
लाकडं कमी पडतील सांभाळून वापरा….
व्यवस्थेने इथल्या गरीब माणसाचे जगणं नाही तर मरण देखील मुश्किल केले आहे. मन सुन्न करणारी गुंज येथील विहिरीत पडून मृत्यू झालेल्या महिलांची घटना आहे. पोटाची खळगी व गरिबीतील आपला संसाराचा गाडा या भयाण परिस्थीत पुढे नेण्यासाठी एकाच दिवसात डब्बल रोजगार मिळावा दुपार पर्यंत एका ठिकाणी आणि दुपारनंतर दुसऱ्या शेतात यासाठी सकाळी सहा वाजता अन्न पाण्यावाचून घर सोडणाऱ्या ह्या भगिनी. मजूर महिला दुपार पर्यंत काम करणार असल्याने वेळ भरली पाहिजे, आपले काम जास्त झाले पाहिजे ह्यासाठी वेळेत ह्यांना शेतावर सोडण्यासाठी कुठल्याही काळजी व दक्षेतेशिवाय शेततमालकाने पाठवलेल्या टॅक्टर असा पोराच्या हातात दिला ज्याने निष्काळजी केली आणि तब्बल सात जणींचा जीव गेला. ज्यांच्या पाठीमागे उरले निरागस लहान लेकरं आणि उजाडलेली घरे, उध्वस्त संसार आणि धाय मोकलून रडणारी असहाय्य नातलग. कोणाची आई , कोणाची बहीण, कोणाची मुलगी या घटनेत गतप्राण झाली.
हृदय पिळवटून टाकणाऱ्या किंचाळ्या , रडण्याचा हंबरडा . मह्या आईला उठवा हो म्हणून गयावया करणारी लेक…
याची आई गेली आता या माझ्या लहान मुलाला दूध कोण पाजवेल हो म्हणून वर्ष दोन वर्षाच बाळ हतात घेऊन धाय मोकलून रडणारा बाप…. एक ना अनेक केविलवाण्या आरोळ्या.. खरच गरीब माणसाच्या मरणाचं दुःख कोणाला आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उभा राहतो. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेलं गुंज ही गाव चांगली मातंग वस्ती असलेलं परंतु विकासापासून कोसो दूर, १९८३ च्या दरम्यान गाव सोडून माळावर विसावलेल्या झोपड्या. ज्यांची नोंद ग्रामपंचायतीच्या आठच्या उताऱ्यावर देखील नाही. देशासाठी आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी व्यवस्था परिवर्तनासाठी पुकारलेल्या लढ्यात समर्थन आणि समर्पण देणाऱ्या क्रांतिपिता लहुजी साळवे यांचे नावाने म्हणजे लहुजी नगर या नावाने वसलेल्या स्वतंत्र भारतातील या वस्तीत सात मुडदे पडले असतांही मृत्यू पावलेले व्यक्तीचे तोंड पाहण्यासाठी उजेड नाही. एक दिवा जिथे घोळक्याने माणसं थांबलेली बाकी व्यवस्थेच्या अंधारात सर्वत्र काळाकुट्ट अंधाराचे साम्राज्य पसरलेलं..
विहिरतील मृतदेह वर काढून सोपस्कार पूर्ण करून यांचा मेल्यानंतर ताण नको म्हणून दुपारपर्यंत बसलेल्या लोकप्रतिंधिनी घर जवळ केले. सकाळी शव विच्छेदन करून रात्री जाणीवपूर्वक उशिरा म्हणजे सांजवेळेला पोलिसांच्या गराड्यात हे मृत देह गावात आणले. मुख्यमंत्री यांनी दिलेले तुटपुंजी मदत त्यात प्रधान मंत्र्यांकडून औपचारिकता. बाकी या मेलेल्या जिवांप्रति कुठली आली कोणाची संवेदना …
ज्यांना दुःख आहे अशी काही माणसं, माणसं गेल्याचं दुःख आणि वेदना घेऊन झगडत असतात या गरीब जीवासाठी त्यांनी केला काही वेळ कांगावा.
ते लढू लागले हिमतीने परंतु व्यवस्था लई माजोरी, मुजोर आणि कपटी त्यांनी लढणाऱ्यांचे मनसुबे गाडली काहीना हाताशी धरून. लहू, फुले, शाहू, अण्णाभाऊ आणि शिवराय ह्यांच्या कर्मभूमीत माणुसकी टाकली पुरून…
उरला तो असाच अनेक निरागस गरीब जीवांचा गगनभेदी आक्रोश, रडण्याच्या काळिज चिरणाऱ्या हाका, आरोळ्या आणि यात मधेच जाळण्यासाठी लाकडासाठीही संघर्ष करणारा आवाज “लाकडं जरा सांभाळून वापरा आणखी एक बॉडी येणार आहे…”
थोड्या वेळापूर्वी आलो घरी मात्र झोप उडाली आहे. …
व्यवस्थेच्या अनेक बळी पैकी या घटनेत मृत्यू पावलेल्या गरीब जीवांना
जड अंतःकरणाने श्रदांजली….
-एम.एम.सुरनर
गंगाखेड