खरंच वाचलाच पाहिजे असा लेख..
मीपणा अंगात आल्यानंतर आय.सी.यु. ची रूम बघावी आणि विचार करावा..
जगात सर्वात सुंदर जागा जर कोणती असेल तर ती म्हणजे आय.सी.यु. !!
दोन व्यक्तींमध्ये भेद निर्माण करणारी कोणतीच रेषा इथे नसते. तुमचा धर्म,जात,वर्ण, श्रीमंत,गरीब….. एवढंच नाही तर स्त्री-पुरुष हा भेद ही इथं नसतो !!
तो काचेचा दरवाजा ओलांडून आय.सी.यु. मध्ये आलात की सगळे भेद जिथे चपला सोडता तिथेच गळून पडतात… आत जाते ते फक्त मानवाचे शरीर …!!!
आयुष्याचा अर्थ उलगडून सांगणारी लाखो पुस्तकं, ग्रंथ असतील किंवा जगावं कसं हे शिकवणारे असंख्य गुरू सुध्दा असतील… पण जो अर्थ, जे तत्वज्ञान इथं आय.सी.यु. मध्ये मिळतं…. ते कुठेच वाचायला मिळत नाही !! आयुष्याचा खरा अर्थ येथेच कळतो !!
म्हणूनच ही जागा खरोखरच फार सुंदर आहे….
एखाद्या घरात भुताटकी असते, कोणीतरी कधीतरी तिथं मेलेलं असतं, लोकांना तिथे भीती वाटते. कुठेतरी रस्त्यावर, मोठ्या झाडाखाली अशाच अफवा असतात, भीती असते. पण इथं… इथं आय.सी.यु. च्या एकेका बेडवर आजवर शंभर, दोनशे… असंख्य लोक मेलेले असतात !! कसली भीती नाही, काही अफवा नाहीत. माणूस गेला, बेडशीट बदललं, दुसरा माणूस आला… एवढं सोप्पं असतंय इथं !!
हिंदू,ख्रिश्चन,बौद्ध… आस्तिक, नास्तिक जे कोणी असतील त्या सगळ्यांच्या फुफ्फुसात एकाच मशिनमधून ऑक्सिजन जातो….
आपण बाहेर बारीक सारीक गोष्टींचा विचार करत असतो. कोणाला काय वाटेल या विचारात असतो. कपडे कसे आहेत, लोक हसतील का माझ्या अवताराला, बोलण्याला, भाषेला… इथं बेडवर त्या कोणत्याच गोष्टीला किंमत नसते. पुरुष असो की स्त्री… लाज वगैरे गोष्टींना तिथं किंमत शून्य असते!
वेळेची खरी किंमतही सर्वात जास्त इथेच कळते. जेव्हा आपल्याला कळतं की आपली व्यक्ती आपल्याला सोडून जाणार आहे तेव्हा एकच गोष्ट डोक्यात असते… फक्त आणखी एक दिवस, एक तास, अजून पाच मिनिटं मिळावी…
बाहेरच्या जगात आपण असंख्य अपेक्षा घेऊन जगत असतो. लोक स्वत: कडून, इतरांकडून… अपेक्षांचा डोंगर घेऊन चालत असतात. घर, गाडी, शिक्षण, नोकरी, प्रेम, व्यवसाय, नातेवाईक, पैसा… असंख्य अपेक्षा!
तिथे फक्त एकच अपेक्षा असते… अजून एकदा…. फक्त एकदा… डोळे उघडावेत…. !!!!
आयुष्यात कधी वाटलंच की मी फार मोठा आहे तर अशा ठिकाणी जाऊन यायचं… घमंड उतरतो!
कधी वाटलंच की, माझ्याकडे काहीच नाही, सगळं संपलं आहे… तेव्हाही जायचं… आपल्याला कळतं की आपल्याकडे काय आहे!
देवाने माणूस निर्माण करतेवेळी जो उद्देश समोर ठेवला असेल त्या स्वरूपातील ‘ माणूस ‘ मला तिथे दिसतो… अर्थात्…
I See You
म्हणूनच ही जागा जगात सर्वात सुंदर आहे!
सर्व धर्म , जात , भाषा , प्रांत व लिंग ह्यातील भेद नष्ट करणारे ICU ..