हैदराबाद /प्रतिनिधी : ललितबाग, उप्पगुडा, पटेल नगर, हैदराबाद येथील चर्मकार समाजाच्या ज्येष्ठ महिला सामाजिक कार्यकर्त्या तुळसाबाई गणेश उदबाळे यांचे बुधवार दिनांक २९ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी नऊ वाजता दुःखद निधन झाले.
मागील कांही वर्षांपासून तुळसाबाई उदबाळे ह्या आजारी होत्या, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत होते. बुधवारी सकाळी त्यांची प्रकृती अचानक गंभीर झाली व त्यांची प्राणज्योत मालवली. बुधवारी सायंकाळी पाचनंतर त्यांच्या पार्थिवावर त्याच दिवशी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणात समाज बांधव उपस्थित होते.
तुळसाबाई उदबाळे ह्या अत्यंत मनमिळाऊ स्वभावाच्या व स्वाभिमानी बाण्याच्या होत्या. त्यांना सामाजिक कार्यात स्वारस्य होते. अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेच्या धडाडीच्या सक्रीय कार्यकर्त्या म्हणून त्यांनी तेलंगणामध्ये काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी हजारो महिला उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे गुरु रविदास जयंतीसाठी जात होत्या.
कालवश तुळसाबाई उदबाळे यांचे सुपुत्र मोहन गणेश उदबाळे हे देखिल अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्रात त्यांचा जनसंपर्क आहे.
अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी तुळसाबाई गणेश उदबाळे यांच्या आकस्मिक दुःखद निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून संघटनेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
