वाचन संस्कृती जोपासणारा वाचक संवाद __ ब्रिजलाल कदम, लातूर. 75 88 61 15 54
उदगीर : सामाजिक कार्याचा वसा घेऊन कार्य करणारी माणसं थोडीच असतात, जी असतात ती ध्येयवेडी बनुन राष्ट्रहिताच्या कार्यात स्वतःला वाहून घेतात. असाच एक ध्येयवेडा माणूस शिक्षण क्षेत्रातील ज्ञानदानाच्या पवित्र कामात शिक्षक म्हणून सेवारत असलेले अनंत चंपाई माधव कदम होळसमुद्रकर यांनी उदगीरच्या भूमित चला कवितेच्या बनात ही साहित्यिक सामाजिक व शैक्षणिक चळवळ चालवत आहे. वाचते व्हाव , लिहिते व्हा. हा संदेश घेऊन लहानापासून ते थोरांपर्यंत सर्वांनाच या चळवळीच्या माध्यमातून व्यासपीठ निर्माण करून देत आहे. अमर्याद ज्ञान मर्यादित वेळेत मिळवण्यासाठी व वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी काही ज्ञानवंत आणि विचारवंत साहित्यिक तज्ञ व अभ्यासू वक्त्यांचा विविध साहित्यकृतीवर संवाद घडवून आणण्यासाठी चा उपक्रम म्हणजे वाचक संवाद हे विचारपीठ सुरू केले. या वाचक संवाद कार्यक्रमातून संवादक आपल्या आवडीच्या साहित्यकृतीवर संवाद साधत असतात. असा हा आगळावेगळा उपक्रम राबविणारा अवलिया स्वखर्चातून हे सर्व करत असतो. संवादकला बोलावण्यासाठी प्रवृत्त करणे आणि लोकांना ऐकण्यासाठी प्रवृत्त करून वाचन संस्कृतीचा विकास साधण्याकडे त्यांची सातत्याने दृष्टी असते.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या सोमवारी वाचक संवाद उपक्रमाचे आयोजन केले जाते. जुलै 2011 पासून अखंडपणे 250 वाचक संवादाचे यशस्वी आयोजन अनंत कदम यांनी केले आहेत. प्रत्येक वेळी वेगळ्या साहित्यकृतीवर बोलण्यासाठी नव्या संवादकाची ते भेट घडवून आणतात. सर्वच स्तरातील विषय या वाचक संवादातून घेतले जातात. महाराष्ट्रासह अन्य राज्यातील मान्यवर साहित्यिकांचे विचार ऐकण्यासाठी ची संधी या वाचक संवादाच्या माध्यमातून वाचकांना लाभलेली आहे. मराठी भाषेच्या बरोबरच इतर भाषेतून संवाद साधण्याची किमया कदमांनी केलेली आहे. एखाद्या विशेष दिनानिमित्त ते विशेष वाचक संवादाचे आयोजन देखील करतात. या कार्यक्रमातून अनेक नवोदितांना संवादाची, सुत्रसंचलन व आभार आणि परिचय-प्रास्ताविकाची संधी देऊन बोलते करण्याचा प्रयत्न अत्यंत प्रशंसनीय असून अनंत कदम हे सतत वेळेला महत्त्व देऊन श्रोत्यांचे प्रश्न व संवादकांचे उत्तर अशा दुहेरी संवादाची मजा ते वाचकांना देऊन तृप्त करतात.
या वाचक संवादात विविध क्षेत्रातील अनेक तज्ञ वक्त्यांचा आणि श्रोत्यांचा सहभाग असल्याने या उपक्रमाची उंची सातत्याने वाढलेलीच दिसते. या कार्यक्रमात संवादकांना स्मृतिचिन्ह आभारपत्र व ग्रंथ भेट देऊन सन्मान केला जातो तर उपस्थित श्रोत्यांना त्यांच्या जन्मदिनाची ग्रंथ भेट देखील दिली जाते आणि त्यांचा गौरव केला जातो. आज पर्यंत त्यांनी दीड हजारावर ग्रंथ अशा पद्धतीने भेट दिलेले आहेत. कार्यक्रमाचे फोटो, बातम्या व व्हिडिओ संवादाला वेळोवेळी पाठवण्यास आणि स्वतः संग्रहित करायला ते विसरत नाहीत. आजवरच्या बर्याच कार्यक्रमांचे व्हिडिओज वाचक संवाद या नावाने युट्युब वर उपलब्ध करून दिले आहेत.
चला कवितेच्या बनात या चळवळी अंतर्गत वाचक संवादात बरोबरच अनंत कदम हे अनेक उपक्रम राबवत असतात. स्वलिखित अथवा वाचलेल्या व आवडलेल्या कुठल्याही साहित्यकृतीवर संवाद साधावयाचा असतो. असे आज पर्यंत अडीच से वाचक संवाद पूर्ण होत असून 250 व्या उपक्रमाच्या निमित्ताने मला हा लेख लिहिण्याचा मोह आवरता आला नाही आणि आज सोमवार दिनांक 4 ऑक्टोबर 2021 रोजी उदगीर येथील शासकीय दूध डेरी च्या सभाग्रहात हा 250 वा वाचक संवाद स्वा.रा.ति.म.वि. नांदेडचे उपकुलसचिव माननीय डॉक्टर श्रीकांत अंधारे यांच्या संवादाने संपन्न होत आहे यासाठी मनोमन शुभेच्छा!.
या चळवळीच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय साहित्य साधना पुरस्कार दिला जातो.आजवर अनेक लेखकांना या पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. ग्रंथ चळवळीत कार्य करणाऱ्या उत्कृष्ट ग्रंथपालांना देखील राज्यस्तरीय पुस्तक मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. आजपर्यंत अनेक ग्रंथपालांना हा पुरस्कार दिलेला आहे. उदगीरचा नावलौकिक वाढविण्यासाठी योगदान देणाऱ्या कार्यकर्त्यास दरवर्षी उदगीर भूषण हा सन्मान देऊन त्याचा सत्कार केला जातो. शिक्षक, विद्यार्थी व साहित्यिकांसाठी कार्यशाळेचे ही आयोजन या चळवळीच्या माध्यमातून केले जाते. एवढेच नव्हे तर कविसंमेलन, कथाकथन आणि व्याख्यानाचे आयोजन देखील या चळवळीच्या माध्यमातून केले जाते. चळवळीच्या माध्यमातून अनंत कदम यांनी दीडशेपेक्षा जास्त पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन स्वखर्चातून केलेले आहेत. नवोदित लेखकांना अशा प्रकारे प्रेरणा देण्याचे काम कदम हे नेहमीच करत असतात. विद्यार्थ्यांसाठी मी विद्यार्थी हा उपक्रम देखील ते राबवित आहेत. महिला मेळाव्याचे आयोजन करून तेथे मार्गदर्शन करणे, त्यांचे प्रबोधन करणे , अंधश्रद्धा निर्मूलनासाठी प्रबोधनाचे कार्यक्रम घेणे यातून वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याचा आणि समाजाच्या वृद्धीसाठी चे योगदान देण्याचा सरांचा सातत्याने प्रयत्न असतो. विविध क्षेत्रातील मान्यवर व यशवंत व्यक्तींच्या प्रोत्साहनासाठी प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन देखील या चळवळीच्या माध्यमातून केले जाते. जागतिक योग दिनानिमित्त तसेच जागतिक महिला दिनानिमित्त युवती व्याख्यानमाला याचेदेखील वैचारिक आयोजन या चळवळीच्या माध्यमातून केले जाते.
अनंत कदम सर या चळवळीच्या माध्यमातून करत आलेले मोलाचे कार्य आणि त्यांचा हा ज्ञानयज्ञ सातत्याने चालू आहे. उदगीरला डॉ. ना.य.डोळे सर, नरले सर, होळीकर सर , अशा सामाजिक व शिक्षण क्षेत्रातील योगदान देणाऱ्या थोर व्यक्तींची परंपरा आहे. ही परंपरा जोपासण्यासाठी उदगीरच्या भूमिपुत्रांच्या साहित्य संपदेचे प्रदर्शन भरवून नवोदित साहित्यिकांना प्रेरणा देण्याचे कामही या चळवळीच्या माध्यमातून अनंत कदम हे करत असतात. मात्तृ दिन, कृषी दिन, शिक्षक दिन ,अभियंता दिन, डॉक्टरदिन अशा विशेष दिनाच्या निमित्ताने कदम हे उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या कर्तृत्वाच्या ठिकाणी जाऊन त्यांचा सन्मान चळवळीच्या माध्यमातून ते सातत्याने करत असतात. पुस्तक जत्रा पुस्तक, प्रदर्शन ,जलसंवर्धन ,,बेटी बचाव स्वच्छ भारत अभियान, बालवाचक संवाद ,विचारवंतांच्या प्रकट मुलाखती, ग्रंथ भेट घेऊन सत्कार, साहित्यिक आपल्या भेटीला असे एक ना अनेक उपक्रम या चळवळीच्या माध्यमातून राबविण्यात येत असतात.
अशी अनोखी चळवळ राबविणारे अनंत कदम हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हालसी तुगाव तालुका निलंगा जिल्हा लातूर येथे सहशिक्षक पदावर कार्यरत असून त्यांच्या अनेक साहित्यकृती प्रकाशित असून ते अनेक संमेलनाचे अध्यक्षपद हे देखील भूषवलेले आहेत . मान्यवर वक्ता म्हणून अनेक कार्यक्रमातून त्यांनी हजेरी देखील लावलेली आहे. त्यांचे अनेक लेख व कविता विविध दैनिकातून व विशेष अंकातून प्रकाशित झालेली आहेत . त्यांनी आकाशवाणीच्या परभणी केंद्रावरून अनेक कार्यक्रमातून कथा व कविता देखील सादर केलेल्या आहेत. तसेच साम टीव्हीवरील विद्यार्थ्यांसाठीचया एका लाईव्ह कार्यक्रमात शिक्षण तज्ञ म्हणून यांचा सहभाग राहिलेला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घुमान पंजाब येथे ते निमंत्रित कवी म्हणून सन्मानित आहेत. असे उपक्रमशील शिक्षक उदगीर येथील चला कवितेच्या बनात या साहित्यिक सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या वाचक संवादाचे मुख्य संयोजक आहेत. त्यांच्या अथक परिश्रमातून 250 वा वाचक संवाद आज उदगीर येथे संपन्न होत आहे.
अविरतपणे आणि अत्यंत वेळेचे काटेकोर बंधन पाळत चालू असलेल्या या वाचक संवादमध्ये प्रा. शेषराव मोरे, श्रीपाल सबनीस ,डॉ.खासदार जनार्दन वाघमारे, डॉ. नागोराव कुंभार, रा रं बोराडे ,डॉ. सदानंद मोरे, विद्याधर कांदे पाटील, कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर , साम टीव्ही चे संचालक संजय आवटे ,शिक्षण उपसंचालक सुधाकर तेलंग, साधनाचे संपादक विनोद शिरसाठ,श्रीकांत देशमुख, दै.केशरीचे संपादक स्वप्नील पोरे, डॉ. सुधाकर देशमुख , प्रा. राजशेखर सोलापुरे अशा स्थानिकां बरोबरच बाहेर राज्यातील डॉ. भालचंद्र शिंदे गुलबर्गा, इंजिनीयर हरिहरराव जाधव भालकी , विमल गुप्ता कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आंध्रा ,राजस्थान ,दिल्ली ,जम्मू काश्मीर शिवाय यमन या बाहेर देशातील अशा अनेक भागातून आलेल्या तज्ञ संवादकानी या विचार मंचावरती आपल्या आवडीच्या पुस्तकावर संवाद साधलेला आहे. यापैकी समिधा, फकीरा, भारतीय तत्वज्ञान, अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर, ग्रामगीता ,संत तुकारामांची गाथा, ज्ञानेश्वरी ,भारतीय संस्कृती, शिक्षण विचार ,मृत्युंजय, पाचोळा, एक होता कार्वर , श्रीमान योगी , सम्राट शिवाजी, अशा अनेक प्रसिद्ध साहित्यकृतीवर संवाद साधला गेलेला आहे.
आज महिन्याचा पहिला सोमवार 4 ऑक्टोबर रोजी चला कवितेच्या बनात या चळवळी अंतर्गत अखंडितपणे आणि वेळेचे तंतोतंत पालन करणाऱ्या वाचक संवादाचा 250 वा भाग उदगीर येथील शासकीय दूध डेरी च्या सभाग्रह संपन्न होतोय यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील उपकुलसचिव डॉक्टर श्रीकांत अंधारे हे बाळशास्त्री हरदास लिखित आर्य चाणक्य या साहित्यकृतीवर संवाद साधत आहेत. या कार्यक्रमास माझ्या या शब्दरूपी सुमनाने मी शुभेच्छा देतोय आणि प्रत्येकाने हा कार्यक्रम ऐकावा, या कार्यक्रमाचा घटक बनवावा, या कार्यक्रमातून काहीतरी प्रेरणा घेता येतात यासाठी ही वाचन संस्कृती जोपासणारी चळवळ जागी ठेवण्यासाठी आपण सर्वांनी योगदान द्यावा आणि हा ज्ञानदानाचा यज्ञ असाच अविरतपणे चालू राहावा याच शुभेच्छा!.