
🪻 महात्मा ज्योतिबा फुले जयंती’🪻
(११ एप्रिल २०२५) *स्त्री शिक्षणाच्या पायाची मुहूर्तमेढ रोवणारे महान क्रांतीकारक आणि थोर विचारवंत, समाजातील अस्पृश्यता निवारण करण्यात मोलाची कामगिरी करणारे समाजसेवी महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज जयंती दिन..* *ज्योतीबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होय. याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी झाला. जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. शेवटच्या पेशव्यांच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोरे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले..* *वयाच्या १३ व्या वर्षी १८४०साली सावित्रीबाईं सोबत लग्नगाठ बांधली गेली. ज्योतिबा अत्यंत बुद्धीमान होते. त्यावेळेस महाराष्ट्रात धार्मिक सुधारणेची चळवळ जोर धरत होती. जातिव्यवस्थेला विरोध करण्यासाठी आणि एकेश्वरवादाची अंमलबजावणी करण्यासाठी 'प्रार्थना समाज' स्थापन करण्यात आला, ज्याचे प्रमुख होते गोविंद रानडे आणि रा.ग. भांडारकर.स्त्री 🙏🏻शिक्षणाबाबतही महाराष्ट्रात काहीशी उदासिनता पाहायला मिळत होती. मात्र महात्मा फुले यांनी एका स्त्रीचं शिक्षण म्हणजे अवघ्या कुटुंबाचं शिक्षण हे आधीच जाणलं होतं. त्यामुळे महात्मा फुले यांनी आधी सावित्रीबाई यांना शिक्षणाचे धडे दिले आणि मग स्त्रियांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. पुण्यातल्या भिडेवाडा इथे स्त्रियांचे वर्ग भरवण्यात येऊ लागले. त्यानंतर स्त्री शिक्षणाचं महत्व महाराष्ट्राला समजलं..* *महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत:-*
विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केलेल l *मानवी हक्कावर' इ.स.१७९१ मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक त्यांच्या वाचनात आले. त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला. सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. ‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती. मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व होते. मूलभूत मानवी हक्कांच्या आधारावरून विश्वकुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरिता कशा प्रकारचा वर्तनक्रम व वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे हे ज्योतीराव फुलेंनी आपल्या ' सार्वजनिक सत्यधर्म ' संहितेत वचनांच्या आधारे मांडली आहे..* *सत्यशोधक समाजाची स्थापना हे ज्योतिबा फुले यांच्या दूरदर्शी व्यक्तीमत्वाचा आणखी एक पैलू. समाजात पसरलेल्या जातीभेदाला दूर करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यात आली होती. 'शेतकऱ्यांचा आसूड' हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ. त्याकाळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले. १८८८ साली सामाजिक कार्याबद्दल त्यांना "महात्मा" ही पदवी प्रदान केली. तेव्हापासून ते महात्मा फुले याच नावानं ओळखले जाऊ लागले..* *इ.स.१८६९ साली महात्मा जोतीबा फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम प्रदीर्घ असा एक पोवाडा लिहिला. शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. त्यानंतर बाळ गंगाधर टिळकयांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकजूट करण्याचे काम केले. २०व्या शतकात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील शिवजयंती साजरी केली, ते दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी व्हायला लागली..* *महात्मा ज्योतीबा फुले यांनी वेळोवेळी जे विचार मांडले, मानवी जीवनाला दिशा देणारा जो उपदेश केला, त्यामुळे व त्यांच्या समतावादी दृष्टिकोनामुळे समाजाला एक नवी दिशा मिळाली. पुढे हा वारसा त्यांच्या अनुयायांनी चालू ठेवला; त्यामुळे सामाजिक समतेचा जागर कायम राहिला. महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त त्यांना विन्रम अभिवादन..!*
बि मिडिया माध्यम समुह
