स्वतंत्र भारताचे स्वप्न पहात लोककल्याणकारी योजना राबवणारा एकमेव राजा , सामाजिक, वैचारिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत दूरदृष्टीने लक्षणीय कार्य करत अनेक महापुरुषांनां मदत करून त्यांचे पाठीराखे बनलेले महाराजा सयाजीराव गायकवाड हे एकमेव युगदृष्टे लोककल्याणकारी युगपुरुष होते. असे विचार अभ्यासू आणि परखड वक्ते डॉ. हंसराज भोसले यांनी व्यक्त केले.
सेवानिवृत्त ब्रिगेडीयर बाबुराव सोमवंशी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या चला कवितेच्या बनात या उपक्रमाअंतर्गत वाचक संवादाचे २५१ वे पुष्प महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा येथील प्रा.डॉ.हंसराज दत्तात्रय भोसले यांनी बाबा भांड संपादित महाराज सयाजीराव:गौरव गाथा युगपुरूषाची या साहित्य कृतीवर संवाद साधून गुंफले. पुढे बोलताना डॉ. हंसराज भोसले म्हणाले, शेती, न्याय,चरित्र, शिक्षण, सामाजिक सुधारणा, ग्रंथ,कला,सहकार, स्वातंत्र्य, अस्पृश्योध्दार ,युगदृष्टा, आंतरराष्ट्रीय शतपावली, कायदे आणि परिशिष्टे अशा एकूण सोळा विभागात विभागलेल्या या ग्रंथातील सयाजीराव गायकवाड यांच्या कार्य कर्तृत्वाच्या सर्व पैलूवर प्रकाश टाकताना सयाजीराव महाराजांचे व्यक्तिमत्व येणाऱ्या काळात जगाला प्रेरणा दायी व्यक्तिमत्व ठरेल, एक तत्वज्ञ,विचारवंत, समाजसुधारक, उत्कृष्ट प्रशासक आणि प्रजेचे नुसते पालन पोषण करणे हेच राजाचे कर्तव्य नसते, तर प्रजेला ज्ञानी बनवने हे ही राजाचे कर्तव्य मानणारा राजा म्हणून महाराजांनी केलेल्या कार्याचा आदर्श समाजाला नक्कीच दिशा देणारा असेल, असे सांगत अनेक उदाहरणासह त्यांचे संपूर्ण चरित्र उभे केले.
आजच्या पिढीत वाचन संस्काराची रुजवणूक व्हावी व अमर्याद ज्ञान मर्यादित वेळेत प्राप्तीसाठी अविरतपणे वाचक संवाद चालू असून याच मालिकेतील २५१ व्या पुष्पात युगपुरुष सयाजीराव गायकवाड यांना समजून घेतले. यावेळी झालेल्या चर्चेत रामभाऊ जाधव यांचेसह अनेकांनी सहभाग नोंदवला. यानंतर ओमप्रकाश सूर्यवंशी, कु.दिपाली म्हेत्रे,कचरूलाल मुंदडा, कु.आराध्या तांदळे, कांता कलबुर्गे यांचेसह उपस्थितांना जन्मदिनाची ग्रंथ भेट देण्यात आली तर मान्यवरांचा सन्मान चिन्ह,आभार पत्र आणि ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला. अध्यक्षीय समारोपात बाबुराव सोमवंशी म्हणाले, स्वहितापेक्षा समाजहित जोपासणारेच खरे समाजसेवक अतात. शासकीय दूध डेअरीच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप ढगे यांनी केले, पाहुण्यांचा परिचय प्रा.नारायण घटकार तर आभार अंकुश हुंडेकर यांनी मानले. यशस्वीततेसाठी प्रा.राजपाल पाटील,मुरलीधर जाधव आणि अनंत कदम यांनी प्रयत्न केले.