
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. शनिवारी सकाळी आठ वाजता राज्यातील 288 मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
सुरुवातीच्या काही तासांमध्ये मतमोजणीचे कल काय येणार, यावर निकालाची दिशा ठरेल. त्यामुळे सुरुवातीच्या दोन तासांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीपैकी कोण सरस ठरणार, याचा अंदाज येऊ शकतो. सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरुवात झाल्यानंतर सर्वप्रथम पोस्टल बॅलेटसद्वारे आलेल्या मतांची मोजणी सुरु करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात पोस्टल मते निर्णायक ठरली होती. या मतदारसंघात पोस्टल मतांमुळे ठाकरे गटाच्या अमोल कीर्तिकर अवघ्या 48 मतांनी पराभूत झाले होते. त्यामुळे पोस्टल मते महत्त्वाची मानली जात आहेत. उत्तर सोलापूर मतदारसंघात सर्वप्रथम बॅलेट मतांच्या मोजणीला सुरुवात झाली.
पोस्टल मतांच्या मोजणीचा पहिला कल भाजपच्या बाजूने गेल्याचे समजते. त्यामुळे महायुतीचे खाते उघडले आहे. पोस्टल मतांच्या मोजणीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात चुरस दिसत आहे. काँग्रेस आणि भाजपने पोस्टल मतमोजणीत आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता ट्रेंड कायम राहणार का, हे बघावे लागेल. पोस्टल मतांची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएम यंत्रांमधील मते मोजण्यास सुरुवात होईल. तेव्हा निकालाचे खरे कल समोर येण्यास सुरुवात होईल. मविआने आतापर्यंत दोन जागांवर आघाडी घेतली आहे. तर महायुतीही दोन जागांवर आघाडीवर आहे.
सुरुवातीच्या कलानुसार नंदूरबारमध्ये भाजपचे विजयकुमार गावित आघाडीवर असल्याचे समजते. तर साकोलीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आघाडीवर असल्याची माहिती आहे. बारामतीमध्ये शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार आघाडीवर असल्याची माहिती आहे. त्यामुळे अजितदादा पवार यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहणार का, हे बघावे लागेल. जामनेरमधून भाजपच्या गिरीश महाजन यांनी आघाडी घेतली आहे. आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील आघाडीवर आहेत. अचलपूरमधून बच्चू कडू आघाडीवर आहेत. शरद पवार गटाच्या राणी लंकेही आघाडीवर आहेत. तर जळगावमधून भाजपच्या संजय कुटे यांनी आघाडी घेतल्याचे सांगितले जात आहे. पोस्टल मतांची मोजणी संपल्यानंतर ईव्हीएम मशिनमधील मतांची मोजणी सुरु होईल तेव्हा ही आघाडी-पिछाडी कायम राहणार का, हे बघावे लागेल.