधंद्यातील नव्या संधी यावर मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचे प्रास्ताविक प्राध्यापक विलास कटारे तर सूत्रसंचालन अ‍ॅड. विलास रामटेके यांनी केले. कार्यक्रमासाठी डॉ. व्ही एच कांबळे डॉ. यशवंत कांबळे, पत्रकार बाबा गाडे, शैलेंद्र मिसाळ, प्रा. विलास कटारे असे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

शब्दांकन : बी. बी. मेश्राम, संचालक : फुले आंबेडकराईट स्टडी फाउंडेशन, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र.
संपर्क : 9421678628, 8983082128.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp