मराठवाड्याला आधी मुख्यमंत्र्यांनी ठोस मदत द्यावी !

गतवर्षीच्या प्रचंड नुकसानी नंतर मा.मुख्यमंत्री व राज्य मंत्रीमंडळातील अनेक मंत्री महोदयांनी पाहणी दौरे केले व अनेक आश्वासने दिली. खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिलेले शब्द फोल ठरल्यामुळे आता दौरा करण्याआधी बाधित शेतकऱ्यांना व इतर नागरिकांना प्रत्यक्षात ठोस मदत मिळावी ही जनभावना आहे.

खरीप २०२० मध्ये अवकाळी पाऊस व अतिवृष्टीने सोयाबीनसह इतर पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. पाहणीसाठी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर मुख्यमंत्री ना.उध्दवजी ठाकरे यांनी ‘शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, तर भरीव मदत करु’ असे आश्वासन दिले होते. परंतु शासनाच्या माध्यमातून स्थायी आदेशाप्रमाणे नाम मात्र अनुदान देण्यात आले, तर हक्काच्या पिक विम्या पासुन ९०% म्हणजे जवळपास शेतकरी २०२० च्या खरिपाच्या विम्यापासून आजही वंचित आहेत. ‘मी पॅकेज देणारा मुख्यमंत्री नाही, तर मदत देणारा मुख्यमंत्री आहे’ असे वक्तव्य देखील त्यांनी केले होते. परंतू मराठवाड्याच्या बाबतीत मात्र हा प्रत्यय येत नाही. मदतीच्या बाबतीत प्रत्यक्षात काहीच घडले नाही, म्हणून येथील जनतेचा प्रचंड क्षोभ आहे, त्यामुळे २०२० च्या खरीप विम्याबाबत ठोस निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करावेत अशी मागणी जनसामान्यातून होत आहे.

२०२१ च्या खरीपचा पीक विम्याचे अग्रिमचे आदेश होऊन देखील आजवर शेतकऱ्यांना रुपयाही मिळालेला नाही. गतवर्षी अतिवृष्टी व पुरामुळे नादुरुस्त झालेले अनेक रस्ते व पूल जैसेथेच आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी केवळ ओल्या दुष्काळाचे पर्यटन न करता प्रत्यक्षात ठोस मदत बाधितांच्या खात्यावर तातडीने जमा करावी. ज्यांच्या घरात पाणी शिरले होते, त्या बाधित कुटुंबाना ‘खावटी’ अनुदान रु. १०,००० तातडीने द्यावे. तसेच शेतकऱ्यांना माननीय उद्धवजीं ठाकरे साहेबांनी २०१९ साली स्वतः केलेल्या मागणी प्रमाणे कोरडवाहू साठी हेक्टरी रु. २५,००० व बागायतीसाठी हेक्टरी रु. ५०,००० अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे. इतर नुकसानीच्या अनुषंगाने कोकणात व पश्चिम महाराष्ट्रात जो न्याय केला तोच मराठवाड्याला देखील करावा. एक हेक्टर पर्यंतचे कर्ज पूर्णतः माफ करण्याची बाब यातच मोडते.

विशेषता आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये हदगाव,हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीच्या तीरावरील गावांमध्ये इसापूर धरणाच्या प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे नदीला मोठा पूर येऊन नदीकाठच्या गावातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे,परतीच्या मुसळधार पावसामुळे कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी तात्काळ आर्थिक मदत करून शेतकर्‍यांना दिलासा देण्याचे काम करावे येणाऱ्या सणासुदीच्या दिवसांमध्ये शेतकऱ्यांना चांगले दिवस यायचे असले तर राज्य सरकारने तात्काळ आर्थिक मदत करावी..

भागवत देवसरकर
प्रदेशाध्यक्ष
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील
कृषी परिषद महाराष्ट्र राज्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp